कहाणी पाक तालिबानची...

लाल मशिदीवरील कारवाईतून जन्मलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेनं पाकिस्तानसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे.
Taliban
Talibansakal
Summary

लाल मशिदीवरील कारवाईतून जन्मलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेनं पाकिस्तानसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे.

- ब्रिजेश सिंह saptrang@esakal.com

लाल मशिदीवरील कारवाईतून जन्मलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेनं पाकिस्तानसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार व तालिबानची राजवट पुन्हा प्रस्थापित झाल्याच्या पार्श्वभूमीवर टीटीपीला पाकिस्तानच्या मुख्य भूमीतूनच पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे, पाकिस्तानला या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल.

या सर्व गोष्टींची सुरुवात चीनपासून झाली. ता. २४ जानेवारी २००७ रोजीचा तो रविवार होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील सेक्टर एफ ८ येथील मसाज पार्लर व ॲक्युपंक्चर क्लिनिकवर लाल मशिदीच्या एका गटानं धाड टाकली. पार्लरमधील सात चिनी कर्मचाऱ्यांसह दोन पाकिस्तानी पोलिसांचंही‌ त्यांनी अपहरण केलं. या गटात दहशतवाद्यांसह बुरखाधारी महिलांचाही समावेश होता. त्यांच्या हातात दंडुके होते. ते सर्व सशस्त्र दहशतवादी व महिला ‘दुर्गुण व सद्गुण’ पथकाचे सदस्य होते आणि ते पार्लरमधील सर्वांना जामिया हाफसा मदरशात घेऊन गेले. यासंदर्भात जामिया हाफसाच्या प्रवक्त्यानं स्थानिक पत्रकार परिषदेला संबोधित केलं. या पत्रकार परिषदेत त्यानं सांगितलं की, ‘या पार्लरमध्ये सुरू होता. पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याबद्दल आम्ही प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र, याविषयी सूचना देऊनही प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हीच या पार्लरवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.’ दरम्यान, ओलिस ठेवलेल्या चिनी कर्मचाऱ्यांची‌ तत्काळ सुटका करण्याची मागणी चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांनी केली. त्यानंतर,चीनच्या दबावापुढे झुकत पाकिस्ताननं लाल मशिदीवर कारवाई करण्याचं ठरवलं.

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ता. ३ जुलै २००७ रोजी ‘ऑपरेशन‌ सायलेन्स’ हाती घेत लाल मशिदीच्या परिसराला वेढा घातला. पार्लरवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी व बुरखाधारी महिलांसह मशिदीतील १०० हून अधिक जण सात दिवसांच्या कारवाईत मृत्युमुखी पडले. अनेकांनी शरणागती पत्करली. यात पार्लरवर दंडुक्यांनी हल्ला करणाऱ्या लाल मशिदीतील बुरखाधारी महिलांचाही समावेश होता. लाल‌ मशिदीच्या तटबंदीवर, तसंच तळघर, बंकर व अन्य ठिकाणी हातात स्वयंचलित शस्त्र घेतलेल्या दहशतवाद्यांचा खडा पहारा होता. स्वयंचलित शस्त्र घेतलेल्या दहशतवाद्यांचा सामना करत ही सुसज्ज तटबंदी भेदून‌ मशिदीच्या तळमजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पाकिस्तानच्या सुरक्षा दलांना‌ तब्बल २० तास लागले. पाकिस्तानच्या या कारवाईत उईघरच्या १२ दहशतवाद्यांसह अफगाणिस्तानबाहेरच्या १५ विदेशी दहशतवाद्यांचाही खात्मा झाला. यात लाल मशिदीतून दहशतवादी संघटना चालवणाऱ्या मौलाना अब्दुल रशीद गाझी (माझारी जमातीतील सदवानी कुळातील बलुचवंशीय) याचाही मृत्यू झाला. लाल मशीद आणि जामिया हाफसा मदरसा पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या निवासस्थानापासून अगदी जवळ आहे. एवढंच नव्हे तर, पाकिस्तानी लष्कराची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’च्या मुख्यालयापासूनही ते हाकेच्या अंतरावर आहेत.

पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या या ‘ऑपरेशन सायलेन्स’ मोहिमेविरुद्ध पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट व आत्मघातकी हल्लेही घडवण्यात आले. वायव्य पाकिस्तानातील पश्तुनबहुल प्रांतात प्रामुख्यानं हल्ले करण्यात आले. पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या लाल मशिदीवरील या कारवाईमुळे, विशेषत: दक्षिण वझिरीस्तान, मोहम्मद, बाजौर आणि स्वात जिल्ह्यांतील अनेक पश्तुन दहशतवाद्यांना एकत्रितरीत्या प्रयत्न करण्यासाठी प्रेरित केलं. लाल मशिदीवरील कारवाईमुळे पाकिस्तानवर धर्मभ्रष्टतेचा आरोप करत हे सर्व दहशतवादी पाकिस्तानविरुद्ध एकवटले. त्यातूनच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेची निर्मिती झाली. लाल मशिदीतच वास्तव्य केलेला बैतुल्ला महसूद टीटीपीचा प्रमुख झाला. बैतुल्ला महसूद काही दिवसांतच हाफिज गुल बहादूरच्या गटानं सर्वांत प्राणघातक हल्ले घडवले. यात काही दिवसांत पाकिस्तानचे ७०० जवान ठार झाले.

लाल मशिदीवरील कारवाईमुळे पाकिस्तानातील मोहम्मद जिल्ह्यात टीटीपीला मोठं बळ मिळालं. दहशतवाद्यांनी मशिदीची प्रतिकृती तयार करत पाकिस्तानी लष्कराला छापा टाकण्याचं खुले आव्हान दिलं गेलं. लष्कराच्या अनेक मोहिमांना दहशतवाद्यांची जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर अवघ्या थोड्या दिवसांतच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी) ‘पाकिस्तानातील सर्वांत धोकादायक दहशतवादी संघटना’ म्हणून उदय झाला.

अफगाणिस्तानातील तालिबान, अल कैदा यांच्याशी या संघटनेनं संबंध प्रस्थापित केले. भारतासह इतर दहशतवादी संघटनांनी पंजाबी दहशतवाद्यांवर व ‘इसिस’वर लक्ष केंद्रित केलं. तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ले घडवून आणले. पाकिस्तानात नव्यानं उदय झालेल्या या संघटनेच्या प्रमुख हल्ल्यांमध्ये पाकिस्तानात नौदलाच्या तळावर २०११ मध्ये केलेला हल्ला, तसंच २०१४ मध्ये कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवरील हल्ला या हल्ल्यांचा समावेश होतो. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या केल्याचा दावाही संघटनेकडून करण्यात आला.

पाकचे शांततेचे प्रयत्न निष्फळ

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या या हल्ल्यांच्या मालिकांमुळे पाकिस्तानसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे हल्ले रोखण्यासाठी एकीकडे पाकिस्ताननं लष्करी कारवाईचा उपाय योजला. दुसरीकडे शांतताचर्चेच्या उपायाचाही अवलंब केला. त्यातून मे २००७ मध्ये प्रथमच पाकिस्तानकडून टीटीपीशी शांतताचर्चा करण्यात आली. टीटीपीचा नेता मुल्ला फझलुल्लाह आणि पाकिस्तानच्या सरकारदरम्यान नऊकलमी शांतताकरारही करण्यात आला. त्यानंतर, सप्टेंबरमध्ये तालिबानचा स्थानिक गट आणि साफी जमातीदरम्यान आणखी एक करार झाला. त्यानुसार, टीटीपीनं मोहम्मद एजन्सीत पाकिस्तानी सरकारी संस्थांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ले न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, एप्रिल २००८ मध्ये पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा आणि तत्कालीन नॉर्थ वेस्ट फ्रंटिअर प्रॉव्हिन्स सरकारनं (एनडब्लूएफपी) विविध दहशतवादी संघटनांशी शांतताचर्चा करण्यासाठी समितीची स्थापना केली. टीटीपी ही अफगाण तालिबानच्या दृष्टीनंही महत्त्व असलेली संघटना होती. त्याचप्रमाणे, ही संघटना अनेक गटांपासून निर्माण झाली असल्यानं शांतताकराराबाबत एकमत होऊ शकलं नाही. त्यातून शांतताचर्चेचा प्रभाव मर्यादितच राहिला.

त्यानंतर २०१३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी टीटीपीपुढं चर्चेचा प्रस्ताव ठेवला; पण संघटनेच्या प्रमुखानं तो फेटाळला. २०१४ मध्ये ही उभय पक्षांत पाकिस्तानचा धार्मिक नेता आणि सिनेटर मुफ्ती सामी ऊल हकच्या मदतीनं चर्चेचा प्रयत्न झाला; पण जून महिन्यात ही चर्चाही फिसकटली. त्यानंतर टीटीपीनं पाकिस्तानमधील आदिवासी प्रदेशाबाहेर मोठे हल्ले केले. एवढंच नव्हे तर, २०१४ च्या उन्हाळ्यात कराची विमानतळावरही या दहशतवादी संघटनेनं धाडसी हल्ला चढवला.

पाकिस्तानी लष्कराची ‘झरब-ए-आझब’ मोहीम

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या धाडसी हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कराला त्याविरुद्ध ‘झरब-ए-आझब’ मोहीम उघडावी लागली. पाकिस्तानी लष्कराच्या या व्यापक मोहिमेला प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या तलवारीचं नाव देण्यात आलं.

पाकिस्तानी लष्कराच्या या धडकमोहिमेमुळे टीटीपीचा अक्षरशः कणा मोडला आणि या संघटनेचा पाकिस्तानाच्या आदिवासी पट्ट्यातील आधारही नष्ट झाला. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील कराचीपासून दक्षिण पंजाबपर्यंतच्या अनेक शहरांतील टीटीपीचे स्लीपर सेल पाकिस्तानच्या लष्कराकडून उद्‌ध्वस्त करण्यात आले. यात संघटनेचे हजारो दहशतवादी तर ठार झालेच; शिवाय प्रदेश आणि साधनसंपत्तीही मोठ्या प्रमाणावर गमावावी लागली.

पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे २०१५ पासून टीटीपीच्या हल्ल्यांत ७५ टक्क्यांनी घट झाली. टीटीपी व तिच्या संलग्न संघटनांविरुद्ध ३९८ मोठ्या आणि ८३० छोट्या मोहिमा पाकिस्तानकडून राबवण्यात आल्या. पाकिस्तानमधील आदिवासी पट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्यानं टीटीपीच्या आधारावरही परिणाम झाला. झरब-ए-आझब मोहिमेच्या तीन वर्षांनंतर पाकिस्तानी लष्करानं ‘रद-ऊल-फसाद’ ही मोहीम राबवली. टीटीपीनं पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्करानं ही मोहीम हाती घेतली. याच काळात अमेरिकेकडून पाकिस्तानातील वजिरीस्तानवर ड्रोनहल्ले करण्यात येत होते. अमेरिकेच्या या ड्रोनहल्ल्यांमुळेही पाकिस्तानी लष्कराच्या टीटीपीविरुद्धच्या मोहिमेला बळ मिळालं. अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यांत टीटीपीच्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दक्षिण वजिरीस्तानमध्ये पाच ऑगस्ट २००९ रोजी अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यात टीटीपीच्या संस्थापक-सदस्यांपैकी एक असलेला बैतुल्ला महसूद ठार झाला. त्यानंतर २२ ऑगस्ट २००९ रोजी हकीमुल्लाह महसूद टीटीपीचा प्रमुख झाला. त्यानंतर ता. एक नोव्हेंबर २०१३ मध्ये उत्तर वजिरीस्तान प्रांतात अमेरिकेच्याच ड्रोनहल्ल्यात हकीमुल्लाहही मारला गेला. त्यानंतर हकीमुल्लाह याच्यानंतर टीटीपीचा प्रमुख होण्यावरून या दहशतवादी संघटनेमध्ये महसूद आणि पंजाबी तालिबान्यांमध्ये वादाची ठिणगी पडली.

नेतृत्वातून झालेल्या टोकाच्या मतभेदांतून टीटीपीचे अनेक तुकडे झाले. या सर्वांना पुन्हा एकत्रित करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. यापैकी जमात-ऊल-अहरर या टीटीपीतून फुटलेल्या गटाची दहशतवादी ओमर खालिदच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट २०१४ मध्ये स्थापना झाली. पुढं २०१७ मध्ये अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यात ओमर खलिदही मारला गेला. अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी टीटीपीनं अफगाण तालिबानशी जवळचे संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे अफगाण तालिबाननं टीटीपीच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय घेण्यास परवानगी दिली. टीटीपीच्या अनेक दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानला पलायन केलं. त्यामुळे अमेरिकेचे ड्रोनहल्ले, तसंच पाकिस्तानच्या लष्करी कारवाईपासून टीटीपीच्या दहशतवाद्यांची सुटका झाली. पेशावरमधील शाळेवरील हल्ल्यातील सूत्रधार मुल्ला फजलुल्लाह ता. १४ जून २०१८ मध्ये अफगाणिस्तानातील कुनार इथं स्वत:च्या वाहनावर झालेल्या ड्रोनहल्ल्यात ठार झाला. त्यानंतर टीटीपीचा कमांडरही खलीद हक्कानी, टीटीपीचा माजी उपनेता, कारी सैफ युनूस काबूलमध्ये, तर हकीमुल्लाह महसूद गटाचा नेता शहरयार महसूद हे टीटीपीचे इतर कमांडरही अमेरिकेनं अफगाणिस्तानात कुनारमध्ये केलेल्या कारवाईत मृत्युमुखी पडले. त्यानंतर भारतीय उपखंडातील अल् कैदा (एक्यूआएएस) या दहशतवादी संघटनेनं एक निवेदन जारी करत टीटीपीबद्दल‌ सहानुभूती, तसंच फजलुल्लाहच्या मृत्यूबद्दलही दुःख व्यक्त केलं. अल् कैदाचा प्रमुख अयमान-अल-जवाहिरीनं फजलुल्लाहची स्तुती करणारा व टीटीपीला पाठिंबा देणारा एक व्हिडिओ जारी केला. त्यामुळे, बळ मिळालेल्या टीटीपीनं पाकिस्तानविरुद्ध आणखी काही धाडसी हल्ले घडवून आणले.

टीटीपीचं पुनरुज्जीवन

चार वर्षांच्या महसूदशिवायच्या कालखंडानंतर नूर वली महसूदकडे प्रमुखपद आल्यानं टीटीपीचं पुनरुज्जीवन झालं. फजलुल्लाह पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यातील पश्तुनच्या युसूफजाई या बिगरआदिवासी वंशातील होता. प्रखर बुद्धिमत्तेमुळे ओळखल्या जाणाऱ्या नूर वलीनं २०१४ मध्ये अनेक गटांत विभागल्या गेलेल्या टीटीपीचं एकत्रीकरण करण्याचं ठरवलं. त्याचप्रमाणे वलीनं टीटीपीचा पूर्व अफगाणिस्तानातील तळ आग्नेय पाकिस्तानातील वजिरीस्तान सीमेजवळ असलेल्या पाकटिका इथं हलवला.

पाकिस्तानातील माचिखेल झफरखेलमध्ये ता. २६ जून १९७८ रोजी जन्मलेला नूर वली धार्मिक विद्वान आणि लेखक आहे. पाकिस्तानमधील दक्षिण वजिरीस्तानमधील सररोगा या उपजिल्ह्यातील तो रहिवासी आहे. त्यानं फैसलाबादमधील जामिया इमाडिया, जामिया हलिमिया आणि जामिया फारूक-ए-आझम या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांतून शिक्षण घेतलं, तसंच गुजराँवाला (जामिया नुसरातूल उलूम) व कराचीतील जामिया अहसान-उल्-उलूम आणि जामिया यासीनूल कुराण या संस्थांतूनही धर्मशिक्षणाचे धडे गिरवले. धार्मिक आणि जिहादी ज्ञानाबद्दल त्याला दहशतवाद्यांमध्ये मान आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, टीटीपीचा पहिला प्रमुख बैतुल्ला महसूदचा तो सहायक होता, तसंच टीटीपीच्या न्यायालयाचा न्यायाधीश म्हणूनही त्यानं काम पाहिलं. त्याचप्रमाणे, टीटीपीच्या माध्यम विभागाचाही तो व्यवस्थापक होता. टीटीपतून फुटलेल्या गटांना नूर वलीनं त्याच्या नेतृत्वाखाली एकत्र केलं. त्याचप्रमाणे, पाकिस्तान व अफगाणिस्तानात लढणाऱ्या सर्व जिहादींसाठी एकच मोठी संघटना तयार करणं हे आपलं उद्दिष्ट असून, या संघटनेला ‘इत्तेहाद-ई-बैन उल् मुजाहिद्दीन’ असं नाव देण्याची इच्छा असल्याचेही त्यानं लिहून ठेवलं.

टीटीपीच्या विभागल्या गेलेल्या गटांतील परस्परसंघर्ष आता जवळपास थांबला आहे. टीटीपीशी संलग्न संघटनाही एकमेकींशी समन्वय साधत आहेत. यापूर्वी, हकीमुल्लाह महसूदच्या मृत्यूनंतर टीटीपीतील साजना, तसंच ओमर खालिद, खुरासनीचा जमात उल् अहरार, मुकाराम खानचा हिज्बुल अहरार आणि इतर गट एकमेकांविरुद्ध लढत होते. या गटांतील परस्परसंघर्ष आता संपुष्टात आला आहे. नूर वलीनं नोव्हेंबर २०१७ मध्ये ‘इन्कलाब-ए-महसूद, दक्षिण वजिरीस्तान : फिरंगी राज से अमरीकी साम्राज्यतक’ हे ५८८ पानांचं मोठं पुस्तकही लिहिलं. २००७ मध्ये पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली, या हत्येचीही जबाबदारी घेत असल्याचं या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. नूर वलीला सल्ला देण्याचं व मार्गदर्शनाचं काम अल् कैदा या दहशतवादी संघटनेनं केलं आहे. त्यासंदर्भातील पुरावे २०११ मध्ये ओसामा बिन लादेनच्या अबोटाबादेतील निवासस्थानातून मिळाले आहेत. अफगाण तालिबाननं काबूल जिंकल्यानंतर तेथील तुरुंगातून टीटीपीच्या शेकडो कैद्यांना मुक्त केलं. यात संघटनेच्या अमीर मौलवी फकीर मोहम्मदसारख्या संस्थापक-नेत्याचाही समावेश होता. टीटीपीनं पूर्व अफगाणिस्तानात मोठ्या मोटार-रॅली व काफिले काढून आपल्या सदस्यांच्या सुटकेचा आनंद केला. टीटीपीच्या नेतृत्वानं अफगाण तालिबानला स्वत:च्या सदस्यांपुढं ‘आदर्श’ म्हणून सादर केलं, तसंच पाकिस्तानविरुद्ध संपूर्ण युद्धाची हाकही या संघटनेकडून देण्यात आली. ‘हे युद्ध अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं मिळवलेल्या विजयाप्रमाणेच विजय मिळवून देईल,’ अशी ग्वाहीही टीटीपीनं दिली. तेव्हापासून पाकिस्ताननं टीटीपीच्या दहशतवादी हल्ल्यांची मालिकाच अनुभवली.

नुकतंच ‘टीआरटी वर्ल्ड’ या तुर्कस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘टीटीपीशी चर्चा सुरू आहे,’ असं सांगितलं होतं. त्यामुळे पाकिस्तानला धक्का बसला. सध्या अफगाणिस्तानमध्ये हक्कानी नेटवर्क सत्तेवर असल्यामुळे पाकिस्तान आणि टीटीपीत एक महिना शस्त्रसंधी करण्यावर एकमत झालं. मात्र, शस्त्रसंधीच्या करारातील आश्वासनही पाकिस्तानकडून पूर्ण होत नसल्याचा आरोप करत महिनाभरानं टीटीपीनं ती संपुष्टात आणली. मागील वर्षी नऊ नोव्हेंबरला हा शस्त्रसंधी-करार करण्यात आला होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तो पुढं चालू ठेवणं शक्य नसल्याचं सांगत टीटीपीनं शस्त्रसंधीला पूर्णविराम दिला. पाकिस्तानी १०२ कैद्यांच्या सुटकेचं आश्वासन दिलं गेलं होतं; पण ते पूर्ण करण्यात आलं नाही, असा आरोपही संघटनेनं केला. त्याचप्रमाणे स्वात, लक्की मारवात, स्वाबी आदी ठिकाणी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी टीटीपीविरुद्ध कारवाई करत संघटनेच्या सदस्यांना अटक करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचाही आरोपही टीटीपीनं केला.

पाकिस्तानपुढं अस्तित्वाचं संकट

पाकिस्तानमध्ये टीटीपीनं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसत आहे. या दहशतवादी संघटनेकडून एकट्या डिसेंबर २०२१ मध्येच १२० हल्ले करण्यात आले. पश्तुनख्वा भागातच ४५ हल्ले केले गेले. गेल्या वर्षी टीटीपीनं पाकिस्तानमध्ये सुमारे २८२ हल्ले केले. या हल्ल्याचा तडाखा ९७२ जणांना बसला. यातले काहीजण मृत्युमुखी पडले, तर काहीजण जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननं टीटीपीच्या अफगाणिस्तानातील कुनार प्रांतातील सुलतान जिल्ह्यातील चौगाम खोऱ्यातील टीटीपीच्या तळावर ड्रोनहल्ले केले. संघटनेचा कमांडर मौलवी फकीर मोहम्मद बाजौरी हा पाकिस्तानच्या सुरक्षा दलांचा लक्ष्य होता; पण तो या हल्ल्यांत बचावला. काही दिवसांपूर्वी खोस्त प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी टीटीपीच्या दौड मेहमूद या कमांडरची हत्या केली. टीटीपीबरोबरची शस्त्रसंधी आणि चर्चा फिसकटल्यानं या संघटनेला लगाम घालण्यात अफगाण-तालिबान आणि हक्कानी नेटवर्क अपेक्षेप्रमाणे सहकार्य करत नसल्याचं पाकिस्ताननं ओळखलं आहे.

अफगाणिस्तानमधून अमेरिकेनं माघार घेतल्यानंतर आणि तेथील सरकार कोसळल्यानंतर टीटीपीला होणारी आर्थिक मदत कमी झाली नसल्याचंही पाकिस्तानच्या लक्षात आलं आहे. टीटीपीनं पंजाबी जिहादी गट, अल् कैदा, पाकिस्तानमधील गुन्हेगारी टोळ्या, बलूच आणि सिंधी योद्ध्यांशी संबंध बळकट केले आहेत. एवढंच नव्हे तर, प्रतिस्पर्धी आयएसकेपीशीही जुळवून घेतलं आहे. बहुतेक पाकिस्तानी लष्कर संघराज्य प्रशासित आदिवासी क्षेत्रातून (एफएटीए) येत असल्यानं लष्करातून ‘झरब-ए-आझब’सारखी मोठ्या मोहिमेपुढं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातच अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यांचीही पूर्वीसारखी मदत नाही. त्यामुळेच, ड्युरांड सीमेवरून पाकवर दात-ओठ खाणाऱ्या अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं पाकिस्तानच्या अपयशी ड्रोनहल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानला धर्मद्रोही आणि पाकिस्तानी लष्कराला वसाहतवादी संबोधणाऱ्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला पाकिस्तानच्याच मुख्य भूमीवर मोठा पाठिंबा मिळत आहे.

या संघटनेकडून आता वजिरीस्तान आणि एफएटीएच्या बाहेरील भूमीवरही पाकिस्तानविरुद्ध धाडसी हल्ले केले जात आहेत. त्यासाठी, अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील माघारीनंतर पाकिस्तानमध्ये तस्करी केलेल्या शस्त्रास्त्रांचा व दारूगोळ्याचा वापर केला जात आहे. वाढत्या दबावामुळे टीटीपीचे दहशतवादी संपूर्ण जगाच्या सुरक्षेला धोकादायक असणाऱ्या ‘इसिस-के’मध्ये प्रवेशत आहेत. त्यात वजिरीस्तानमध्ये दहशतवाद्यांचं ‘नंदनवन’ निर्माण करण्यासाठी अल् कैदाही टीटीपीला निधी पुरवण्यासह मार्गदर्शनही करत आहे. पाकिस्तानच्या मुख्य भूमीतच मूलतत्त्ववाद्यांना समर्थन वाढत असून लष्करी कारवाईचा पर्यायही दिवसेंदिवस प्रभावहीन होत आहे. या सर्वांतून पाकिस्तानसमोर आता अस्तित्वाचं संकट गडद झालं आहे.

पाकिस्तानसमोर टीटीपीचं आव्हान

  • पाक लष्कराची २००७ मधील लाल मशिदीवर कारवाई, मशिदीतील १०० जणांचा मृत्यू

  • ‘ऑपरेशन‌ सायलेन्स’ नावाच्या या मोहिमेनंतर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या कडव्या दहशतवादी संघटनेचा उदय.

  • टीटीपीच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कराची ‘झरब-ए-आझब’ मोहीम. त्यानंतर ‘रद-ऊल-फसाद’ मोहीम

  • दक्षिण वजिरीस्तानमध्ये २००९ मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यांत टीटीपीचा संस्थापक बैतुल्ला महसूद ठार

  • हकीमुल्लाह महसूद टीटीपीचा नवा प्रमुख; अमेरिकेच्याच ड्रोन हल्ल्यांत २०१३ मध्ये हकीमुल्लाहाचाही खातमा

  • पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवरील हल्ल्यांतील सूत्रधार मुल्ला फजलुल्लाह २०१८ मध्ये अफगाणिस्तानात ड्रोन हल्ल्यांत ठार

  • चार वर्षांनंतर नूर वली महसूदकडे प्रमुखपद, टीटीपीचं पुनरुज्जीवन

  • पाकिस्तान-तालिबान दरम्यानचा शस्त्रसंधी महिनाभरानंतर संपुष्टात ; २०२० मध्ये टीटीपीचे

  • २८२ हल्ले, ९७२ जणांचा मृत्यू

(सदराचे लेखक आयपीएस अधिकारी असून, या लेखातील मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)

(अनुवाद : मयूर जितकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com