'इंडिया' रे भाई हा....

मयूर जितकर
गुरुवार, 26 जानेवारी 2017

खरंच, "प्रजासत्ताक' असण्याचा अर्थ कितपत उमगलाय आपल्याला..? आजच्या प्रजासत्ताक दिनादिवशी जरा आपल्यापैकी प्रत्येकानंच मनात डोकावून शोधायला पाहिजे

दरवर्षी जानेवारी महिन्यात वाहतूक विभागाकडून (आरटीओ) रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा केला जातो. वाहनचालकांची बेशिस्त, अतिवेग, नियम न पाळणे आदींमुळे आपल्या देशात रस्ते अपघात व त्यामुळं होणारी प्राणहानी दिवसेंदिवस वाढतचं आहे. या पार्श्‍वभूमीवर, वाहनचालकांमध्ये सुरक्षा पंधरवड्यात जागृती करण्याचा वाहतूक विभागाचा प्रयत्न कौतुकास्पद वाटतो. विविध फलक, फ्लेक्‍स, पत्रके आदींच्या माध्यमातून वाहनचालकांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न सुरू असतो. अर्थात, पंधरा दिवसांच्या मोहिमेमुळे वाहनचालकांमध्ये कितपत शिस्त निर्माण होते की त्यानंतर पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' म्हणत वाहनं चालविली जातात, हा प्रश्‍नच आहे.

यंदाच्या या पंधरवड्यातीलच गोष्ट. दुचाकीवर भावासोबत हडपसरच्या दिशेने चाललो होतो. वैदुवाडीला वाहतूक कार्यालयासमोर सुरक्षा पंधरवड्यानिमित्त मंडप टाकला होता. वाहतूक पोलिस माईकवरून वाहनचालकांना नियम पाळण्याच्या सूचना देत होता. सिग्नल पडला आणि चौकात वाहने थांबली. आमची दुचाकी झेब्रा क्रॉसिंगच्या थोडी अलीकडेच थांबली. (पुण्यात वाहतूक पोलिस नसताना स्वयंशिस्तीने झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे वाहनं थांबलीयत, असा चौक शोधावाच लागेल). समोरून वाहतूक पोलिस स्पीकरवर झेब्रा क्रॉसिंगच्या पलीकडे थांबण्याची सूचना देत होता. तरीही, एक रिक्षावाला झेब्रा क्रॉसिंग ओलांडून थेट पुढं जाऊन थांबला. जणू काही वाहतूक पोलिसाला त्याने आव्हानंच दिले. "रिक्षा झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभा करा', समोरून वाहतूक पोलिस स्पीकरवर सूचना देत होता. रिक्षावाल्यावर सूचनेचा काहीच परिणाम झाला नसल्याचे पाहून पोलिसाने पुन्हा एकदा सूचना केली, यावेळी दंडाची पावती भरावी लागेल, असा दमही दिला. तेवढ्यात सिग्नल सुटला आणि सगळी वाहनं भरधाव जाऊ लागली. वाहतूक पोलिसानं रिक्षावाल्याला रिक्षा बाजूला घेण्याची सूचना केली पण त्याला न जुमानता रिक्षावाल्यानं हसतहसत रिक्षा वेगात दामटली.

""काय हिंमत वाढलीय, रिक्षावाल्यांची..नियमांचं भान नाही..कायद्याचा धाक नाही''.. मी दुचाकी चालविणाऱ्या माझ्या भावाला म्हणालो....""अरे तू कशाला एवढं टेन्शन घेतोसं. त्या रिक्षावाल्यानं हप्ता दिला असेल त्या पोलिसाला..म्हणूनच तर थांबला नाही...इंडिया आहे भाई हा...यहॉं सब चलता है....''भाऊ माझ्या उत्तरावर उतरला अन माझे मन विचारात गढून गेले. आपल्याच देशात कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्यांसमोरच, त्यांच्या नाकावर टिच्चून कायदा मोडला जातो अनू वर "इंडिया आहे रे भाई हा'..असं म्हणत स्वत:च्या व दुसऱ्याच्या कृत्याचं समर्थन केलं जातं. खरंच, या वृत्तीच करावं तरी काय, आपल्या देशाला खरंच काय समजतो आपण? सर्व भल्याबुऱ्या गोष्टी निधड्या छातीनं कराव्यात..इतका स्वस्त आहे का आपला देश..पोलिस किंवा इतर सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार करतच नाहीत...सगळा दोष जनतेचाच आहे, असं कुणीच म्हणणार नाही..पण, त्यांच्याकडे बोट दाखविताना स्वत:च्या दिशेनंच वळलेल्या बोटाचं काय...?

खरंच, "प्रजासत्ताक' असण्याचा अर्थ कितपत उमगलाय आपल्याला..? आजच्या प्रजासत्ताक दिनादिवशी जरा आपल्यापैकी प्रत्येकानंच मनात डोकावून शोधायला पाहिजे. एक छोटा नियम मोडला म्हणून देश छोटा होत नाही, असं कुणी म्हणेलही. पण, छोटे नियम पाळण्यानंच देशही मोठा होतो..हेही तितकंच खर. प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिनादिवशी सोशल मीडियावर देशभक्तीला उधाण येते. एकमेकांवर देशभक्तिपर मेसेजचा वर्षाव केला जातो. दुसऱ्याच दिवशी हा पूर ओसरून जातो. खरंतर, अशी देशभक्ती दाखविण्यात काही गैर नाही. पण,जे नियम पाळल्यामुंळ आपण समाज, देश म्हणून अधिक जबाबदार होऊ, ते पाळण्याचा निश्‍चय करण्यात तरी काय चूक आहे. "वाहतुकीचे नियम पाळीन'.."रस्त्यावर थुंकणार वा कचरा टाकणार नाही'.."महिलांचा सन्मान करीन'.."सोशल मीडियाचा वापर जबाबदारीनं करीन'..अशा प्रकारचे "छोटे' नियम स्वत:पुरते बनवून पाळायला काय हरकत आहे. शेवटी..लढाई ही काही केवळ सीमेवरच लढायची नसते.

देशातही स्वत:च सैनिक होऊन अशी लढाई लढूयात..तरच, आपण खऱ्या अर्थानं "प्रजासत्ताक' ठरू...प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..

Web Title: Blog on R-Day by Mayur Jitkar