सम्राट अशोकाच्या काळातली लेणी

भारतात तयार करण्यात आलेल्या आणि अजूनही सुस्थितीत असलेल्या सर्वांत पहिल्या धार्मिक वास्तू आजच्या बिहार राज्यात आपल्याला पाहायला मिळतात.
Caves from the time of samrat Ashoka
Caves from the time of samrat Ashokasakal

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

भारतात तयार करण्यात आलेल्या आणि अजूनही सुस्थितीत असलेल्या सर्वांत पहिल्या धार्मिक वास्तू आजच्या बिहार राज्यात आपल्याला पाहायला मिळतात. देशाच्या राजकीय तसेच धार्मिक इतिहासातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हणून सम्राट अशोक संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. ‘देवानाम पिय पियदस्सी असोक’ म्हणजे देवांनाही प्रिय, प्रियदर्शी अशोक भारतीय इतिहास आणि पुरातत्त्व संशोधकांच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे.

अशोकाचे शिलालेख, बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यानं केलेलं कार्य, त्यानं उभारलेले स्तंभ, त्याचे महत्त्वाकांक्षी विजय आणि भारताचा बदललेला भू-राजकीय इतिहास आजही संशोधक, अभ्यासकांना भुरळ घालतो. अशोकाच्या शिलालेखांनी इतिहास संशोधनाचा चेहरा-मोहराच बदलून टाकला. धम्म प्रसारासाठी उभारलेले स्तूप, खोदलेल्या लेणी यांच्यामुळं धार्मिक वास्तूंच्या निर्मितीप्रक्रियेत प्रचंड मोठी उलथापालथ केली.

सम्राट अशोक खऱ्या अर्थानं इतिहासाला कलाटणी देणारा राजा म्हणून अभ्यासला गेला. पण इथं थोडी मजा आहे. अशोकानं बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी केलेलं कार्य प्रचंड मोठं आहे. परंतु, अशोकाच्या राजवटीत खोदण्यात आलेल्या चार लेणी मात्र बौद्ध धर्मासाठी नव्हत्या.

किंबहुना, स्थापत्यकीय परिमाणांच्या आधारावर आणि शिलालेखांमधून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केलंय, की अशोकाच्या काळात, भारतात सर्वांत पहिल्यांदा ज्या लेणी खोदण्यात आल्या त्या एका वेगळ्याच संप्रदायासाठी होत्या.

बिहार राज्यात गयापासून अवघ्या २४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संपूर्ण ग्रॅनाइट पासून तयार झालेल्या बाराबर आणि नागार्जुनी नावाच्या दोन टेकड्या आहेत. दोन्ही टेकड्यांवर मिळून इथं सात लेणी खोदण्यात आल्या. यापैकी, बाराबर टेकडीवर चार तर नागार्जुनीवर तीन लेणी आहेत. यांचा कालखंड तब्बल दोन हजार तीनशे वर्षांपर्यंत मागं जातो.

बाराबर समूहातील लेणींची निर्मिती सम्राट अशोकाच्या काळात तर नागार्जुनीवरील लेणी अशोकाच्या नातवाच्या, दशरथाच्या काळात झाली. बाराबर टेकड्यांवरील लेणींची नावं अनुक्रमे लोमस ऋषी, सुदामा, कर्ण चौपार आणि विश्वमित्र आहेत. तर, नागार्जुनी टेकडीवरील लेणींची नावं गोपिका, वापी आणि वदतिका अशी आहेत.

ही लेणी अशोकानं ज्या संप्रदायासाठी खोदल्या, तो म्हणजे आजीविक. आजीविक संप्रदाय हा नियतीला मानणारा संप्रदाय होता. अभ्यासकांच्या मते, आजीविक नास्तिक होते. याविषयी मतमतांतरं आहेत. कारण बौद्ध आणि जैन साधनांमधून आपल्याला आजीविक संप्रदायाची माहिती समजते. मख्खली गोशालान यानं या संप्रदायाची स्थापना केली.

गौतम बुद्ध आणि भगवान महावीरांच्या समकालीन असणारा ही व्यक्ती आणि संप्रदाय. आपल्या नियतीमध्ये जे लिहिलं आहे, ते तसंच घडणार आहे. तुमच्या धार्मिक किंवा सांस्कृतिक उपासनेमुळं तुमच्या नशिबात लिहिलेली गोष्ट तुम्ही बदलू शकत नाहीत. नियती सर्वोच्च आहे. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून तुमची सुटका होऊ शकत नाही. या प्रकारच्या तत्त्वज्ञानाचं समर्थन करणारा हा संप्रदाय इ.स.पू. पाचव्या शतकात वगैरे अस्तित्वात आला.

विशेष म्हणजे, भारतात बौद्ध आणि जैन धर्म लोकप्रिय होत असताना सुद्धा जवळजवळ दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ हा संप्रदाय आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून होता. बाराबर टेकड्यांवर खोदलेल्या चार लेणी याच संप्रदायाला समर्पित केल्याचं आपल्याला अशोकाच्या शिलालेखावरून समजतं. लोमस ऋषी लेणीमध्ये अशोकाचा शिलालेख नाही.

पण, बाजूलाच असलेल्या सुदामा आणि कर्ण चौपार या लेणींमध्ये अशोकाचे शिलालेख आहेत. जे अनुक्रमे त्याच्या राज्यरोहण वर्षाच्या १२ व्या आणि १९ व्या वर्षी खोदलेले आहेत. सुदामा लेणीमधील शिलालेखात अशोकाचा उल्लेख प्रियदर्शी म्हणून तर आजीविक संप्रदायासाठी निर्माण केलेल्या वास्तूचा उल्लेख कुभा या शब्दात आलेला आहे.

लेणीसाठी इथे कुभा हा शब्द वापरला आहे, हे विशेष. या शिलालेखावरून लेणीचा निश्चित काळ हा इ.स.पू. २५७ सांगता येतो. हा शिलालेख ब्राह्मी लिपीमध्ये आहे. तसेच, कर्ण चौपार लेणीमध्ये असलेल्या शिलालेखातून या लेणीचं मूळ नाव सुप्रियेक्षा असल्याचे समजते. तसंच, ही लेणी ज्या डोंगरावर खोदली, त्याचं नाव खलतिक असल्याचंही समजून येतं. सध्या हा डोंगर बाराबर नावानं सर्वसामान्य लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. तसंच, या लेणींचं मूळ नाव मागं पडून त्याजागी महाभारतातील काही प्रसिद्ध व्यक्तिरेखांच्या नावानं लोकप्रिय झालं आहे.

या लेणी ग्रॅनाइट मध्ये खोदण्यात आल्या. यांचं वैशिष्ट्य म्हणजे आतील बाजूनं पॉलिश केलेल्या भिंती. आजही आरशाप्रमाणं चमक असणाऱ्या या भिंती एवढ्या गुळगुळीत आहेत, की दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी हे काम कसं केलं असावं, हा प्रश्न पडतो. लांबलचक, आयताकृती असणाऱ्या आणि अंडाकृती छत अशा स्वरूपात या लेणींचं स्थापत्य आहे.

लोमस ऋषी लेणीच्या प्रवेशद्वारावर हत्तींची मालिका आणि छोट्या स्तूपांची रचना केली आहे. स्तूप किंवा लेणीच्या प्रवेशद्वारावर अशाप्रकारची चैत्य कमान आपल्याला पाहायला मिळते, त्याची ही सुरुवात. बाजूलाच असणाऱ्या नागर्जुनी लेणींमध्ये अशोकाचा नातू दशरथाचे शिलालेख आहेत. या लेखांवरून लेणींचा काळ ठरवता येतो.

पुढं ही लयन स्थापत्याची चळवळ दक्षिणेत उतरली आणि प्रचंड लोकप्रिय झाली. पण, पाचव्या-सहाव्या शतकात दख्खन किंवा सबंध भारतात बांधीव मंदिरांची उभारणी मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाल्यामुळं हळूहळू लेणी स्थापत्याची रचना मागं पडू लागली आणि बाराव्या शतकाच्या अखेरीस ती पूर्णपणे लोकांच्या धार्मिक बांधकामातून बाजूला पडली.

अशोक हा सर्वार्थानं सम्राट म्हणूनच या भारत भूमीवर वावरला. त्यानं कोरलेले शिलालेख, स्तंभ, स्तूप, लेणी या सर्व गोष्टींमुळं भारतात धार्मिक स्थापत्यामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली. त्याचा दूरगामी परिणाम आपल्याला कित्येक शतकं दिसतो. या सर्व क्रांतीची जिथून सुरुवात झाली, त्या बिहारमधील सात टेकड्या, ज्यांना एकत्रितपणे सातघरव असे म्हणतात, त्यांची ही थोडक्यात ओळख.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com