पारो आणि चंद्रमुखी

Maitrin
Maitrin

चौकटीतली ‘ती’ - चौकटीतली ‘ती’ 
श्रीमंत जमीनदाराच्या घरात जन्मलेला देवदास मुखर्जी आणि त्याच्या शेजारच्याच घरातली पार्वती अर्थात पारो या दोघांचं बालपणापासून सख्य. शाळेत शिकणं, हुंदडायला जाणं या साऱ्या गोष्टींमध्ये दोघांनाही एकमेकांची साथसंगत. दोघंही एकमेकांना अपार जीव लावणारे. देवदासचं लक्ष अभ्यासापेक्षा खोड्या करण्यात अधिक. त्याच्या खोड्यांनी सारा गाव त्रस्त होतो, तेव्हा त्याचे वडील त्याला शहरात त्याच्या मामाकडे शिकायला पाठवतात. देवदास रडून, गोंधळ घालून विरोध करतो, पण अखेरीस त्याला जावंच लागतं. छोटी पारो हिरमुसते... 

काळ उलटतो. देवदास शिकून मोठा होतो. पारोही वयात येते. या वेळी देवदास खूप काळानंतर गावी आलेला. साहजिकच त्याच्या आगमनाच्या वार्तेनं पारो मोहरून उठते. पण आता तिला आपला आनंद चारचौघांत व्यक्त करता येत नसतो. खरंतर देवदास आणि पारो यांचं लग्न व्हावं अशी तिच्या आईची इच्छा असते; पण देवदासच्या आई-वडिलांचा या लग्नाला सक्त विरोध असतो. पारो त्यांच्या जातीतली असली तरी तिचं घराणं तेवढ्या उच्चदर्जाचं नाही, शिवाय शेजाऱ्यांशी नातेसंबंध नको, ही जमीनदार महाशयांची समजूत. देवदास आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करायला धजावत नाही. पण तो तिला विसरूही शकत नाही. जमीनदाराकडून अपमानित झालेले पारोचे वडील इरेला पेटून एका आठवड्याच्या आत तिचं लग्न एका धनाढ्य इसमाशी ठरवून मोकळे होतात. या इसमाची पहिली पत्नी मरण पावली असून, त्याला तीन तरणी अपत्यं आहेत, हे माहीत असूनही. कारण एकच, जमीनदाराच्या नाकावर टिच्चून आठ दिवसांच्या आत पारोचं लग्न करून दाखवीन, ही प्रतिज्ञा त्यांना पुरी करायची असते.

ठरल्यानुसार हे लग्न होतं. प्रेमभंगाचं दुःख असह्य झाल्यानं देवदास कोलकत्याला निघून जातो. तिथं चुन्नीबाबू नामक मित्राच्या सोबतीनं चंद्रमुखी या गणिकेच्या कोठ्यावर जातो. सुस्वरूप, गोड गळ्याची चंद्रमुखी आणि मद्य यांच्या संगतीत देवदास दुःख विसरायचा प्रयत्न करतो. मात्र, व्यसनाधीनता व नैराश्‍य यांच्या गाळात तो अधिकाधिक फसत जातो.

सासरी गेलेली पारो आणि कोलकत्यातील चंद्रमुखी या दोघीही आपापल्या परीनं त्याला सावरायचा प्रयत्न करतात. पण देवदासची अधोगती अटळ असते. वाइटाहून अधिक वाइटाकडे प्रवास होत मरणासन्न देवदास पारोच्या गावी पोहोचतो आणि तिच्या घरासमोरच्या पारावर प्राणत्याग करतो. 

प्रख्यात बंगाली लेखक शरत्‌चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ या कादंबरीचा हा थोडक्‍यात सारांश. १९००मध्ये लिहून ठेवलेली ही कादंबरी प्रत्यक्षात छापून आली ती १९१७मध्ये. त्यानंतर बंगालीसह अनेक भाषांमध्ये तिच्या असंख्य आवृत्त्या निघाल्या. अवघ्या भारतवर्षाला वेड लावणाऱ्या या कादंबरीवर वेगवेगळ्या भारतीय भाषांमधून सुमारे पंधरा चित्रपट तयार झाले. त्यातले तीन तर हिंदीतच निर्माण झाले. हा मजकूर लिहिताना माझ्यासमोर आहे ती निर्माता दिग्दर्शक बिमल रॉय निर्मित व दिग्दर्शित १९५५ मधील नितांतसुंदर कलाकृती. कादंबरी काय अथवा चित्रपट काय, सगळ्याच कलाकृतींनी देवदासची शोकांतिका ठळकपणे रेखाटली.

नायकप्रधान चित्रपटांमध्ये हे घडणं स्वाभाविकच; पण देवदासच्या (दिलीपकुमार) व्यक्तिरेखेला तोलून धरणाऱ्या दोन स्त्री व्यक्तिरेखांना बिमल रॉय यांनी ज्या ताकदीनं पडद्यावर आणलं, त्याला खरोखर तोड नाही. पारो (सुचित्रा सेन) आणि चंद्रमुखी (वैजयंतीमाला) या दोघींच्या अभिनयसामर्थ्यानं हा तोल इतका मोहकपणे पेलला, की ही शोकांतिका एकट्या देवदासची न राहता तीनही प्रमुख पात्रांची वाटू लागते.

लहानपणापासून देवदासला जीव लावणाऱ्या पारोच्या मनात मोठेपणीही त्याच्या प्रेमाचा धागा जिवंत आहे. मधल्या काळात या दोघांच्या भेटी कमी झाल्या असल्या तरी. मनानं कोमल असूनही कसोटीच्या क्षणी ती खंबीर होते. देवदासच्या आई-वडिलांच्या विरोधामुळं आपलं लग्न होऊ शकत नाही हे कळूनही अर्ध्या रात्री, लोकलज्जेचं भय न बाळगता ती त्याच्या घरी जाऊन त्याचं मनोगत जाणून घेते. त्याची दोलायमान अवस्था पाहून ती त्याला धीर देते; पण स्वाभिमानाला धक्का पोचतो त्या क्षणी मात्र ‘तुझ्या आई-वडिलांना स्वाभिमान आहे, तर माझ्या माता-पित्यांना तो नसावा काय?’ असा सवाल करते. परिस्थितीच्या रेट्यापुढे मान तुकवून ती बिजवराशी लग्न करते आणि त्या कुटुंबाला आपलंसं करते. देवदासच्या अधःपतनाच्या वार्ता कळत असताना त्याला सुधारण्याचा ती जिवापाड प्रयत्न करते. ‘सौंदर्याचा अहंकार केव्हाही वाईटच,’ असं म्हणत देवदासनं एकदा तिच्या चेहऱ्यावर वेताच्या छडीनं प्रहार केलेला असतो. कपाळावरची ती जखम बुजली तरी व्रण कायम असतो. शेवटी आपल्या घरासमोर बेवारस अवस्थेत मरण पावलेला माणूस हा दुसरा-तिसरा कुणी नसून देवदासच आहे, याची खात्री झाल्यानंतर पार्वती जिवाच्या आकांतानं धाव घेते आणि बंद फाटकावर कपाळमोक्ष करून घेते, तेव्हा ती जुनी जखम पुन्हा भळभळून वाहू लागते... 

आणि चंद्रमुखीची मूक संवेदनाही तेवढीच प्रत्ययकारी. पहिल्या भेटीतच देवदासकडून तुच्छतापूर्ण कटाक्ष वाट्याला आलेली चंद्रमुखी त्याच्या प्रेमात कशी पडते हे तिला कळतच नाही. या प्रेमापायी ती मनोमन त्याला वरते. देवदास सुधारावा यासाठी त्याच्या गावी जाऊन येते. जगाच्या दृष्टीनं हीन असलेला गणिकेचा व्यवसाय कायमचा सोडून देऊन कृष्णभक्तीला लागते.

देवदासच्या चरणांची धूळ मस्तकाला लावून त्याच्यावरच्या निष्ठेची ग्वाही देते. दुर्दैवानं त्या दोघांची ती अखेरचीच भेट ठरते. देवदासवर जीव टाकणाऱ्या पारो आणि चंद्रमुखी या दोघींची प्रत्यक्षात भेट कधीच होत नाही. केवळ एकदा एका प्रवासात त्या दोघींची दुरून नजरभेट होते. पारो डोलीत बसलेली, तर चंद्रमुखी अनवाणी पायांनी चिखल तुडवत निघालेली. दोघींना एकमेकींची ओळख असेल किंवा नसेलही; पण तेवढ्या त्या नजरभेटीत दोघी एकमेकींकडे अनिमिष नेत्रांनी बघत राहतात. बस, तोच एक क्षण, त्या दोघींना जवळ आणणारा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com