‘क्रांतियोगिनी’ची प्रेरक जीवनगाथा

‘क्रांतियोगिनी’ची प्रेरक जीवनगाथा

इतिहास एखाद्या विशिष्ट कालखंडात असं काही वळण घेतो, की अभ्यासकांना पुन-पुन्हा तो काळ खुणावत राहतो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गवसल्याची जाणीव होते. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा संधिकाल हे त्याचं एक उदाहरण. वेगवेगळ्या वैचारिक प्रवाहांची घुसळण सुरू झाली ती याच काळात. स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेलं राष्ट्रीय- सांस्कृतिक- धार्मिक पुनर्जागरण हाही त्यातला एक ठळक प्रवाह होता. त्यांच्या कार्यात सहभागी झालेल्या एक पाश्‍चात्त्य विदुषीची ओघवत्या शैलीत कथन केलेली ही जीवनकहाणी. या विदुषीचं नाव मार्गारेट नोबल अर्थात भगिनी निवेदिता.

उत्तर आयर्लंडमध्ये जन्मलेल्या मार्गारेटला घरातूनच देशभक्तीचं बाळकडू मिळालं होतं. आयरिश स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेलं हे घराणं होतं. मार्गारेटच्या बालपणीची विस्तृत माहिती देऊन पुढं ती भारतीय राष्ट्रीय जाणिवांशी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी समरस होण्याची बीजं या वातावरणात कशी होती, याचं सूचन लेखिका करते. मार्गारेटला अध्यात्माचं आकर्षण होतं; परंतु प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर तावून- सुलाखून घेतल्याशिवाय स्वीकारत नसे. स्वामी विवेकानंदांचं अनुयायित्व स्वीकारतानादेखील अनेक विषयांवर त्यांच्याशी तिच्या चर्चा झडल्या. शंकांचं निराकरण होईपर्यंत ती स्वस्थ बसत नसे आणि एखादी गोष्ट पटली, की मात्र त्यात सर्वस्व झोकून देऊन काम करत असे. हे चरित्र वाचताना तिच्या या वैशिष्ट्याचा ठसा वाचकाच्या मनावर उमटतो. विवेकानंदांनीदेखील आपली मतं लादण्याचा प्रयत्न न करता मार्गारेटच्या वैचारिक प्रवासात मार्गदर्शकाची भूमिका कशी निभावली, हे लेखिकेनं दाखवून दिलं आहे. गुरू-शिष्यातल्या नात्याचे हे वेगवेगळे पैलू पुस्तकातून समोर येतात.

विज्ञानानं माणसाच्या आयुष्यात जे क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणलं होतं, त्याचा परिचय भारतात ब्रिटिश राजवटीमुळं झाला. आधुनिक शिक्षण मिळालेल्या पहिल्या पिढीचे लोक त्यानं प्रभावित झाले नसते तरच नवल. त्यांचे डोळे दिपून गेले; पण याचा एक परिणाम असाही झाला, की भारतातल्या हजारो वर्षांच्या परंपरेविषयी काहींच्या मनात सरसकट तिटकारा निर्माण झाला. तिच्याकडं पाठ फिरवल्याशिवाय आधुनिकतेच्या प्रकाशाला सामोरं जाता येणार नाही, असं त्यांना वाटू लागलं. स्वामी विवेकानंदांना हे अजिबात मान्य नव्हतं. त्यांना या समाजाचा आत्मविश्‍वास पुन-स्थापित करायचा होता. भारतीय सांस्कृतिक परंपरेच्या नितळ- निखळ रूपाला उजाळा देत या समाजाची पुनर्रचना व्हायला हवी, असा त्यांचा प्रयत्न होता. तिथपर्यंत पोचण्यासाठी वाटेतील अंधश्रद्धांचा बुजबुजाट, मुरलेल्या हितसंबंधांचं शेवाळ हटवायला हवं, हे तर उघडच होतं. भारतीयांचं मनोबल खच्ची करू पाहणाऱ्या साम्राज्यवाद्यांशीही त्यांचा झगडा होता. एका पाश्‍चात्त्य विदुषीनं या कार्याचं, त्यामागच्या भूमिकेचं मर्म ओळखणं, एवढंच नव्हे तर या कार्याला आजन्म वाहून घेणं, ही घटना एकमेवाद्वितीय म्हणावी लागेल. ते सारं अनोखेपण या चरित्राच्या रूपानं प्रभावीपणे मांडलं गेलं असल्यानं हे केवळ चरित्र न राहता त्या मंतरलेल्या काळाची एक झलकही त्यातून प्रतीत होते. भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी निवेदितांनी खूप परिश्रम घेतले. हे करताना त्यांना अनेक आव्हानांना आणि संकटांना सामोरं जावं लागलं. दुसऱ्या बाजूला वैचारिक आघाडीवरही त्यांना संघर्ष करावा लागला. त्याचं तपशीलवार वर्णन मृणालिनी गडकरी यांनी केलं आहे. त्यासाठी बंगालीसह विविध भाषांतील संदर्भस्रोत त्यांनी मिळवले. आठवणी, तत्कालीन कागदपत्रं, पत्रव्यवहार अशा अनेक साधनांचा वापर करून त्यांनी ही चरितकहाणी सिद्ध केल्यानं तिचं मोल वाढलं आहे.

पुस्तकाचं नाव - क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता
लेखिका - मृणालिनी गडकरी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
(०२० - २४४७६९२४)
पृष्ठं - ३९४/ मूल्य - ४५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com