'लक्ष्य' सापडण्याचा प्रवास (भाग्यश्री भोसेकर-बीडकर)

bhagyashree bhosekar-bidkar
bhagyashree bhosekar-bidkar

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुष घरातला कर्ता पुरुष असतो, घर चालवतो. मात्र, एखाद्या पतीनं यापेक्षा वेगळं काही करायचं ठरवलं तर? त्यांच्या घरचे, मित्र-मैत्रिणी हे सगळे कशा प्रकारे व्यक्त होतील, दबाव आणतील? "द गुड वाइब्ज' ही वेब सिरीज हाच विषय अतिशय खुबीनं मांडते. अतरंगी नायक आणि त्याला समजून घेणारी त्याची पत्नी यांची गोष्ट सांगताना ही वेब सिरीज इतरही अनेक मुद्‌द्‌यांना स्पर्श करते. वेगळा विषय नेमक्‍या पद्धतीनं मांडणाऱ्या या सिरीजविषयी...

पुरुषप्रधान संस्कृती आणि त्याचे पुरुषांना मिळणारे फायदे यायाबद्दल आपण नेहमीच बोलत असतो; पण यात काही ताणतणाव असतील, असा कधी विचार केला आहे का? कोणते ताणतणाव, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या प्रश्नाचं उत्तर शोधूया. पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे पुरुषानं घराच्या सर्व मुख्य जबाबदाऱ्या उचलणं- मग ते घर चालवणं असो, की कोणताही एखादा मोठा निर्णय घेणं असो. मग असा मोठा निर्णय घेताना येणारं दडपण, घरातला कर्ता पुरुष म्हणून चांगलं कमावता यायलाच हवं याचा ताण या सगळ्या गोष्टींचा अनुभव पुरुष घेतात; पण याबद्दल चर्चा होताना अभावानंच दिसते.

अशाच तणावात वावरतोय "लक्ष्य.' "द गुड वाइब्ज' या वेब सिरीजचा हिरो. लक्ष्य आणि जोनिता हे "हॅप्पीली मॅरिड कपल'- एकमेकांच्या प्रेमात असणारं, एकमेकांच्या मतांचा आदर करणारं. जोनिता एका चांगल्या आर्किटेक्‍ट फर्ममध्ये नोकरी करतेय; पण लक्ष्यचा मात्र सध्या तरी काही कमावण्याचा प्लॅन नाहीये. त्यानं लग्न करण्याआधी तशी अटच ठेवली होती, की मी लग्नाचं पहिलं वर्ष नोकरी करणार नाही आणि जोनिताला ती अट मान्य होती. आताही जोनिताला लक्ष्यच्या या निर्णयाबाबतीत काहीच हरकत नाहीये; पण "कुछ तो लोग कहेंगे...'सारखी परिस्थिती आहे.

लक्ष्य एकदम "हॅप्पी गो लकी' मुलगा आहे. त्याला जे जे मनापासून वाटतं, ते तो सगळं करू पाहतो. मग आपल्या बोरिवलीच्या घरामधून बाहेर पडून जुहूच्या एका मोठ्या बंगल्यात राहण्याची इच्छा पूर्ण करणं असो, कुठल्याही छोट्या मोठ्या कारणासाठी रोज पार्टी करणं असो, आपलं घर सतत लोकांनी गजबजलेलं असलं पाहिजे, घरात सतत काहीतरी हॅपनिंग घडत राहायला पाहिजे म्हणून घरभर वेगवेगळी लायटिंग करणं असो, किंवा बांबूच्या प्लेट्‌स बनवून ती आयडिया मार्केटमध्ये विकण्यासाठी धडपड करणं असो!... तर लक्ष्य असा अतरंगी मुलगा आहे, ज्याला कधी काय वाटेल/सुचेल याचा भरवसा नाही. सतत पार्टी करणं हा त्याचा छंद आहे.
लक्ष्यचं हे अतरंगीपण जपलंय त्याच्या पत्नीनं. लक्ष्यनं काहीतरी ठरवायचं आणि जोनितानं त्याला त्यात साथ द्यायची हे ठरलेलं समीकरण आहे. मुळात जोनिताचं लक्ष्यवर खूप प्रेम आहे आणि अर्थातच लक्ष्यचंही जोनितावर- म्हणून जोनिता लक्ष्यला तिच्या माहेरच्या लोकांच्या मिळणाऱ्या टोमण्यांपासून वाचवते. एव्हाना जोनिताच्या वडिलांची खात्री झालेली आहे, की आपला जावई जन्मभर असा आपल्या मुलीच्या पैशावर बसून फक्त खाणार; पण जोनिताला मात्र लक्ष्यच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. जोनिताला लक्ष्यला असं कायमच आनंदी पाहायचं आहे- ज्यासाठी ती सतत धडपडते. म्हणूनच लक्ष्यच्या अनवधानामुळं विजेचं बिल जेव्हा 25 हजार रुपये येतं तेव्हा आणि अशा इतर अनेक क्षणी जोनिता लक्ष्यला समजून घेते, त्याच्यावर चिडण्यापेक्षा प्रकरण शांततेत हाताळण्याला प्राधान्य देते.

मात्र, लक्ष्य-जोनिता एकमेकांसोबत कितीही खूश असले, तरी लक्ष्यच्या आई-वडिलाना वाटतंय, की त्यानं हे रोज रोजची पार्टी करणं सोडून घरच्या बिझनेसमध्ये लक्ष घालावं. लक्ष्यच्या सासू-सासऱ्यांना म्हणजेच जोनिताच्या आई-वडिलानादेखील वाटत आहे, की लक्ष्यनं आता केवळ बोलू नये, तर काहीतरी करून दाखवावं. लक्ष्यचे आई-वडील मध्यमवर्गीय समाजातले आहेत; पण ते स्वतःच्या मुलाच्या इच्छाआकांक्षाना सपोर्ट करू पाहत आहेत. लक्ष्यच्या सासऱ्यांना मात्र लक्ष्यला घालूनपाडून बोलण्यात आनंद मिळतो, तर लक्ष्यच्या सासूबाई म्हणजेच जोनिताच्या आईला मात्र केवळ अंगारे-धुपारे, "बुवाजी बाबाजी' करण्यात रस आहे. अशा वेळी आपल्या घरचे आपलं नातं टिकू देतील की नाही, लक्ष्य काही कमावेल की नाही, या काळजीत जोनिता आहे. मग लक्ष्य स्वतःला काही दिवस खोलीत कोंडून घेतो. स्वतःच्या वागणुकीवर, स्वतःला नेमकं काय हवंय याचा विचार करतो. या सगळ्या परीक्षणामध्ये त्याला काय हाती लागतं, मुख्य म्हणजे लक्ष्यला त्याचं "लक्ष्य' सापडतं का, या प्रश्नांची उत्तरं शेवटच्या फिनाले एपिसोडमध्ये समजतात.

ऑगस्ट 2018 मध्ये आलेल्या या वेब सिरीजमध्ये जेमतेम सहा एपिसोड आहेत. यातल्या प्रत्येक एपिसोडमध्ये काही न काही खास गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, पहिल्याच एपिसोडमध्ये लक्ष्यची डिजिटली मीडिया हॅंडल करण्याची कौशल्यं दिसतात- त्यातूनच तो जुहूचा बंगला राहण्यासाठी मिळवतो. पहिल्याच एपिसोडमध्ये लक्ष्य आणि जोनिताची केमिस्ट्री दिसून येते. पूर्ण वेब सिरीज ज्या बंगल्यात शूट केली गेली आहे, तो बंगला खरंच खूप सुंदर आहे. चौथ्या एपिसोडमध्ये एक दृश्‍यात घराची पूर्ण लाइट गेलेली असल्यानं लक्ष्य आणि जोनितावर घराच्या अंगणात झोपायची वेळ येते. त्यावेळी लक्ष्य आणि जोनितामध्ये झालेला संवाद ऐकण्यासारखा आहे. जोनिताचं एक वाक्‍य विचार करायला लावणारं आहे. ती म्हणते ः ""इट्‌स सच अ बॅड हॅबिट ना? कॉन्स्टंटली यू आर एक्‍स्पेक्‍टिंग फ्रॉम समवन.'' अपेक्षा आणि अपेक्षापूर्तीची अपेक्षा नात्याला फार मारक असते ही गोष्ट इथं जाणवते. याच दृश्‍याच्या शेवटी रेखा भारद्वाज यांनी गायलेलं आणि राघव यांनी संगीतबद्ध केलेलं "फिर से कहो' या गाण्यानं या दृश्‍याला "चार चांद' लावले आहेत (हे गाणं संपूर्ण स्वरूपात "यूट्युब'वर उपलब्ध आहे). चौथ्या आणि पाचव्या एपिसोडसमध्ये जोनिताच्या आईच्या बुवा-बाबांबाबतच्या अतिरेकानं कथेनं मुख्य ट्रॅक सोडल्याची जाणीव होत राहते आणि कथा कुठंतरी भरकटल्यासारखी वाटते; पण हे सगळं सावरून घेतलंय शेवटच्या म्हणजेच सहाव्या एपिसोडनं. लक्ष्यला त्याचं "लक्ष्य' सापडतं आणि मग साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होते.
लक्ष्य-जोनिता यांची जोडी म्हणजेच नवीन कस्तुरीया आणि मानवी गगरू यांची जोडी पूर्वी "टीव्हीएफ पिचर्स' या वेब सिरीजमध्ये दिसली होती, त्यांच्यातल्या मैत्रीचा बॉंड या वेब सिरीजमध्येही दिसतो. लक्ष्यच्या आईची भूमिका केलीय मराठमोळी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी. त्यांचा वावर नेहमीप्रमाणं सहज आणि सुंदर आहे. लक्ष्यच्या कामगिरीवर विश्वास असणारे आणि त्याला कितीही अडचणी आल्या, तरी सपोर्ट करणारे लक्ष्यचे वडील साकारले आहेत रितुराज सिंग यांनी, तर लक्ष्यचे खडूस सासरे साकारले आहेत अनंत महादेवन या प्रसिद्ध कलाकारानं. जोनिताच्या आईची भूमिका केलीय मोना आंबेगावकर यांनी. हत्तीच्या दाताचं चूर्ण ते काळ्या नागाचं पोस्टर अशी काहीही आणि कधीही डिमांड करणाऱ्या जोनिताच्या आई "ही काहीतरी वेगळीच केस आहे' हे दाखवून देतात. या मुख्य कलाकारांशिवाय लक्ष्य-जोनिताचे मित्र-मैत्रिणी, घराचे मालक पारीख अंकल, बंगल्याच्या बाजूचे पानपट्टीवाले भैय्या या सगळ्या कलाकारांनीही उत्तम कामं केली आहेत.

बोहमेन एंटरटेनमेंट फिल्म्स आणि शिवी अरोरा यांची निर्मिती असलेल्या या वेब सिरीजचे दिग्दर्शक आहेत सिझील श्रीवास्तव. लेखन केलंय निखिल जोशी, विपुल बिंजोला आणि ऋषी विर्मनी या तिघांनी. ही वेब सिरीज का पाहावी याची काही खास कारणं आहेत पहिलं म्हणजे स्त्री-पुरुष आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पिअर प्रेशरचे/ सोशल प्रेशरचे बळी ठरत असतात. खूप थोडे जण या सोशल प्रेशरचा अजिबात विचार न करतात आपली वाट चोखंदळपणे निवडतात. अशा वेगळ्या प्रयत्नासाठी ही वेब सिरीज पाहायला हवी. दुसरं म्हणजे वेगळ्या विषयाची उत्तम मांडणी, तिसरं कारण म्हणजे शूट केलेली जागा. तो बंगला खूप सुंदर आहे. वेब सिरीजमधल्या काही फ्रेम्स बराच वेळ लक्षात राहतात. यूट्युबवर उपलब्ध असणारी ही वेब सिरीज नक्की पाहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com