बरंच काही ‘सांगण्यासारखं’!

बरंच काही ‘सांगण्यासारखं’!

‘सांगण्यासारखं...’ हा सतीश सोळांकूरकर यांचा चौथा काव्यसंग्रह. सोळांकूरकर यांची कविता आत्मनिष्ठ, काहीशी गूढ, स्वप्नाळू आणि वास्तवाला भिडणारीसुद्धा आहे. या संग्रहातल्या अनेक कवितांमधून घोडा हे प्रतीक वाचकाला भेटत राहतं. घोड्यांचे कळप आणि केवळ घोड्यांचे संदर्भ असणाऱ्या ११ कविता या संग्रहात आहेत. ‘कळपातील सर्वांनीच असे अचानक’ ही या संग्रहातली पहिलीच कविता. ही कविता वाचतानाच वेगळं काही वाचायला मिळणार असल्याची कल्पना येते. ‘घोडा’ या प्रतीकाबरोबरच गुलमोहर हे प्रतीकही त्यांनी यथार्थपणे वापरलं आहे.

माणूस, माणसाचं अस्तित्व, माणूसपण, जीवनमूल्यं आणि समाजव्यवस्था यातलं भीषण वास्तव घोडा या प्रतीकातून प्रतीत होताना दिसतं. आपली ऐट आणि हुकमत दाखवणारी माणसं, भरडून आणि पिचून काढली जाणारी माणसं आणि निकामी झाल्यानंतर त्यांनाच संपवून टाकणारी माणसं अशा विविध बाबी घोड्यांचे हे कळप सूचित करत राहतात. याशिवाय ‘तरीही’, ‘हे असेच जर,’ ‘गृहीत धरलं जातंय’ या कवितांमधूनही हे सामाजिक भान जपलेलं आढळतं. मनाचा हळवेपणा जपणाऱ्या तरल आणि भावस्पर्शी प्रेमकविताही या संग्रहात आहेत. ‘प्रेम’, ‘मुलगी’, ‘तुझ्याकडून’, ‘रस्ता’, ‘ओढ आहे तोवर’, ‘उदास’, ‘घर’, ‘एकांत’, ‘सांगण्यासारखं...’ अशा कवितांमधून प्रेमाचे वेगवेगळे पदर सोळांकूरकर उलगडत जातात.

‘गुलमोहराची कथा’ ही कविता म्हणजे या काव्यसंग्रहाचा केंद्रबिंदू आहे, असं म्हणता येईल.
अन्याय, अपमान, अत्याचार आणि शोषण हे भीषण वास्तव प्रतीकांच्या माध्यमातून मांडताना समाज व्यवस्थेतील मूल्यांचा ऱ्हास कसा होत जातोय हेही सोळांकूरकर अधोरेखित करतात.
‘अफवा’ आणि ‘गारूड’ या दोन व्यक्तिचित्रणात्मक कविता वेगळ्या म्हणाव्यात अशा.
‘सांगण्यासारखं’ मधल्या कविता काव्यप्रेमींना उच्च दर्जाचा साहित्यानंद देतात, एवढं निश्‍चित.

पुस्तकाचं नाव - सांगण्यासारखं
कवी - सतीश सोळांकूरकर
प्रकाशक - संवेदना प्रकाशन, चिंचवड (९७६५५५९३२२)
(sanvedanaprakashan९५@gmail.com)
पृष्ठं - ८० / मूल्य - १०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com