घट्ट मैत्रीमुळेच चांगले काम

Abhijit-and-isha
Abhijit-and-isha

जोडी पडद्यावरची - अभिजित खांडकेकर आणि ईशा केसकर 
छोट्या पडद्यावरील काही जोड्या प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री ईशा केसकर. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधील गुरुनाथ-शनाया म्हणजेच अभिजित आणि ईशा ही जोडी सध्या सुपरडूपर हीट आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडी या जोडीची चर्चा ऐकायला मिळते. खरंतर अभिजित-ईशा यांच्यामध्ये या मालिकेपूर्वीच मैत्री होती. दोघंही एकमेकांना फार जवळून ओळखत होते.

याबाबत ईशा म्हणते, ‘‘माझ्या घराशेजारीच अभिजितचं घर आहे. आम्ही एकाच इमारतीत राहतो. त्यामुळं शेजारी-शेजारी आणि त्यातही एकाच क्षेत्रात काम करणारी आम्ही मंडळी. आमची या मालिकेपूर्वीच घट्ट मैत्री जमली होती. अभिजितची पत्नी, आई-वडील यांच्याशी माझे फार चांगले संबंध आहेत. मला अभिजितबरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मलाही फार आनंद झाला. मला त्याच्याबरोबर काम करताना जुळवून कधीच घ्यावं लागलं नाही. आम्ही एकमेकांना सांभाळलं आणि त्यातून चांगलं काम प्रेक्षकांच्या समोर आलं.’’ 

अभिजित-ईशाच्या मैत्रीला जवळपास तीन ते चार वर्षं झाली. त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री कमालीची असल्यानं त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांचं मनोरंजन करते. अभिजित ईशाला फार जवळून ओळखतो. याचबाबत तो म्हणतो, ‘‘ईशा मुक्‍या प्राण्यांवर जिवापाड प्रेम करते. अगदी रस्त्यात तिला जखमी कुत्रा, मांजर दिसल्यास ती स्वखर्चातून उपचार करते.

मुक्‍या प्राण्यांना झालेली जखम पाहून तिच्या डोळ्यांत पाणी येतं, इतकी ती प्राण्यांच्या बाबतीत हळवी आहे.’’ ईशालाही अभिजितचे काही गुण आवडतात, तर अभिजितनं त्याच्या काही सवयी बदलायला हव्यात असं तिला वाटतं. ‘‘अभिजित समोरच्या माणसाची चूक असली, तरी त्याला लगेच माफ करतो. किंबहुना त्या माणसाला तो काहीच बोलत नाही. त्याला कोणत्याच गोष्टीचा लगेच राग येत नाही. पण जिथं आपल्याला त्रास होतो तिथं त्यानं बोललेच पाहिजे,’’ असं ईशा सांगते. अभिजितला फॅशन, शॉपिंगची भारी आवड आहे. ईशा म्हणते, ‘‘अभिजित हा माझ्या आयुष्यातील एकमेव मुलगा आहे, ज्याला शॉपिंगची आवड आहे. फॅशनबाबत तर आमच्या बऱ्याच चर्चा रंगतात. नीट-नेटकं कसं राहता येईल, याकडंही त्याचं बारीक लक्ष असतं.’’ 

ईशाची या मालिकेमध्ये मधूनच एन्ट्री झाली. पण तिनं तिची भूमिका अगदी चोखपणे पार पाडली. ईशा अभिनेत्री म्हणून उत्तम आहेच, पण त्याचबरोबरीनं ती एक व्यक्ती म्हणून फार सुंदर आहे. याचविषयी अभिजित म्हणतो, ‘‘लोकांचा कोणताच विचार न करता बिनधास्तपणे जगणारी ही मुलगी आहे. आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगांचा हसत हसत सामना करायचा, हे ईशाला बरोबर जमतं. ती प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करते.

मग तिचं काम असो वा कोणावर प्रेम करणं असो. ईशा स्वच्छंदी जगणारी मुलगी आहे.’’ कामाचा कितीही ताण असला तरी प्रत्येक सीन हसत-खेळत पूर्ण करायचा हा दोघांचाही एक फंडा आहे. इतरांना मदत करण्याचा अभिजितचा स्वभाव ईशाला प्रचंड आवडतो. ‘माझ्या नवऱ्याची बायको’च्या सेटवरही दोघंही मनमोकळेपणानं वावरतात. खरंतर अभिजित-ईशाची ऑफस्क्रीन केमिस्ट्री ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकीच गमतीशीर आहे. 

(शब्दांकन - काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com