बुद्धकालीन चित्र-शिल्प-कलासंस्कृती

शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, संगीत आदी कालमानानुसार विकसित झालेल्या कला. यांत प्रामुख्यानं भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व दिसून येतं. या सर्व कला आजही सादर केल्या जातात तेव्हा त्यांचा ताल-सूर-रंग-आकार-लय यांतून भारतीय संस्कृतीचा आशय व महानता प्रकट होते.
buddha era painting craft art culture
buddha era painting craft art cultureSakal

- प्रसाद पवार

शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, संगीत आदी कालमानानुसार विकसित झालेल्या कला. यांत प्रामुख्यानं भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व दिसून येतं. या सर्व कला आजही सादर केल्या जातात तेव्हा त्यांचा ताल-सूर-रंग-आकार-लय यांतून भारतीय संस्कृतीचा आशय व महानता प्रकट होते.

चित्र आणि शिल्प या कलाकृती आपण बघत असताना त्यांमधली अनेक सौंदर्यस्थळं, अनेक कलात्मक मूल्यं आदींची चर्चा केली जाते. अशा सौंदर्यस्थळांचं, कलात्मक मूल्यांचं विश्लेषण केली जातं. मतं प्रकट केली जातात व मग ती कलाकृती कलाकृती म्हणून स्वीकारली जाते.

मुळात एखादी कलाकृती - उदाहरणार्थ : चित्र आणि शिल्प- कशा पद्धतीनं अभिव्यक्त केली जाते यासंदर्भात विचार केला तर असं लक्षात येतं की, प्रत्येक चित्राची-शिल्पाची निर्मिती ही विशिष्ट कलात्मक दृष्टिकोनातून केलेली असते.

आपल्याला एखादं चित्र आवडतं आणि ते सुंदर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात असं नेमकं काय असतं की ज्यामुळे ते आपल्याला आकर्षित करतं...आनंदित करतं...समाधान देतं? त्या कलाकृतीशी आपण नकळतपणे कोणत्या घटकांमुळं जोडले जातो?

हे जाणून घेण्यासाठी, कला कशी बघावी, कलेत नेमकं काय शोधावं, कला कशा पद्धतीनं समजून घ्यावी, कलाकृती निर्माण करण्यामागचा चित्रकाराचा-शिल्पकाराचा उद्देश काय आहे...अशा अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात.

आणि, ही कलाकृती ज्या ठिकाणी स्थापित करायची आहे त्या परिसरातलं साजेसं वातावरण हाही पैलू लक्षात घेऊन त्यावर विचार करावा लागतो. बुद्धकालीन कलानिर्मितीत ‘भारतीय संस्कृती’ प्रकर्षानं जाणवते; कारण, साहित्यातली संस्कृती ही ‘सांस्कृतिक पुरावा’ म्हणून अभ्यासली जात असली तरी तीतून निर्माण होणारी व्हिज्युअल्स ही साहित्य अभ्यासणाऱ्या व्यक्तीच्या माहितीवर-ज्ञानावर आधारित असतात व हे आभासी चित्रण हे इतरांसाठी व्यक्त करताना पुन्हा शब्दांचा आधार घ्यावा लागतो;

म्हणजेच, साहित्यात अनेक शब्दांचा आधार घेऊन निर्माण होणारा आशय हा चित्र-शिल्प या माध्यमांतून अधिक उत्तमरीत्या समूहासमोर मांडता येतो. चित्र-शिल्प यांना स्वतःची एक भाषा असल्यामुळे कुठलाही शब्द न उच्चारतादेखील कलाकृतीचा आशय व्यक्त होणारी भावना ही सर्वांपर्यंत एकसारखीच, एकाच तीव्रतेची आपल्याला पोहोचवता येऊ शकते.

कदाचित् जगभरात भाषा वेगवेगळ्या असतील; पण एकाच भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या दोन व्यक्ती जोपर्यंत समोरासमोर येऊन संवाद साधत नाहीच तोपर्यंत भाषेच्या माध्यमातून विचारप्रकटन शक्य होत नाही; परंतु चित्र व शिल्प या माध्यमांतून सभोवतालचं वातावरण, वेगवेगळे आकार, रंग, समाजजीवन घडणारी घटना, प्रबोधन किंवा एखादी अंतरंगातली माहिती आपण आकारमानासह दर्शकांसमोर ठेवू शकतो व त्यावर संवाद साधता येऊ शकतो.

एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर घडत असते. त्या घटिताला आपण वर्तमान म्हणतो. आणि, जी घटना काही क्षण अगोदर घडली तर...काही वर्षं अगोदर घडली तर... काही तपं अगोदर घडली तर आपण त्याला भूतकाळ म्हणतो. खरं तर भूतकाळ, व भूतकाळातल्या घटना यांना आपण इतिहास असं संबोधतो.

हजारो वर्षांपूर्वी घडून गेलेल्या या सर्व घटना आज आपण जेव्हा वर्तमानामध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण खरं तर इतिहास समजून घेत असतो व त्याबरोबरच त्या काळातली - आपण प्रत्यक्ष बघत नसलेली एखादी घटना - जी घडून गेली आहे, तिचा मागोवा घेत असतो. हा झाला प्राथमिक भाग; परंतु या भूतकाळातले इतिहासामधले प्रसंग जेव्हा आपल्यासमोर प्रतिमेतून दिसतात तेव्हा मात्र इतिहास आपल्याशी बोलायला लागतो; कारण, त्या काळी सर्व घटना प्रत्यक्ष घडत असताना जशा दिसत असू शकतील तशाच प्रकारची चित्र-शिल्पनिर्मिती केली गेलेली असते.

आधुनिक जगात प्रत्येक गोष्टीसाठी प्रमाणशीर मोजमाप तयार होत गेलं. त्यानुसार चित्र-शिल्प-सौंदर्यशास्त्र यांच्यासाठीही अनेक परिमाणं, मोजमापं, गणितं आली. या आधुनिक मापदंडांचा निकष लावला तर अनेक चित्र-शिल्प आपल्याला अद्भुत आनंद देतात, असं लक्षात येईल. म्हणजे, गेल्या चारशे वर्षांत चित्र-सौंदर्यशास्त्र व शिल्प-सौंदर्यशास्त्र ज्या निकषांनुसार निर्माण केलं, त्या निकषांचा व प्रमाणांचा जगभरात प्रसार झाला व ते प्रमाण कलाकृती निर्माण करताना गृहीत धरलं गेलं. परिणामी, जगभरात चित्रनिर्मिती आणि शिल्पनिर्मिती यांमध्ये अनेक सौंदर्यमूल्यं निर्माण झाली.

भारतीय संस्कृती ही विविध प्रकारच्या ग्रंथांमध्ये ग्रथित झालेली आहे. त्या ग्रंथांमधून ती आपल्यापर्यंत पोहोचते. यामध्ये अगदी, हस्ताक्षर कसं असावं इथपासून ते चित्र व शिल्पनिर्मिती करताना कुठल्या कुठल्या विषयांचा विचार करावा, कोणती सौंदर्यमूल्यं जपावीत यांसारख्या विषयावर विस्तृत साहित्य आहे.

रेषा-रेषासौंदर्य-आकार-रंग-रंगशास्त्र-मानवी आकार व त्यांची प्रमाणबद्धता- निसर्ग-पानं-झाडं-फुलं आदी अनेक विषयांवरचं लेखन उपलब्ध आहे व या साहित्यातल्या वर्णनानुसार विविध प्रकारची चित्र-शिल्पनिर्मिती भारतभर बघायला मिळते.

चारशे वर्षांपूर्वी जगभरात चित्र व शिल्पनिर्मिती करताना उत्तम सौंदर्याचं जे काही मूल्यमापन झालं त्यानुसार तयार केलेल्या रचना आजही अबाधित आहेत. असं असतानाही मला दोन हजार वर्षांपूर्वी भारतभर ज्या स्मारकांची निर्मिती झाली, ज्या गुहांची व मंदिरांची निर्मिती झाली, त्यांच्याकडं चिकित्सक नजरेनं पाहता असं लक्षात येतं की, भारतीय कलाकारांनी त्या काळी केलेलं काम हे मुळातच आधुनिक सौंदर्यशास्त्राचा वापर करूनच केलेलं आहे.

प्रत्येक जण नवनिर्मिती करत असतो. या नवनिर्मितीत काहीतरी वेगळं, नियमांपेक्षा अमूर्त अशा स्वरूपाच्या कल्पना प्रत्यक्षात उतरताना आपल्याला दिसतात; परंतु भारतीय चित्र आणि शिल्प या कला ही प्रामुख्यानं सांस्कृतिक प्रतीकं आहेत. या सर्व कलांमधून संस्कृतीची झलक पाहायला मिळते व ही संस्कृती दोन ते पाच हजार वर्षांपासून आपल्याला सौंदर्यातल्या महत्त्वाच्या रचना प्रदान करत आहे.

अगदी सिंधुसंस्कृतीतली धातुशिल्पं आणि मातीतल्या रचना जर पाहिल्या तर, मला असं वाटतं की, त्या काळाच्या तुलनेनं आज आपण फार मोठा टप्पा गाठला असं वाटत नाही; कारण, कठीण दगडातही मुलायम सौंदर्य निर्माण करण्यात हजारो वर्षांपूर्वीचे भारतीय कलाकार नक्कीच यशस्वी झालेले आहेत.

दगडातही ताल आणि सूर यासंदर्भातले आवाज यशस्वीरीत्या निर्माण करून आजही आपल्यासमोर तशा निर्मितीचं मोठं आव्हान उभं आहे. पूर्वीच्या काळातली दगडातली एखादी प्रतिमा अगदी जिवंत व्यक्तीसारख्या संवेदना प्रकट करते असं वाटतं, तसंच दगडात विशिष्ट जाडीचा आकार कोरून त्यातून संगीताचा नाद तयार करण्यात आपले पूर्वज नक्कीच यशस्वी झाले होते.

आपण सर्व भारतीय या चित्र-शिल्प निर्मितीतल्या प्राचीन बौद्धिक संपदेचा जन्मातःच अधिकार असलेले कलाकार आहोत व त्यामुळे या बौद्धिक संपदेचा वापर करून आधुनिक तंत्रात ‘सांस्कृतिक आशय’ अधिकाधिक प्रकट व्हायला हवा.

भारतीय संस्कृती, कलासंपदा ही जागतिक स्तरावर सॉफ्ट पॉवर समजली जाते. ही सॉफ्ट पॉवर आपण जास्तीत जास्त वापरायला हवी; जेणेकरून आपल्या कलाकृतीतून भारतीय संस्कृती प्रकट होईल व आपण जी कलात्मक निर्मिती केली आहे ती भारतीय संस्कृतीची ठेव म्हणून जपली जाईल. त्यासाठी अधिकाधिक उत्तम चित्र-शिल्पनिर्मिती होणं आवश्यक आहे.

(लेखक हे रिसर्च फोटोग्राफर व रिस्टोरेशन आर्टिस्ट, तसंच अजिंठा कलासंस्कृतीचे प्रतिनिधी आणि राज्य शासनाच्या ‘सांस्कृतिक धोरण समिती’चे सदस्य आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com