का पाहायची मरणाची वाट?

पत्रकार अरुण जाधव यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. अरुण यांना तपासणीसाठी आतमध्ये घेऊन गेले. कम्पाउंडरनं मला सांगितलं, की तुम्हाला बाहेर थांबावं लागेल. मी बाहेर गेलो.
Blind Couple
Blind Couplesakal

पत्रकार अरुण जाधव यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. अरुण यांना तपासणीसाठी आतमध्ये घेऊन गेले. कम्पाउंडरनं मला सांगितलं, की तुम्हाला बाहेर थांबावं लागेल. मी बाहेर गेलो. एक अंध जोडपं तिथं गप्पा मारत होतं. त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर मी बसलो. त्या दोघांचा संवाद माझ्या कानावर पडत होता.

ती अंध व्यक्ती त्या अंध महिलेला म्हणत होती, ‘काय ग समिधा, तुझा गजरा सुकलेला दिसतोय.’ ती म्हणाली, ‘कसं काय?’ तो म्हणाला, ‘गंध येणं थांबलंय ना, म्हणून विचारतोय.’ ती हसली आणि म्हणाली, ‘तू पण ना..!’ तिचा गजरा, तिचं वागणं, तिचा आवाज, तो तिचं खूप कौतुक करत होता.

त्यांचा संवाद एकदम रंगात आला असताना एक सिस्टर, आत चला, म्हणून घेऊन जाण्यासाठी आल्या. त्या सिस्टर बाहेर येऊन माझ्या बाजूला बसल्या. मी त्या सिस्टरना म्हणालो, ‘काय जोडी कमाल आहे ना.’ सिस्टर म्हणाली, ‘हो ना बघा ना, देव चांगल्याच्या मागं लागतो. अंध आहेत दोघे आणि मोठा आजार घेऊन जगत आहेत.’

मोठा आजार म्हणून सिस्टर एकदम शांत बसली. माझ्या मनाला हुरहुर लागली. अरुणकडं जाण्यासाठी मी उठणार तितक्यात ते दोघंही बाहेर आले. मी धाडस केलं आणि त्यांच्या समोर बसलो. आम्ही हळूहळू बोलायला लागलो. दवाखान्यात, रस्त्यानं जाताना आणि काही अंतरावर ते राहत असलेल्या एका चाळीपर्यंत आमच्या गप्पा सुरू होत्या.

विजय आणि समिधा रेल्वेमध्ये भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारं अंध जोडपं. दोन वर्षांपूर्वी विजय सतत आजारी राहतो, हे लक्षात आल्यावर त्याला समिधानं तपासणीसाठी रुग्णालयात नेलं. त्यातून विजयला एचआयव्ही असल्याचं पुढं आलं. त्यानंतर समिधाची तपासणी केली तेव्हा समिधालाही एचआयव्ही असल्याचं पुढं आलं. जेवढे दिवस आहेत ते उत्साहात, आनंदात घालवायचे, यावर त्या दोघांनी शिक्कामोर्तब केले.

विजय पुढं सांगत होता, ‘मी वाशिमसारख्या अत्यंत मागास ग्रामीण भागातून आलोय. एखाद्या गरिबाच्या घरात अंध व्यक्तीला जन्म घेण्याचा अधिकार नाहीच, एका मित्राच्या मदतीनं घरात कुणालाही न सांगता मी मुंबईत आलो.’

समिधा बिनधास्तपणे आपला प्रवास सांगत होती. माझं गाणं ऐकून विजय स्टेजच्या मागं मला भेटायला आला होता.

मला त्यानं लग्नाचं विचारलं. माझी कर्मकहाणी त्याला सांगणं आवश्‍यक होतं. समिधा म्हणाली, ‘मी मराठवाड्यातली. माझ्या गावात माझ्यावर अतिप्रसंग झाला. मी अंध, त्यामुळं आई-वडिलांना माझा भार होता. अतिप्रसंगाचा न्याय मागणार तरी कोणाकडं, असा प्रश्न होता. तसं खेड्यात गरिबाला, लहान जातीच्या माणसाला न्याय मिळतो कुठं?’

आत्महत्या करावी, गळफास घ्यावा, असे अनेक विचार मनामध्ये येत होते; पण माझ्यासारख्या अंध बाईचं कसं होतं पाहा ना? मी आत्महत्या करायलासुद्धा मला कोणाची मदत घ्यावी लागली असती. मी मुंबईत जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले आणि थेट मुंबईत आले.

मुंबईत फुटपाथवर राहून भीक मागून मी दिवस काढत होते. एका माणसाने काम देतो, तू बसून काम करू शकतेस, असे लालच दाखवून मला भलत्याच ठिकाणी नेले. माझ्या आयुष्याचा दुसरा भयंकर इतिहास सुरू झाला. मी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या रांगेत जाऊन बसले होते.

मी विजयला जेव्हा हे सारं सांगितलं, तेव्हा तो एकदम शांत होता. बराच वेळ माझ्याशी काहीही बोलला नाही. थोड्यावेळाने तो उठला आणि माझा हातात हात धरून, माझी समजूत घातली. तेव्हा विजयने माझा हात धरला आणि तो पुन्हा कधीही सोडला नाही.

काही दिवसांनंतर आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये हे एचआयव्हीचे तिसरे मोठे संकट आले. एचआयव्हीची बाधा कशी झाली, याच्या खोलात जाण्यापेक्षा आज आम्ही जगतोय तो आजचा दिवस शेवटचा आणि मस्त आहे. या भावनेतून जगतोय.

आम्ही ज्या विजयच्या झोपडीत बसलो होतो, ती झोपडी एका मावशीनं विजयचा प्रेमळ स्वभाव पाहून गेल्या अनेक वर्षांपासून त्या दोघांना राहण्यासाठी दिली होती. तेवढ्यात विजय म्हणाला, ‘समिधा, तू माझ्यासाठी जे पहिल्यांदा गाणं गायलं होतं, ते गाणं गा ना.’ समिधा लगेच गायला लागली.

बापरे, बापरे, समिधाचा आवाज काय जबरदस्त होता, असं वाटत होतं, तिनं गातच राहावं. आता त्यांना निघायचं होतं आणि मलाही. मी निघताना समिधाचा हात हातामध्ये घेतला आणि म्हणालो, ‘ताई, अनेकांच्या बळावर मी तुम्हा दोघांच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारतो, कृपया मला सेवेची संधी द्या.’

अगदी शांतपणानं समिधा म्हणाली, ‘दादा, तुम्ही ज्या आस्थेनं आज दिवसभर आमच्यासोबत होतात. मला असं वाटलं, माझं आयुष्य अजून पाच वर्षे वाढणार आहे. आजच्या समाधानातून आम्हा दोघांनाही खूप ऊर्जा मिळाली.’ मी थोडे पैसे विजयच्या हाती ठेवले; पण ते पैसे विजयनं नाकारले.

मी निघालो आणि ते दोघेही निघाले, एकमेकांचा हात हातामध्ये घेऊन. त्यांच्या डोळ्यात आनंदाच्या लाटा दिसत होत्या. इतकी संकटं येऊन त्या दोघांच्या चेहऱ्यावर तसूभरही दु:ख नव्हते, ना कशाची काळजी. डोळस असून, सगळ्या प्रकारची सुखं पायाशी लोटांगण घेताना अनेक श्रीमंत माणसाचे सदैव पडलेले चेहरे माझ्यासमोर दिसत होते. प्रचंड संकटे असताना सुखाचा वारा सदैव खेचून आणणारे हे जोडपे होते. बरोबर ना..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com