aindrita-ray
aindrita-ray

जिद्दीवर बनले अभिनेत्री

सेलिब्रिटी टॉक - ऐंद्रिता राय, अभिनेत्री
मी मूळची राजस्थानची आहे; परंतु माझे बाबा भारतीय हवाई दलात असल्याने आमचे राहण्याचे ठिकाण निश्‍चित नसायचे. आता सध्या मी बंगळूरमध्ये स्थायिक आहे. मला अभिनयाची लहानपणापासूनच आवड आहे. त्यामुळे करिअरही अभिनय क्षेत्रातच करायचे, असे मी ठरवले होते.

अभिनयाला सुरवात करण्याआधी मी मॉडेलिंग करायचे. त्यानंतर सुरवातीच्या काळात मी भरपूर हिंदी जाहिराती केल्या. जाहिराती करताना मला दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीत अभिनय करायची संधी मिळाली. मी तिथे तीसहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. साउथमध्ये माझे बरेच चित्रपट हिट ठरले. माझ्या घरातले कोणी अभिनय क्षेत्रात किंवा चित्रपटसृष्टीत नव्हते. त्यामुळे ओळखीचे असे कोणीच नव्हते. या क्षेत्रात आल्यानंतर सारे काही मला शून्यापासून सुरू करावे लागले. मी हळूहळू ऑडिशन देत-देत स्वतःच्या मेहनतीवर अभिनेत्री बनले. मी जिद्दी आणि ध्येयवादी स्वभावाची मुलगी आहे. या स्वभावामुळेच कदाचित मी आज तुमच्यासमोर एक अभिनेत्री म्हणून उभी आहे. 

अभिनयाव्यतिरिक्त मला चित्र काढायला खूप आवडतात. मला सायकलिंगचीही आवड आहे. मी जवळजवळ ५० ते ६० किलोमीटरचा पल्ला सायकलिंग करून पार करते. मला निसर्गाच्या सान्निध्यात राहायला फार आवडते. निसर्गासंबंधात घडणाऱ्या बऱ्याच घडामोडींशी मी जवळीक साधते. मला प्राण्यांसंबंधी असलेली समाजसेवा करायला आवडते. प्राण्यांच्या बाबतीत मी फारच हळवी आहे. 

मी सुरवातीला डेंटिस्टचा कोर्स करत होते. मात्र, त्याचवेळी मला ऑडिशन्ससाठी ऑफर येऊ लागल्या आणि मी अचानक एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे वळले. यादरम्यान माझ्या आईबाबांनी माझ्यात असलेल्या कलेला समजून घेऊन मला कायमच पाठिंबा दिला. दक्षिण भारतात राहत असल्याने तेथील इंडस्ट्री करणे फारच सोपे गेले. विशेष म्हणजे, मला माझ्या कुटुंबासोबत राहायला मिळाले. त्यामुळे मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते. 

माझ्या आयुष्यात ‘जंगली’ हा दाक्षिणात्य चित्रपट टर्निंग पॉइंट ठरला. आता मी ‘मैं जरूर आऊँगा’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटामुळे मला येथील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. नव्याने बऱ्याच ओळखी झाल्या. वेबसीरिजची ऑफर आल्यास मी आवर्जून काम करायला तयार आहे. मला फॅमिली आणि कथेला प्राधान्य देणाऱ्या वेबसीरिजमध्ये काम करायला आवडेल. 

(शब्दांकन - स्नेहा गावकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com