ढिंग टांग : जाच एजन्सियां...आन आम्ही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

british nandi writes Central Investigation Agency politics

ढिंग टांग : जाच एजन्सियां...आन आम्ही!

प्रति, होममिनिष्टर मोटाभाई यांसी, सतप्रतिसत प्रणाम.

साहेब, मी एक साधासुधासिंपल तपास अधिकारी असून आपल्याच केंद्रीय जांच एजन्सीमध्ये नोकरी करतो. (घरचे बरे चालले आहे.) संपूर्ण देशाला पोखरणाऱ्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्याची प्रतिज्ञा घेऊनच मी जांच एजन्सीत आलो.

आता मी ‘सीबीआय’ मध्ये आहे की ‘ईडी’मध्ये की ‘एनायए’मध्ये हे कृपया विचारु नका! एनसीबी, एसीबी, सीआयडी, आयबीआय असल्या आद्याक्षरांना तसा काही अर्थ उरलेला नाही. जांच एजन्सी म्हटले तरी पुरे!!

एरवीही लोक मला ‘सरकारी पोपट’ म्हणत होते. पण (पोपट असूनही) मी अजिबात किर्रकिर्र केली नाही. आपले काम बरे, आणि आपण बरे, याच वृत्तीने वागलो. उदाहरणार्थ, माझे बॉस मला फोन करुन सांगायचे : जांच करो. त्यांना त्यांचे बॉस फोन करुन सांगायचे : जांच करो.

त्यांच्या वरच्या बॉसचे बॉससुद्धा तेच सांगत असणार : जांच करो. साहेब, तुम्हालाही कोण तरी असे सांगत असेल. हो ना? पूर्वी आम्हाला लोक सरकारच्या हातातील कळसूत्री बाहुले म्हणजे पपेट म्हणायचे. पपेटचा पुढे अपभ्रंश होऊन पोपट झाला, असे मला (तपासाअंती) कळले.

पण हल्ली आपल्या ‘जांच एजन्सियां’चा (हिंदी चॅनलवाले असेच म्हणतात, साहेब!) खरोखर पोपट होऊ लागला आहे, हे निदर्शनास आणून देण्यासाठी पत्र लिहिण्याचे धाडस करत आहे. साहेब, गेले काही दिवस आम्ही चुकीच्या पद्धतीने, म्हणजे कायदे धाब्यावर बसवून अटक करत आहोत, असे लक्षात आले आहे.

काही प्रकरणात माननीय कोर्टाने आम्हाला ताणले, आणि अटक करण्यात आलेल्या वहिमीस जामीन बहाल केला! जांच एजन्सियां हात चोळत बसल्या साहेब! आमचे बरेच काही चुकत आहे, असे वाटू लागले आहे. एखाद्या संशयिताला अटक करतानादेखील कायदे पाळावे लागतात. रात्री अपरात्री, निव्वळ संशयावर अटकबिटक करुन चालत नाही.

रीतसर नोटिसबिटिस देऊन ‘अमूक अमूक तारखेला अमूक अमूक वाजता तुम्हांस अटक करणेची असून कार्यवाहीत अडथळा आणलेस सक्त कारवाई करणेत येईल’ अशी सूचना द्यावी लागते. पण आमच्या काही तपास अधिकाऱ्यांनी असले काही न करताच काही जणांना ‘उचलले!’ कारण हेच : जांच करो!

‘जांच करो’ हे शब्द वरिष्ठांच्या तोंडून आले रे आले की आमच्यापैकी काही जण उठून उभे राहतात. ‘जांच करो’ याचा अर्थ ‘उचलो’ असा झाला आहे. या उचलेगिरीवर लौकरात लौकर तोडगा निघाला नाही, तर आपल्या जांच एजन्सियांवर कुणी विश्वास ठेवणार नाही, साहेब. कुछ करो, लेकिन जांच मत करो!

‘जांच करना’ याने तपास करणे! पण या शब्दप्रयोगाचा मराठी अर्थ आमच्या लोकांनी घेतला, असे आता प्रथमदर्शनी दिसते आहे. मराठीत एखाद्याचा ‘जाच करणे’ म्हणजे छळणे!! (संदर्भ : सासु जाच करीते, नणंद छळीते...वगैरे वगैरे भोंडल्याची गाणी.) म्हणून तर आपल्या तपास यंत्रणांना माध्यमांमध्ये जांच एजन्सियां म्हणत नसतील ना? अशी शंका मनात येते.

साहेब, काहीही करा, पण हा जाच थांबवा. जे काही आहे ते कायद्याप्रमाणे होऊ द्या. हल्ली मी जाच यंत्रणेत काम करतो, हे बाहेर सांगण्याची चोरी झाली आहे. नातलगदेखील भेटले की रिटायर कधी होणार? असे विचारु लागले आहेत. तेव्हा, लौकरात लौकर कार्यवाही करावी. आदेश देतानाच ‘शोध घ्या’ असा द्यावा. बाकी सर्व आपल्या कृपेने ठीक आहे. जय हिंद. आपला आज्ञाधारक आणि विश्वासू. एक निनावी जाच अधिकारी.