ढिंग टांग : गर्दीच्या शोधात…! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

British Nandi writes dasara melava 2022 shiv sena uddhav thackreay eknath shinde politics

ढिंग टांग : गर्दीच्या शोधात…!

मा झे सर्व सहकारी आणि उठावात सामील झालेल्या बंडखोरांनो, जय महाराष्ट्र. कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की यंदा दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी बांद्रे येथील संकुलाच्या विशाल मैदानावर अतिविशाल मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा दरसाली शिवाजी पार्क येथे होतो, काही कारणाने ते मैदान रिझर्व झाल्याने मेळाव्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने येथे जमावे. मेळाव्याला कमीत कमी आठ-दहा लाख लोक तरी आले पाहिजेत, अशी तयारी करावी. आपला मेळावा आतापर्यंतचा सर्वात मोठा मेळावा झाला पाहिजे, अशी इच्छा दिल्लीतील आपले मार्गदर्शक आणि हितचिंतक आणि गुरुजनांनी व्यक्त केली आहे.

आपण केलेल्या उठावाची दखल तेहेतीस देशांनी घेतली होती. आपल्या मेळाव्याची दखल एकशेतेहेतीस देशांनी घेतली पाहिजे. मेळावा जोरकस व्हावा, म्हणून अनेकांनी सूचना केल्या आहेत. यंदाचा दसरा मेळावा गुवाहाटी येथे घ्यावा, अशीही सूचना पुढे आली होती. सुरत येथेही मेळाव्यासाठी मोठे मैदान उपलब्ध झाले असते. पण काही अपरिहार्य कारणास्तव अशा सूचना स्वीकारता आल्या नाहीत! असो.

बीकेसी संकुलातील पटांगणात फिरता पाळणा, घोडेचक्र, फिरती कपबशी, भूतबंगला, मौत का कुआं, आनंद बाजार आदी मनोरंजनाची साधनेही उपलब्ध व्हावीत, अशी मागणी एका बंडखोर नेत्याने केली होती. निरनिराळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावावेत, त्यात सुरती उंधीयु, फाफडा, ढोकळा, पाणीपुरी, दाबेली, फुकट उपलब्ध करुन द्यावेत, अशीही एक योजना सुचवण्यात आली. परंतु, तेवढ्या खर्चात आणखी एक उठाव करणे सहज जमून जाईल, असे लक्षात आल्याने ती योजना गुंडाळण्यात आली.

महाराष्ट्रभरातून वाहने भरभरून आपले कार्यकर्ते मेळाव्यासाठी जमा होणार आहेत. महाराष्ट्रभरातूनच कशाला; गुजरात, आसाम आणि गोव्याहूनही बसगाड्या निघाल्या होत्या. पण आम्हीच त्यांना सध्या येऊ नका असे कळवले आहे. आपल्यामागे एक जागतिक महाशक्ती उभी आहे. पाकिस्तान, चीनलासुद्धा या महाशक्तीने सळो की पळो केले. आपला मेळावा यशस्वी होणारच. दसऱ्याला भेटूच. बाकी भेटीअंती बोलू. मुद्दा एवढाच की, गर्दी जमवा! नुसते येऊ नका!!

कळावे, आपला. कर्मवीर.

माझ्या तमाऽऽम बंधूंनो, भगिनीन्नो आणि मातांनो, जय महाराष्ट्र. काय बोलू? बोलण्यासारखं खूप आहे, पण दसऱ्याच्या मेळाव्यासाठी शिल्लक ठेवलंय. तिथं बोलणार आहे. बोलणार म्हंजे बोलणारच. का नको बोलू? बोललंच पाहिजे. बोलल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या मुळावर आलेली ही गद्दारांची औलाद गाडल्याशिवाय राहणार नाही. कितीही अफझुल खान अंगावर आले तरी बेहत्तर, आम्हाला पर्वा नाही!

सालाबादप्रमाणे यंदा दसरा मेळावा शिवतीर्थावरच पार पडेल. पडेल म्हंजे पडेलच! पडणार…पाडवणार!! हे मी कुटुंबप्रमुख या नात्याने सांगतोय. माझं कुटुंब ही माझी जबाबदारी आहे. हल्ली कुटुंब थोडं आटोपशीर झालंय. पण जे उरलेत, ते अढळ आहेत. बाकीचे ढळले!! त्या ढळलेल्या खोकेवाल्यांनी आमच्या घराच्या पाठीमागे (बीकेसी मैदानात) दुसरा मेळावा घेण्याचं ठरवलंय. मेळावा कसला? ढळावा म्हणा!!

दसऱ्याच्या दिवशी विचारांचं सोनं लुटायला मोठ्या संख्येने शिवतीर्थावर जमा. येताना आपापली वाहने योग्य रस्त्यावरच ठेवा. चुकीचा राइट घ्याल, आणि तुमचं वाहन थेट ‘बीकेसी’त जाऊन उभं राहील. दगाफटका होऊ देऊ नका. विचारांचं सोनं लुटायला मुंबईत याल, आणि कुविचारांचा कचरा पदरात पडेल! बाकी दसऱ्याच्या दिवशी बोलूच. जय महाराष्ट्र.

आपला उ. ठा.