फेसबुकची ‘वॉल’मागची कहाणी !

आशिष तागडे
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

पुस्तक परिचय

पुस्तक परिचय

‘त्या ’ शब्दाचा उच्चार जरी केला तरी तरुणांचे कान टवकारतात.... प्रौढपणा ओलांडून वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर असलेल्या पिढीच्या कपाळावर आठ्या पडतात... तो शब्द म्हणजे ‘फेसबुक’ ! ‘फेसबुक म्हणजे तासन्‌तास वेळ घालवायचं साधन’ अशी या सोशल मीडियाची सरळसोट व्याख्या अनेकांकडून केली जाते... मात्र, या व्याख्येला छेद जातो तो ‘द फेसबुक इफेक्‍ट’ या पुस्तकानं. ‘फॉर्च्युन’ मासिकाचे पत्रकार व ‘फोर्ब्ज’ मासिकाचे स्तंभलेखक डेव्हिड कर्कपॅट्रिक यांनी इंटरनेटच्या मायाजाळात गुगलनंतरची दुसऱ्या क्रमांकाची साइट असलेल्या ‘फेसबुक’च्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचा आढावा या पुस्तकातून घेतला आहे. जगाला एका सूत्रात बांधण्याची ताकद असलेल्या फेसबुकचा २००४ मध्ये महाविद्यालयीन स्तरावर जन्म झाला. त्यानंतर ती एक मोठी कंपनी बनली. अशी तिची विलक्षण कहाणी. हॉवर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या मार्क झुकेरबर्गनं अवघ्या १९ व्या वर्षी होस्टेलच्या एका खोलीत फेसबुकची निर्मिती केली. सुरवातीच्या काळात फेसबुक साधं, सोपं आणि सरळ होतं. आपलं काम स्पष्ट, स्वच्छ आणि सुगम असावं, हा मार्कचा निर्मितीच्या वेळी आग्रह होता आणि तो आताही कायम आहे. ‘द फेसबुक’ (कंपनीचं मूळ नाव) निर्माण केले, त्या वेळी मार्कच्या डोक्‍यात निश्‍चित काय कल्पना होत्या, त्याला काय वाटलं, याचा वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे. ‘असंख्य मित्र आणि खरी ओळख हीच सुरक्षित इंटरनेट-संवादाची गुरुकिल्ली’ या गृहितकावर फेसबुकचं काम उभं आहे.

‘फेसबुक’ विकत घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला; मात्र तो निष्फळ ठरला. आपल्याला फेसबुक हे आभासी जग वाटत असलं, तरी त्यामध्ये प्रचंड भावनिक ताकद आहे. ओळखीच्या आणि अनेक दिवस न भेटलेल्या दोन व्यक्तींमध्ये नव्या प्रकारचा संवादाचा पूल फेसबुकमुळे बांधला जाऊ शकतो. गुंतवणूकतज्ज्ञ आणि तंत्रज्ञान विदुषी एस्थर डायसन यांनी म्हटलं आहे - ‘फेसबुक हे प्रत्येक व्यक्तीचं पहिलं व्यासपीठ आहे.’ प्रचंड लोकप्रिय ठरत असलं, तरीही ‘प्रत्यक्ष संवादा’ला पर्याय म्हणून ते अस्तित्वात आलेलं नाही; मात्र मार्क आणि त्याच्या सहकाऱ्यांनी फेसबुकची निर्मिती करताना मानवी संबंध आणखी वृद्धिंगत करण्याचा हेतू सर्वतोपरी जपला आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फेसबुकवर माहितीची देवाण-घेवाण केली जात असताना व्यक्तीची ‘प्रायव्हसी’ धोक्‍यात येणार नाही, याची काळजी घेण्यात आलेली आहे. या आणि अशा प्रकारच्या सगळ्या मुद्द्यांची सविस्तर चर्चा या पुस्तकात वाचायला मिळेल. जगभरातल्या कोट्यवधी लोकांचं संवादाचं माध्यम असलेलं फेसबुक एकाच कंपनीच्या आधिपत्याखाली असावं का, याही प्रश्‍नाचा ऊहापोह या पुस्तकातून वाचायला मिळतो. होस्टेलपासून सुरू झालेला प्रवास एका बलाढ्य कंपनीत कसा परावर्तित झाला, याची ‘फेसबुक-वॉल’मागची ही कहाणी वाचनीय आहे.

पुस्तकाचं नाव :
द फेसबुक इफेक्‍ट
मूळ लेखक :
डेव्हिड कर्कपॅट्रिक
अनुवाद : वर्षा वेलणकर
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
२४४७६९२४ / २४४६०३१३
पृष्ठं : ३९४, मूल्य : ३९५

Web Title: book review in saptarang