‘गोड’ व्यवसायातील उद्योजिका (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

बिझनेस वुमन - मैत्रेयी आठवले, संचालिका,आठवलेज्‌ फूड इंडस्ट्रीज
सर्वाधिक वेगाने वाढणारे क्षेत्र कोणते आहे, असे विचारले तर वेगवेगळी उत्तरे मिळतील. मात्र सध्या सर्वाधिक नफा आणि वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणजे ‘फूड इंडस्ट्री’! सासूबाईंनी सुरू केलेल्या लहानशा घरगुती उद्योगात मैत्रेयी आठवले यांनी पुढाकार घेऊन आज ‘आठवलेज्‌’ असा एक ‘ब्रॅंड’ तयार केला. आता ‘आठवलेज्‌’ म्हणाल तर लोकांना स्वादिष्ट गोड वड्याच डोळ्यांसमोर दिसतात. सासूबाईंनी घरगुती स्वरूपात सुरू केलेल्या उद्योगाचा पसारा आता मैत्रेयी यांनी पुढाकार घेऊन काही कोटींमध्ये नेऊन ठेवला आहे.

मैत्रेयी यांनी पती मिलिंद यांच्या मदतीने खाद्यपदार्थांचा उद्योग आधुनिकतेची कास धरत ऑनलाइनच्या माध्यमातून भारताबरोबर ऑस्ट्रेलिया, ॲटलांटा, दुबई, आबुधाबी, कॅलिफोर्निया, बोस्टन, राँचेस्टरमध्येही पोचवला आहे. बघताना छोट्या काजूवडीचा उद्योग! मात्र मैत्रेयी यांनी यात विविध प्रयोग करत अनेक उत्पादने लोकांना उपलब्ध करून दिली आणि ती लोकांच्या पसंतीस उतरत गेली. आज बाजारात आठवलेंच्या वड्या म्हणून जांभूळवडी आणि सीताफळवडी फेमस आहे. काही वड्या केवळ मैत्रेयी तयार करतात. त्या बाहेर कुठेही सहसा मिळत नाहीत.

त्यामुळे यांच्या खाद्यपदार्थांना सर्वत्र मागणी वाढली. सुरवातीला फक्त काजूवडी होती. मात्र श्रीखंडवडी, आम्रखंडवडी, आंबावडी, उपवासवडी अशा विविध पदार्थांची यादी वाढत गेली. यामध्ये नमकीन पदार्थांचादेखील समावेश केला.

दिवसाला दोन किलो ते वीस किलो अशा लहान प्रमाणात हा व्यवसाय सुरू झाला. मात्र आता संक्रातीच्या दिवसात एका दिवसात अडीचशे किलोपर्यंत तिळाच्या वड्या बनविल्या जातात. व्यवसायाविषयी सांगताना मैत्रेयी म्हणतात, ‘कोणताही व्यवसाय असो, त्यामध्ये कर्मचारी हा एक महत्त्वाचा भाग असतो. ते खूश असतील तर तुमच्या व्यवसायावर काहीही संकटे आली तरी तेच कर्मचारी तुमच्या पाठीशी उभे राहतात. जसे ग्राहक हा राजा असतो तसा कोणत्याही व्यवसायात कर्मचारी हा त्या व्यवसायाचा ‘प्राण’ असतो. त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा देऊ केली.

खाद्यपदार्थांच्या व्यवसायात दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे स्वछता. ती कर्मचारी, पदार्थ बनविणाऱ्या मशिनपासून ते विविध स्तरांवर ठेवणे आवश्‍यक आहे.’’

त्या म्हणाल्या, ‘‘एकदा एखादा व्यवसाय सुरू झाला, की त्यापासून इतर अनेक उद्योगदेखील जन्माला येतात. ते तुम्ही चाणाक्ष नजरेने हेरले पाहिजेत. आम्ही घरगुती उद्योगाला मोठे स्वरूप देण्यास सुरवात केली, त्या वेळी आमच्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा मला आमच्याच कर्मचाऱ्यांना सांगून तयार करून घेतला. कर्मचाऱ्यांना आम्ही घरघंटी घेण्यास मदत केली.

यातून काही कर्मचारी आमच्याकडे नोकरी करत असताना त्यांच्या घरातील लोकांनादेखील काम मिळाले. थोडक्‍यात स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन त्यांनादेखील स्वयंपूर्ण केले.’’
(शब्दांकन - गौरव मुठे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: business women maitreyi athawale maitrin supplement sakal pune today