ढिंग टांग : आगीशी खेळ!

British Nandi writes Precious fuel  kerosene Fire brigade fuel
British Nandi writes Precious fuel kerosene Fire brigade fuel sakal

बेटा : (अग्निशामक दलाच्या शिपायाच्या आवेशात) ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (दचकून) क…क…कोण तुम्ही? इथं कशाला आलात? काय काम आहे?

बेटा : (हेल्मेट काढून हातात घेत) मम्मा, ओळखलं नाहीस का मला? मी…मी आलोय! युवर वन अँड ओन्ली फायरब्रँड लीडर!!

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) जळ्ळं मेलं लक्षण! तू आहेस होय!!

बेटा : (हेल्मेट पुन्हा परिधान करत) कुठे काय जळतंय, तेच विझवायला चाललोय!

मम्मामॅडम : (कमरेवर हात ठेवून वरपासून खालपर्यंत न्याहाळत) हा कुठला ड्रेस?

बेटा : (दक्ष पोजमध्ये उभे राहात) …मी फायर ब्रिगेडचा माणूस आहे! कुठेही आग लागली की आम्ही धावून जातो!

मम्मामॅडम : (कंटाळून दुर्लक्ष करत) हुं:! पक्षाची खूप कामं आहेत मला, भूक लागली असेल तर-

बेटा : (वैतागून) कमॉन, मम्मा! आख्ख्या देशाला कुठल्याही क्षणी आग लागणार आहे, आणि अशा परिस्थितीत तुम्हाला पक्षकार्य सुचतं? ही वेळ पक्षीय राजकारण विसरुन देश वाचवण्याची आहे!!

मम्मामॅडम : (कागदपत्रांमध्ये डोकं घालत) कुठं लागलीये एवढी आग?

बेटा : (आश्चर्यानं) डोंच्यु नो? या कमळवाल्यांनी आख्ख्या देशात घासलेट शिंपडलंय, कुणीतरी काडी ओढण्याचा अवकाश…धडधडा पेटेल सगळं! अशा स्थितीत आपल्याला आगीचे बंब घेऊन तयार राहायला नको का?

मम्मामॅडम : (अचंब्यानं) ओह माय गॉड? घासलेट म्हंजे?

बेटा : (बाटलीचा आकार दाखवत) घासलेट म्हंजे केरोसीन…रॉकेल! हा एक अत्यंत ज्वालाग्राही द्रवपदार्थ असून स्टोचा भडका उडण्यास कारणीभूत होतो! एरवी ते स्वयंपाकासाठी वापरतात, पण ते या कमळवाल्यांनी देशभर शिंपडलंय!!

मम्मामॅडम : तरीच मला काल कसला तरी उग्र वास येत होता!!

बेटा : (दुर्लक्ष करत) काल मी केंब्रिज विद्यापीठातही ही ‘केरोसिन थिअरी’ सांगितली! पब्लिकला जाम आवडली!! सर्वांनी आपापल्या ठिकाणी वाळूच्या बादल्या, अग्निशामक सिलिंडर, पाण्याची पिंपं भरुन ठेवावीत, अशा सूचनाही मी केल्या!

मम्मामॅडम : (निषेधाच्या सुरात) रॉकेलसारखं बहुमोल इंधन वाट्टेल तिथे शिंपडून वाया घालवणं हा राष्ट्रीय संपत्तीचा दुरुपयोग आहे!! या कमळवाल्यांना धडा शिकवलाच पाहिजे!!

बेटा : (विजयी मुद्रेने) पण मी त्यांचा हा आगीशी चाललेला खेळ चालू देणार नाही, मम्मा! बाहेर बघ, मी आज फायर ब्रिगेडचा बंबच घेऊन आलोय!!

मम्मामॅडम : (खिडकीतून बाहेर पाहात) खरंच की!

बेटा : (डोळे मिटून गंभीरपणाने) कमळवाल्यांनी लावलेली विद्वेषाची, विखाराची आग विझवण्यासाठी हा आपला आगीचा बंबच कामाला येईल, मम्मा! मी हातात होस पाइप घेऊन उभा राहीन, आणि आग लागली रे लागली की, जोरात फवारा उडवून तिथल्या तिथे विझवून टाकीन!! आहे काय, नि नाही काय!

मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) जमणार आहे का तुला? बघ बुवा! नसता आगीशी खेळ नको! आगीशी खेळलं तर रात्री-

बेटा : प्रेम, बंधुत्त्व भाव आणि समानतेचा वर्षाव करुन मी विद्वेषाची आग विझवीन, मम्मा! त्यांनी आग लावावी, मी प्रेमाचा पूर आणीन! त्यांचं अग्नेयास्त्र, तर माझं पर्जन्यास्त्र!!

मम्मामॅडम : (चिंतेत पडून) देवा परमेश्वरा!!..आत्तापर्यंत तू आपल्या पक्षाचा एकमेव फायरब्रँड नेता होतास रे !

बेटा : (सज्ज होत) डोण्ट वरी मम्मा! आयम पुष्पा…फायर नही, फ्लॉवर है!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com