बालपण जपणारी ‘टॉय लायब्ररी’ (व्हिडिओ)

बालपण जपणारी ‘टॉय लायब्ररी’ (व्हिडिओ)

बिझनेस वुमन  - डॉ. समीक्षा अग्रवाल 
खेळण्यांची दुकाने एक अद्‌भुत दुनिया असते. येथे मोठेही लहान होतात आणि सर्व बंधने झुगारत वयाचे काटे मागे फिरतात. लहान मुले म्हटल्यावर सुटी, खेळ आणि खेळणी यांचे नाते अतूट आहे. मात्र कमी होत चाललेली मैदाने आणि मैदानी खेळांची जागा मोबाईल फोनने व्यापल्याने मुलांचे खेळणे कमी झाले आहे. ‘पब्जी’सारख्या गेममुळे निरागसता हरवत चालली आहे. मुलांच्या या समस्येवर उपाय शोधला आहे डॉ. समीक्षा अग्रवाल यांनी.

डॉ. समीक्षा सांगतात, ‘‘लहान मुलांची डॉक्‍टर या नात्याने माझ्यासमोर या सगळ्या समस्येवर उपाय शोधण्याचे आव्हान होते. यातूनच जन्म घेतला खेळण्यांची बॅंक अर्थात ‘किडोकीन’ या टॉय लायब्ररीने. खेळण्यांविषयी लहान मुलांना एक वेगळेच आकर्षण असते. अलीकडे मात्र या खेळण्यांची जागा डिजिटल खेळण्यांनी घेतलेली दिसते. ही खेळणी पाहिल्यावर लहान मुलांची निरागसता काळाच्या ओघात लोप पावते की काय, अशी भीती वाटते. मात्र मुलांमधील हे बालपण जपले पाहिजे. त्यामुळेच केवळ व्यावसायिक नफ्यासाठी ही टॉय लायब्ररी न उभारता मुलांनी त्यांच्यातील निरागस बालपणाला जपावं, हाच उदात्त हेतू मी ठेवला.’’ 

टॉय लायब्ररीच्या गरजेबद्दल डॉ. समीक्षा सांगतात, ‘‘आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक पालकांकडे मुलांच्या भावविश्‍वात डोकावण्यास, त्यांच्यासाठी विविध खेळणी घेऊन देण्यास वेळ नसतो. त्याव्यतिरिक्त बाजारात इतक्‍या प्रकारची खेळणी उपलब्ध आहेत की, त्यातून आपल्या मुलांसाठी योग्य खेळणी निवडणे जिकिरीचे काम असते. खेळण्यांच्या भरमसाट किमती हा आणखी वेगळा मुद्दा. त्यामुळेच पालकांवरील भार कमी करण्याचा आणि मुलांना अशी खेळणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. या खेळांच्या मदतीने मुले अभ्यासातही प्रगती साधू शकतील. मुलांकडे खेळणी असतात, मात्र त्यांचा मुलांना लवकर कंटाळा येतो आणि ते नव्या खेळण्यांची मागणी करू लागतात. त्यामुळे मी टॉय लायब्ररीसारखा मंच उपलब्ध करण्याचा विचार केला. इथे मुलांना खेळणी भाडेतत्त्वावर खेळण्यासाठी दिली जातील आणि पालकांना सतत नवी खेळणी खरेदी करण्याचा भुर्दंडही बसणार नाही. पालक घरी बसून आमच्या खेळणी आणि पुस्तकांच्या संग्रहातून मुलांच्या आवडीच्या वस्तू निवडू शकतात. ही खेळणी आम्ही त्यांना घरपोच देतो. यातून पालकांचा वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत होते.’’

‘‘तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करीत असताना तुमच्या आवडत्या गोष्टींकडे, छंदांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्यातूनच तुमचा आवडता आणि समाधान देणारा व्यवसाय तुम्हाला नक्की सापडेल,’’ असा सल्ला डॉ. समीक्षा देतात.

(डॉ. समीक्षा अग्रवाल)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com