
मुहूर्ताची मंगल घटिका कधीची असावी? हा यक्षप्रश्न होता. ‘‘जरा आधीचा नाही का निघणार?’’ हात जोडोनी नमोभावे…सॉरी…मनोभावे बसलेल्या नानासाहेबांनी विचारणा केली.
ढिंग टांग : मुहूर्ताचा मुहूर्त कुठला?
‘‘आ एक मास जवां दो, पछी जुओ..!,’’ ज्योतिर्भूषण मोटाशास्त्री कुंडलीतील ग्रहांकडे टक लावून बघत म्हणाले, आणि समोर बसलेल्या जोडप्याचे काळीज लकलकले! आणखी एक महिना? लागली वाट! नाथाभाई आणि नानासाहेब हे दोन्ही जातक आपापल्या कुंडल्या घेऊन मोटाशास्त्रींसमोर बसले होते, मोठ्या अपेक्षेने पाहात होते. मुहूर्ताची मंगल घटिका कधीची असावी? हा यक्षप्रश्न होता. ‘‘जरा आधीचा नाही का निघणार?’’ हात जोडोनी नमोभावे…सॉरी…मनोभावे बसलेल्या नानासाहेबांनी विचारणा केली.
‘‘हो, जरा आधीचा नाही का निघणार?,’’ तितक्याच मनोभावे शेजारी बसलेल्या नाथाभाईंनी ‘मम’ म्हटले. नानासाहेब बोलले की, नाथाभाई बोलतात! ‘नाना बोले, दळ हाले,’ ऐसी ऐतिहासिक परिस्थिती!
‘‘ चान्सज नथी…तमारे बध्दानां कुंडली मां मंगळ ग्रह कुंडली मारुन बसला हाय!,’’ मोटाशास्त्रींनी ग्रहांचा असहकार जाहीर केला. हा मंगळ नावाचा ग्रह राष्ट्रवादीवाला असावा, असा संशय येऊन ‘कुंडली मारुन बसला आहे, म्हंजे काय?’ असे नाथाभाईंनी नानासाहेबांच्या कानात विचारले. ‘‘कुंडली म्हंजे विळखा…अजगर घालतो तसा! गप्प बसा जरा..,’’ नानासाहेबांनी कुजबुजत्या आवाजातच त्यांना जामले. नाथाभाईंचा संशय आणखी बळावला. होरापंडित मोटाशास्त्रींनी घडाघडा ग्रहगोलांची
स्थिती विशद केली. एकंदरित संमिश्र फल होते. यश मिळेल, पण सहजासहजी मिळणार नाही. विजय तुमचाच आहे, पण मोठी लढाई लढावी लागेल, पर्यटनाचे योग दिसतात, त्यामुळे स्थैर्य मिळणे कठीण…अशी अनेक फलिते मोटाशास्त्रींनी कुंडल्या बघत सांगितली. ‘‘तुम्ही खूप विश्वासाने मदत करता, पण लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत’’ हे जेव्हा मोटाशास्त्रींनी सांगितले, तेव्हा नाथाभाईंना हुंदका आवरला नाही. याउलट नानासाहेबांचे!! हे ज्योतिषवाले भविष्य
सांगताना, ग्रहांची पोझिशन नेहमी डिटेलवार सांगतात, आणि भविष्य मात्र मोघम सांगतात, असे का? असे विचार त्यांच्या मनात चोचा मारत होते. मनातल्या नकारात्मक विचारांचे कावळे नानासाहेबांनी झटकले. दुखऱ्या आवाजात ते इतकेच म्हणाले, ‘‘ मोटाशास्त्री, मागल्या वेळेला तुम्ही माझ्याबाबत केलेली
प्रत्येक भविष्यवाणी खरी ठरली होती…पण यावेळी काय झालं हो?’’
‘‘तेच्या असा हाय नानाभाय, के आपडा गुरु प्रबळ असला ने, की किती पण ट्राय करा, तुमच्या प्रमोसन होणारज!,’’ मोटाशास्त्रींनी गुरुमहिमा सांगितला. हे बाकी खरे आहे…नानासाहेबांनी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहण्याचा हर प्रकारे प्रयत्न करुन प्रमोशन नाकारले होते. पण गुरु प्रबळ झाल्यावर काय करता? इच्छा नसताना उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागले. ‘आले गुरुच्या मना, तेथे काय कोणाचे चालेना,’ हेच खरे…
…पण आपले प्रमोशन झाले की डिमोशन? हा नवा प्रश्न नानासाहेबांच्या मनात टोच मारुन गेला.
‘‘…आमचं टिकंल का?,’’ नाथाभाईंनी थेट सवाल केला. नानासाहेब चपापले. त्यांनी हळूचकन नाथाभाईंना चिमटा काढला. मोटाशास्त्रींनी पुन्हा कुंडलीत तोंड घातले. बराच वेळ काही आकडेमोड केली, आणि एक सुस्कारा सोडत म्हणाले, ‘‘ पती गयो, सूपडा साफ…’’ दोघेही जातक दचक दचक दचकले! काही तरी भयंकर घोटाळा (कुंडलीत) झाला आहे, या कल्पनेने त्यांच्या पोटात खड्डाच पडला.
‘‘सावननां महिना शुरु छे, सध्या मुहूरतच नाय हाय!,’’ मोटाशास्त्रींनी सांगून टाकले. दोन्ही जातकांचे मग बोलणेच खुंटले. शेवटी नानासाहेबांची चतुराईच कामी आली. मोटाशास्त्रींच्या हातातल्या कुंडल्या हळूचकन काढून घेत ते म्हणाले, ‘‘ मंत्रिमडळाच्या मुहूर्ताचं राहू द्या हो, शास्त्रीबोआ! मुहूर्त काढायचा मुहूर्त कुठला, ते विचारायला आलो होतो..!’’