कुटुंबाचा पाठिंबा सर्वांत महत्त्वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

कम बॅक मॉम - पल्लवी वैद्य, अभिनेत्री
घर, कुटुंब आणि बाहेरील कामांची जबाबदारी योग्य रीतीने पेलण्याची ताकद स्त्री वर्गात आहे. हाती आलेल्या कामाचं, जबाबदाऱ्यांचं ओझं न बाळगता त्याला हसत खेळत सामोरं जाण्याचं कौशल्य स्त्रीकडं असतं, असं मला वाटतं. कारण माझ्याबाबतीतही अगदी असंच घडलं आहे. माझ्या प्रेग्नंसीदरम्यान मी ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका करीत होते. प्रेग्नंसीच्या काळात आठव्या महिन्यापर्यंत मी या मालिकेचं चित्रीकरण केलं.

प्रेग्नंसीदरम्यान काम करताना कोणताही विचार न करता मी हसत-खेळत काम केलं. ही मालिकाही तेव्हा प्रचंड लोकप्रिय होती. मला मालिकेमधून एक्‍झिट घेणं कोणत्याही परिस्थितीत शक्‍य नव्हतं. प्रेग्नंसीनंतर मी सहा महिन्यांचा ब्रेक घेतला आणि पुन्हा या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरवात केली. ‘चार दिवस सासूचे’च्या संपूर्ण टीमने मला त्या वेळी फार समजून घेतलं. पुन्हा कामावर रुजू व्हायचं म्हटलं, की सहकलाकारांचा तसंच संपूर्ण टीमचा तुम्हाला पाठिंबा असणं फार महत्त्वाचं असतं आणि हा पाठिंबा मला मिळाला. घरची जबाबदारी, कुटुंबाचा सांभाळ, त्यातही दिवस-रात्र चित्रीकरण याचं ओझं मला कधीच वाटलं नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या घरची मंडळी. माझा मुलगा अथांग सहा महिन्यांचा असतानाच मी घराबाहेर पडले, ते माझी सासू आणि जाऊबाई यांच्यामुळंच. या दोघींमुळंच मी अगदी मनमोकळेपणानं बाहेर काम करू शकले. शिवाय अथांगला घडवण्यात या दोघींचा खूप मोठा हात आहे. सासू आणि जाऊबाई दोघी आजही माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभ्या असतात. म्हणूनच मीही आज जे काही चांगलं काम करते, त्यामध्ये या दोघींचाही मोलाचा वाटा आहे. आम्ही वावरत असलेल्या क्षेत्रात काम करीत असताना कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. तो मला मिळत गेला. त्यासाठी मी स्वतःला फार नशीबवान समजते. 

प्रेग्नंसीनंतर स्त्रीमध्ये काही शारीरिक बदल होतात. अभिनेत्री म्हणून काम करत असताना या शारीरिक बदलांकडंही विशेष लक्ष द्यावं लागतं. माझ्यामध्येही प्रेग्नंसीनंतर शारीरिक बदल झाले, पण त्याचा माझ्या कामावर काहीच परिणाम झाला नाही. या पुढं आपल्याला एकाच प्रकारच्या भूमिका मिळतील, अशी भीतीही मला कधी वाटली नाही. माझ्याबाबतीत उलटच घडलं. ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेचा शेवटचा दिवस असतानाच मला ‘स्वप्नांच्या पलीकडले’ ही मालिका मिळाली. म्हणजेच एक मालिका संपल्यानंतर मी बसून राहिले, असंही घडलं नाही. मला चांगल्या भूमिका मिळत गेल्या आणि त्या मी केल्या. माझं वजन मात्र थोडसं वाढलं होतं.

त्याकडं मी थोडं लक्ष दिलं. म्हणजेच खाण्या-पिण्याच्या वेळा, काय खाल्लं पाहिजे यावर मी ताबा ठेवला. मग मी वर्षभरात मूळ पदावर आले.

माझ्यासाठी अथांग लकी ठरला, असंच मी म्हणेन. कारण प्रेग्नंसीनंतरही मला चांगल्या मालिका आणि उत्तम भूमिका मिळत गेल्या. 
खरंतर दिवस-रात्र चित्रीकरण करत कुटुंब सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. पण मी या परीक्षेमध्येही पास झाले. अथांगचं बालपण मी त्याच्याबरोबर एन्जॉय केलं. कामाच्या गडबडीत असताना त्याला वेळ देणं राहून गेलं, असं घडलंच नाही. अभिनेत्री म्हटल्यावर कुटुंबाकडं फार लक्ष नाही, सतत बाहेर कामामध्ये व्यस्त असा लोकांचा एक समज असतो. पण आम्हा कलाकारांना चारही बाजू सांभाळून कुटुंबाबरोबर वेळ घालवणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. आजही मी माझ्या चित्रीकरणामधला काहीसा वेळ बाजूला सारून अथांगबरोबर राहते. अथांग आता आठ वर्षांचा आहे. त्याच्या शाळेमध्ये काही कार्यक्रम असले, की मी आवर्जून वेळ काढते व उपस्थित राहते. अथांगनं आई घरातच हवी किंवा मला तुझ्याबरोबर घेऊनच चल, असा हट्ट कधीच केला नाही. अगदी कमी वेळा मी त्याला माझ्या मालिकांच्या सेटवर घेऊन गेले आहे. आम्ही कुठं बाहेर फिरायला गेल्यावर लोक माझ्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी करायचे. सुरवातीला अथांगला ते आवडायचं नाही, मात्र आता तो समजूतदार झाला असून, या गोष्टीही त्याला आवडायला लागल्या आहेत. आपली आई जणू काही सुपरवुमन आहे, असं त्याला वाटतं! 
(शब्दांकन - काजल डांगे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity Pallavi Vaidya maitrin supplement sakal pune today