अनुभव घेत अभिनय शिकतेय... (अनन्या पांडे)

 अनन्या पांडे
मंगळवार, 7 मे 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - अनन्या पांडे
माझे वडील अभिनय क्षेत्रात असल्यानं लहानपणापासूनच माझंही अभिनेत्री होण्याचं स्वप्न होतं आणि आता मी माझा पहिला चित्रपट करते आहे! ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ हा चित्रपट माझ्याकडं आला तेव्हा मी अठरा वर्षांची होते. तेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये कॉलेजला जाण्याची तयारी करीत होते. ऑडिशनच्या वेळी मला एक इमोशनल आणि एक लाउड, असे दोन सीन करायला सांगितलं गेलं. त्यानंतर जवळजवळ एक वर्ष मी या चित्रपटासाठी वेगवेगळे वर्कशॉप करीत होते. त्यानंतरच करण आणि पुनीत यांनी माझी या चित्रपटासाठी निवड केली. मी सुरवातीला सेटवर खूपच गप्प असायचे. पुनीतनं मला बोलतं करण्यासाठी मेहनत घेतली आणि त्याचा फायदा मला आज अभिनयात होतो आहे.

माझा पहिला चित्रपट असल्यानं आई-वडिलांना खूप आनंद आहे. मात्र, चित्रीकरणादरम्यान ते कधीही सेटवर आले नाहीत. चित्रपटाचा ट्रेलरही त्यांनी घरीच पाहिला. ट्रेलर पाहून त्यांना माझा फारच अभिमान वाटला. माझ्या वडिलांनी (चंकी पांडे) या इंडस्ट्रीमध्ये फार स्ट्रगल केलं आहे. त्यांनी मला अभिनयाबाबत कधीही टिप्स दिल्या नाहीत. अभिनय अनुभवानं शिकायची गोष्ट आहे, असं त्याचं मत आहे. यश किंवा अपयशात आपण ठाम राहायचं, बदलायचं नाही, हे मी वडिलांकडून शिकले. ते नेहमीच प्रेक्षकांचा मान ठेवून त्यांच्यासोबत फार छान वागतात. मला त्यांची ही गोष्ट फारच प्रेरणादायी वाटते. मला त्याच्यासारखी खूप मेहनत घेऊन यशस्वी अभिनेत्री व्हायचं आहे. मी कोणतीही गोष्ट नकारात्मकतेनं घेत नाही.  चित्रपटातील दुसरी अभिनेत्री तारा आणि मी जवळपास एकाच वयाच्या आहोत. त्यामुळं तारा मला भेटल्यावर मी तिच्यासोबत पटकन कनेक्‍ट झाले. चित्रीकरणादरम्यान आम्ही दोघी नेहमी एकत्रच असायचो. माझं शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं आहे. मी माझ्या शाळेत स्पोर्टस कॅप्टन होते. मी धावण्यात नेहमीच पहिली येत असे. मी फुटबॉलदेखील खेळते. ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’मुळं मला पुन्हा एकदा शाळेतील स्पर्धांचा आनंद घेता आला. आलिया भट माझी आवडती अभिनेत्री आहे. मी तिची मोठी चाहती आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी चौदा वर्षांची होती. मी हा चित्रपट पाहिला तेव्हाच त्यातील शनायाचं पात्र आपल्याला करता आल्यास काय धमाल होईल, असं मला वाटलं होतं. आता तेच पात्र रंगविण्याचं भाग्य मला लाभलं आहे...

(शब्दांकन - स्नेहल सांबरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Ananya Pandey maitrin supplement sakal pune today