साहसी निसर्गानुभव

कॅनडा म्हणजे क्षेत्रफळानुसार संपूर्ण जगात नंबर दोनवर असलेला देश. लांबच लांब समुद्रकिनाऱ्यासाठीसुद्धा तो ओळखला जातो. कॅनडाला दोन लाख किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. निसर्गाचे अप्रतिम दान कॅनडाच्या झोळीत देवाने भरभरून टाकले आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला तिथे फिरताना येतो.
Canada lavished the wonderful gifts of nature
Canada lavished the wonderful gifts of nature Sakal

- विशाखा बाग

कॅनडाच्या अवर्णनीय सौंदर्यात आपण आजही फिरायला निघणार आहोत. क्षेत्रफळानुसार संपूर्ण जगात नंबर दोनवर असलेला हा देश त्याच्या लांबच लांब समुद्रकिनाऱ्यासाठीसुद्धा ओळखला जातो. कॅनडाला दोन लाख किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. जगातील सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला हा एकमेव देश आहे.

वाळवंट सोडून निसर्गातील सर्व प्रकारची वैशिष्ट्ये कॅनडामध्ये अनुभवायला मिळतात. पर्वतराजी, तलाव, तळी, जंगल, बारमाही दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, बर्फाळ प्रदेश आणि अद्ययावत शहरीकरण झालेली नावाजलेली मोठी शहरे हे सर्व काही कॅनडाच्या ट्रीपमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते.

बांफनंतर लेक लुईवरून आम्ही बसने ब्रिटिश कोलंबिया या प्रदेशातील डोंगरामधल्या अत्यंत देखण्या रस्त्याने कोलंबिया आईस फिल्डला जायला निघालो. या सिनिक रूटने जाताना आमच्या दोन्ही बाजूंना जंगल आणि बऱ्याच वेळेला आजूबाजूला बर्फदेखील होता.

कॅनडातील रस्ते रुंद आणि मोठे आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जंगलांमध्ये वन्यजीव बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आढळतात. याच रस्त्याने जाताना अचानक दोन ग्रिझली बियर आम्हाला आडवे आले.

कॅनडामध्ये ग्रिझली बियर म्हणजेच अस्वल बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दिसतात. या वन्यजीवांना जंगलातल्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जायचे असेल तर झाडाझुडपांनी व्यवस्थितरीत्या झाकलेले पूल या रस्त्यावर तयार करण्यात आलेले आहेत.

आम्ही या रस्त्यावरून जाण्याची मजा घेत असतानाच एकीकडे डोक्यात मात्र अथाबास्का व्हॅलीमधील ग्लेशियरवर जाण्यासाठी प्रचंड उत्सुक होतो. कॅनडियन रॉकी पर्वतराजींच्याच मध्ये ब्रिटिश कोलंबिया आणि अल्बर्टा या दोन प्रदेशांच्या सीमेवर दहा हजार वर्षांपेक्षाही जुने कोलंबिया आईस फिल्ड अस्तित्वात आहेत.

ग्लेशियर डिस्कव्‍हरी सेंटरमध्ये पोहोचल्यानंतर आपल्या पॅकेजमध्ये दुपारचे जेवणसुद्धा समाविष्ट असते. जेवण करून मगच अत्यंत मोठ्या ग्लेशियर ट्रकमध्ये किंवा बसमध्ये आपल्याला बसवण्यात येते आणि तिथून मग आपण संपूर्णतः बर्फावरूनच साधारण ३० ते ४० मिनिटांत अत्यंत कठीण चढ चढून दहा हजार वर्षे जुन्या बर्फाच्छादित डोंगरावर म्हणजेच ग्लेशियरवर पोहोचतो.

ग्लेशियर ट्रकचा अनुभव विलक्षण होता आणि मुख्य म्हणजे आमची ट्रक चालवणारी ड्रायव्हर ही २५ वर्षांची मुलगी होती. ज्या आत्मविश्‍वासाने तो प्रचंड मोठा ट्रक ती चालवत होती आणि तेसुद्धा बर्फाच्छादित डोंगरावर, हे बघून मी मनोमन तिला शुभेच्छा दिल्या आणि तिच्याबरोबर फोटोसुद्धा काढला.

बर्फात खाली उतरून मनसोक्त खेळून आणि फोटो काढून पुन्हा त्याच ट्रकने आपण डिस्कव्‍हरी सेंटरवर परत येतो. त्यानंतर अजून एका विलक्षण ठिकाणी पोहोचायचे होते. तो अनुभवसुद्धा दहा हजारांत एक असाच म्हणावा लागेल.

आईस फिल्डपासून जवळच सनवाप्टा व्हॅलीवर आईस फिल्डच्या वर गोल आकारामधला संपूर्ण काचेचा पूल बांधलेला आहे. ६० मीटर उंच असलेला हा ग्लेशियर स्कायवॉक ४५० मीटर लांब आहे. खाली खोल बर्फाची दरी, आजूबाजूला जंगल, बर्फाचे डोंगर आणि वरून आपण संपूर्णतः काचेच्या पुलावरून हे सगळे दृश्य बघत असतो. हा नजारा मनातून न घालवता येण्यासारखाच.

इथून मग असेच अनेक वेगवेगळे ग्लेशियर बघत आम्ही व्हिसलर गावाला जायला निघालो. व्हिसलर हे खरे तर गाव नाही म्हणता येणार, कारण हे एक स्की रिसॉर्ट टाऊन म्हणून प्रसिद्ध आहे. कोस्ट माऊंटन नावाच्या पर्वतराजीमध्ये हे गाव वसवलेले आहे.

पर्वत आणि जंगलांमधील वेगवेगळ्या साहसी खेळांसाठी हे स्की रिसॉर्ट टाऊन म्हणून प्रसिद्ध आहे. नीटनेटके वसवलेले हे गाव अतिशय देखणे आहे. मुख्यतः पर्यटकांसाठीच असलेले हे गाव वेगवेगळे रिसॉर्ट्स, हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट, गेम झोन, बागबगिचे आणि साहसी खेळांचे मुख्य केंद्र अशा अनेक ठिकाणांनी परिपूर्ण आहे.

छोट्याशा असलेल्या या गावात दरवर्षी २० लाख पर्यटक येत असतात. गावात पोहोचल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक-इन करून गाव बघायला बाहेर पडलो. या छोट्याशा गावामधून एक नदीसुद्धा वाहते.

या देखण्या गावात अनेक ठिकाणी फोटो काढण्याची इच्छा तुम्हाला नक्कीच होते. संध्याकाळी लाईट लागल्यानंतर तर हे गाव अतिशय रोमँटिक वाटत होते. इथे तुम्ही माऊंट बाईकिंग, स्नो बोर्डिंग, स्कीईंग, स्की जम्पिंग, झीप लाइनिंग आणि बंजी जम्पिंग हे सगळे करू शकता. आम्ही दुसऱ्या दिवशीच झीप लाइनिंग बुक केले होते.

आमच्या या पॅकेजमध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारच्या झीप लाइन्स समाविष्ट होत्या. व्हिसलर या गावातून आपण गंडोला राईडने व्हिसलर माऊंटनवर जातो आणि तिथून चार वेगवेगळ्या ट्री टॉप ब्रिजवरून आपण या पाच वेगवेगळ्या झीप लाईन करू शकतो. कमीत कमी २०० फुटांपासून ते जास्तीत जास्त २४०० फुटांपर्यंत लांब झीप लाईनवर आम्ही थरारक अनुभव घेतला.

साधारण तीन तास ही संपूर्ण ॲक्टिव्हिटी करायला लागतात, पण हा आयुष्यातला न विसरता येण्यासारखा रोमांचकारी अनुभव आम्ही घेतला होता. एका बाजूला बर्फाच्छादित डोंगर, खाली दाट जंगल आणि त्यावरून आपण झीप लाईनने एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला जातो हा अनुभव शब्दांत मांडण्यासारखा नाही. तुम्हीसुद्धा इथे कधी भेट दिली तर एक तरी साहसी खेळ नक्की खेळून बघा.

अजून इथले एक महत्त्वाचे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र म्हणजे पिक टू पिक गंडोला राईड. व्हिसलरच्याच पर्वतराजीत ब्लॅककाँब रिसॉर्टला जाण्यासाठी ही केबल कार वापरावी लागते; परंतु ज्यांना रिसॉर्टला जायचे नाही ते पर्यटकसुद्धा डोंगराच्या समिटवर जाण्यासाठी केबल कार वापरू शकतात.

अर्थातच तिकीट काढून आपल्याला वर जाता येते; पण तिथे गेल्यानंतर दिसणारे दृश्य डोळ्यांत मात्र किती साठवू आणि नाही, असे होऊन जाते. निसर्गाचे हे अप्रतिम दान कॅनडाच्या झोळीत देवाने भरभरून टाकले आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला वरून दिसणाऱ्या दृश्यात होतो.

पर्वतराजी, तलाव, नदी, जंगल आणि डोंगरांच्या माथ्यावर विसावणारे स्वच्छ निळे आकाश ही इतकी साधी नैसर्गिक वैशिष्ट्ये तिथे मात्र अप्रतिमरीत्या जुळून आली होती आणि त्या दृश्यांची महती काय वर्णावी! जवळजवळ एक-दीड किलोमीटर लांब असा लाकडी स्कायवेसुद्धा तिथे आहे.

तिथून फिरत फिरत चारी बाजूंचे दृश्य तुम्ही डोळ्यात साठवू शकता. कॅमेऱ्यात आणि डोळ्यांत ती दृश्ये टिपण्यासाठी सर्वांचीच लगबग तिथे दिसत होती. मी मात्र स्कायवेवर एक चक्कर मारून नंतर रेस्टॉरंट वगैरे कुठेही न जाता त्या अप्रतिम दृश्याकडे स्तंभित होऊन हरवल्यासारखी बघत बसले होते. अजूनही तो क्षण, ते दृश्य डोळ्यांसमोरून जात नाही.

भारतासाठी सध्यातरी कॅनडा हा देश आणि विषय दोन्ही बरेच मोठे आहेत. आपलीसुद्धा कॅनडाची ही भ्रमंती अजूनही पुढच्या अनेक भागांमध्ये आपण बघणारच आहोत. अजूनही बऱ्याच रोमांचकारक गोष्टी, ठिकाणे या कॅनडामध्ये आपल्याला अनुभवायची आहेत.

gauribag७@gmail.com (लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com