अभिनय क्षेत्रात पडले एकत्र पाऊल

Karan-and-Sehar
Karan-and-Sehar

जोडी पडद्यावरची - करण देवल आणि सेहेर बंबा
अभिनेता करण देवलने ‘यमला पगला दिवाना २’ या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शन करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तर अभिनेत्री सेहेर बंबा प्रथमच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकत आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण आणि सेहेर पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकत आहे. दोघांच्याही पहिल्या भेटीबद्दल विचारले असता सेहेर सांगते, ‘‘मी करणला सनी सरांचा मुलगा म्हणून आधीपासूनच ओळखत होते. आमची याआधी कधीही भेट झाली नव्हती. चित्रपटासाठी माझे सिलेक्शन झाल्याचे कळाल्यावर आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये प्रथम एकमेकांना भेटलो.’’ यावर करण सांगतो, ‘‘आमची पहिली भेट आमच्या भूमिकांची निवड अंतिम झाल्यावरच घडली.’’ 

दोघांनाही एकमेकांबद्दल विचारले असता सेहेर सांगते, ‘‘करण स्वतःच्या आयुष्यात खूप ध्येयवादी आहे. चित्रीकरण करतानाही त्याने अजिबात वेळ न घालवता चित्रीकरण पूर्ण केले. सहकलाकार म्हणून करण खूप मदतशीर आहे. चित्रपटातले संवादही त्याला सारखे सांगावे लागायचे नाहीत. कधीकधी संवाद म्हणताना मी मध्येच अडकायचे, त्या वेळी मला करणने खूप मदत केली.’’ करण सेहेरबद्दल सांगतो, ‘‘सेहेरसारखी सहकलाकार भेटल्याबद्दल मी स्वतःला खूपच नशिबावान समजतो. ती खूप सपोर्टिव्ह आहे. मला तिची या चित्रपटासाठी खूपच मदत झाली.’’ पहिल्यांदाच चित्रपटात अभिनय करत असल्याने दोघांनाही हे क्षेत्र नवीनच होते. मात्र, दोघांनीही एकमेकांना या नवेपणाची आठवण करून न देता एकमेकांना साहाय्यच केले. एकमेकांच्या गुणांबद्दल विचारले असता सेहेरबद्दल करण सांगतो, ‘‘मी स्वतः अलिप्त स्वभावाचा असल्याने मला समजून घ्यायला लोकांना जास्त वेळ लागतो, पण सेहेर मनमिळाऊ असल्याने ती मला लवकर समजू शकली. तिचा हा मनमिळाऊ स्वभाव मला फार आवडतो.’’ 

‘करणने एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर कितीही अडचणी आल्या तरी तो जिद्दीने ती पूर्ण करतो. त्याची कामाबाबतची ही जिद्द मला अतिशय आवडते,’’ असे सेहेर करणबद्दल सांगते. सेटवरील गमतीजमतींबद्दल विचारले असता सेहेर सांगते, ‘‘आम्ही सेटवर कामासोबत बरीच मस्तीसुद्धा केली आहे. त्यामुळे कामाचा ताण कधीच आला नाही.’’ करण सांगतो, ‘‘मी सेहेरला घाबरवायला काही ना काही नव्या गोष्टी करतच असायचो. मला हे करायला खूप मजा येत होती.’’ करण आणि सेहेर यांच्यात चांगलीच घट्ट मैत्री जाणवली. एकमेकांना समजून घेण्याचा दोघांचा स्वभाव नक्कीच त्यांना कामी आला. हे दोघे ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com