छोट्या आनंदाचा मोठा दिवस!

खूप दिवसांनी बालपणीच्या काही जिवलग मैत्रिणी भेटल्या. सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली. त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या..चेष्टेला ऊत आला होता.
childhood
childhoodsakal

- रेणुका देशपांडे, renuvd14@gmail.com

खूप दिवसांनी बालपणीच्या काही जिवलग मैत्रिणी भेटल्या. सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली. त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या..चेष्टेला ऊत आला होता. खळखळून हसताना, आपण पन्नाशीच्या आहोत, याचा सगळ्या जणींना विसर पडला.

दिवसभर मनसोक्त भटकल्यावर पोटात कावळे ओरडू लागले...

पन्नाशीतल्या या ‘मुलीं’च्या शरीरात एव्हाना छोट्या-मोठ्या आजारांनी घर केलं होतं. पथ्यपाणी, रोजची औषध सुरू होतीच; पण आज एक दिवस या सगळ्या पथ्यांना फाटा देत चाटवर मनसोक्त ताव मारायचा असं ठरलं.

मग काय...एका प्रसिद्ध चाटभांडाराकडे सगळ्या जणींनी कूच केलं.

वातावरण मस्त होतं. सुखद, आल्दाददायक सांजवारा सुटला होता.

त्या भल्या मोठ्या चाटभांडारात विविध प्रकारचे स्टॉल्स आकर्षक पद्धतीनं सजवलेले होते. प्रत्येक स्टॉलवरच्या विविध पदार्थांचे सुगंध भूक अजूनच वाढवत होते.

भांडारात खवय्यांची गर्दी ओसंडून वाहत होती.

‘कोण काय खाणार गं?’ अनूनं विचारलं, ‘म्हणजे मी ऑर्डर देऊन येते.’

इतके छान छान पदार्थ...सराईतपणे ते पदार्थ तयार करणारे हात...वाढण्याची पद्धत...पदार्थांचा दरवळ...आणि काठोकाठ भरलेल्या प्लेट्स पाहून तोंडाला सुटलेलं पाणी...काय ऑर्डर करावं नि काय नको असं झालं सगळ्या जणींना.

आपली प्लेट हातात कधी येईल आणि तीवर आडवा हात कधी मारू यासाठी प्रत्येक जण उतावीळ झालेली असतानाच अनूचं लक्ष, प्रत्येकीनं आपापल्या आवडीनुसार दिलेली ऑर्डर त्या त्या प्रत्येकीला मिळतेय ना, याकडं होतं. आणि, तिच्या एकदम लक्षात आलं की, रचना कुठं दिसत नाहीय केव्हाची...

‘अगं, रचना कुठंय?’

‘अगं, होती ना ती आत्ता इथंच...’

‘मग गेली कुठं?’

‘असं कर, तू रांगेत थांबून टोकन घे. आम्ही शोधतो तिला...असेल इथंच जवळपास...’

त्यांच्यातल्या दोघी-तिघी बाहेर आल्या व रचनाचा शोध घेऊ लागल्या.

दिवसभराचं फिरणं, मनसोक्त गप्पा आणि लागलेली कडाक्याची भूक या सगळ्या बाबींचा विसर पडलेली रचना इकडं तिच्या वेगळ्याच विश्वात होती.

हातात भरपूर फुगे घेऊन एक छोटा मुलगा रस्त्याच्या कडेला उभा होता व ते विकत घेण्यासाठी तो येणाऱ्या-जाणाऱ्यांना विनवणी करत होता. रचना त्या मुलाकडं बराच वेळ बघत होती. तो मुलगा असेल दहा-बारा वर्षांचा. सावळा...नाजूक चणीचा...व्यवस्थित चापून भांग पाडलेला...स्वच्छ पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पँट अशा वेशातला. म्हणजे, शाळा सुटली की तो लगेचच फुगे घेऊन इकडं येत असावा... सकाळीच घर सोडलेलं असणार...म्हणजेच, बराच वेळपासून उपाशीही असणार...आपल्याला या वयात भूक सहन होत नाही आणि या वाढीच्या वयात त्याला तर जास्त गरज आहे वेळेवर आणि भरपूर खाण्याची...सगळ्यांनाच फुगे घेण्यासाठी विनवतोय...चार पैशांचा घराला हातभार लागावा यासाठी...घरी इतर कुणी कमावतं आहे की नाही कुणास ठाऊक...त्या मुलाला पाहून रचनानं एवढे सगळे अंदाज बांधले!

ती त्याच्या जवळ गेली.

‘मॅम, कोणता फुगा घेणार? निळा, हिरवा की गुलाबी?’

‘कितीला आहेत रे फुगे?’

‘पंधरा रुपयांना दोन आणि चार घेतले की एक फ्री!’

तो चुणचुणीत, तरतरीत मुलगा एखाद्या मुरलेल्या, अनुभवी व्यावसायिकासारखा बोलत होता!

‘फुगे घेईन मी...पण आधी मला सांग...तुझं नाव काय? कितवीत आहेस, कुठं राहतोस, घरी कोण कोण आहे? सगळं सगळं सांग...’

‘शुभम्. शुभम् नाव माझं. मी सहावीत आहे. इथं जवळच्याच गल्लीत राहतो. घरी माझी आई आणि दोन छोट्या बहिणी आहेत...’

‘अरे वाह..आई काय करते?’

‘कामावर जायची ती; पण आताशा आजारीच असते.’

‘अच्छा...म्हणून तू शाळेतून परस्पर इकडं येऊन फुगे विकतोस? किती फुगे विकले जातात दिवसाकाठी?’

‘शनिवारी, रविवारी...सुट्टीच्या दिवशी सगळे फुगे संपतात..इतर दिवशी चार-दोन शिल्लक राहतात.’

‘किती पैसे मिळतात तुला यातून?’

रचनाचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच शुभम् सांगू लागला : ‘‘सकाळी पेपरची लाईन टाकतो...कुणी काही दूध-ब्रेड-अंडी आणायला सांगतात ती आणून देतो. या वस्तू घरपोच आणून दिल्याबद्दल ते लोक काही पैसे देतात. याशिवाय मिळेल ती कामं करतो...मस्त चाललंय आमचं!’’

आहे त्या स्थितीत आनंद मानण्याची शुभमची वृत्ती त्याच्या बोलण्यातून दिसून येत होती.

‘मस्त चाललंय आमचं...! ’ असं सांगताना‍ एक निराळीच चमक शुभमच्या डोळ्यांत रचनाला दिसली. सर्व सुखांनी भरलेल्या आयुष्यात कितीतरी अनावश्यक गोष्टींचं मनावर ओझं घेत रडणारे आपण! आणि, हा गुडघ्याइतका मुलगा...त्याची समाधानी वृत्ती...एका क्षणात खूप काही शिकवून गेला तो तिला!

मग रचना त्याला पावभाजीच्या स्टॉलवर घेऊन गेली. तो ‘नको, नको’ म्हणत असताना त्याला त्याच्या आवडीची पावभाजी तिनं पोटभर खायला घातली. शिवाय, त्याच्या घरच्यांसाठी काही पार्सलही घेऊन दिलं तिनं त्याला.

रचनानं शुभमकडचे सगळे फुगे विकत घेतले व आजूबाजूला असणाऱ्या कामगारांच्या मुलांना वाटले. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला पराकोटीचं समाधान देऊन गेला.

निसर्ग, पृथ्वी, माणुसकी जपण्याचा ध्यास असणारी हळव्या, संवेदनशील मनाची रचना शुभमला खूप भावली. आजपर्यंत कुणी इतक्या आपुलकीनं त्याची कधी चौकशी केली नव्हती आणि रचनानं तर त्याला जवळ बसवून प्रेमानं खायला घातलं. शिवाय, सगळे फुगेही विकत घेतले.

शुभम् आनंदून-भारावून गेला अगदी.

तिथंच जवळ फुलं विकत बसलेल्या काकांकडून सोनचाफ्याचं एक फूल घेऊन त्यानं रचनाच्या ओंजळीत सोडलं!

दोघांमध्ये निर्माण झालेल्या त्या आपुलकीच्या नात्यानं त्यांच्या भोवतालची हवा मंदपणे दरवळली...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com