‘सिंधू’ टर्निंग पॉइंट ठरेल!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - गौरी किरण, अभिनेत्री
मी मूळची रत्नागिरीची. त्यामुळे मला माझे कोकण खूपच आवडते. कोकणात मनोरंजनासाठी तमाशा किंवा ऑर्केस्ट्रा जास्त प्रमाणात असायचे. हनुमान जयंती, दत्त जयंतीसारख्या सणांच्या निमित्ताने हे कार्यक्रम ठेवण्यात यायचे. मला आणि माझ्या आईला नृत्याची खूप आवड आहे. ती मला तसे कपडे घालून नृत्य करायला लावायची. तेव्हापासून नृत्याबरोबरच अभिनयाची आवडदेखील माझ्या मनात रुजली. मी शाळेत आणि शाळाबाह्य स्पर्धेत भाग घेऊन अभिनय, नृत्य करू लागले. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना मी रवी वाडकरांच्या एका नाटकात काम केले होते. या नाटकातील अभिनयासाठी मला मुंबई विद्यापीठात बक्षीसदेखील मिळाले. त्यावेळी मी पहिल्यांदाच मुंबई पाहिली. मुंबईत आल्यावर काय करायचे, हा विचार होता.

मग मुंबईत राहून पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला. मास मीडिया कम्युनिकेशनसाठी प्रवेश घेतला. पत्रकारिता शिकत असताना अभिनयासाठी माझ्या एका मैत्रिणीने अशाच एका ओळखीवर मला ऑडिशन देण्यासाठी सांगितले. ती मालिका होती ‘कुंकू’. पण त्या मालिकेसाठी लागणाऱ्या भूमिकेकरिता मी फिट नसल्याने माझी निवड झाली नाही. 

मी ऑडिशन देत गेले. त्यानंतर मला माझी पहिली ‘संध्याकाळ’ ही मालिका मिळाली. पहिली मालिका असल्याने मी खूप आनंदी होते आणि मालिकेत काम करण्याचे थोडे टेन्शन आले होते. त्यानंतर मी ‘सावर रे’ ही मालिका केली, पण दोन मालिकेत छोट्या भूमिका साकारल्याने आर्थिकदृष्ट्यादेखील तसे काही घडत नव्हते. मालिका करत असताना पत्रकारितेचे शिक्षणही मी पूर्ण केले. पत्रकारिता पूर्ण झाल्यावर मी एक वर्ष नोकरी केली. पण आयुष्यात जे करायचे होते, ते होत नसल्याने त्याची खंत वाटत होती. त्या वेळी मनाशी पक्के ठरवून मी पुन्हा शून्यातून उभी राहण्याचा निर्णय घेतला. काही ऑडिशन दिल्यानंतर मग मला ‘अस्मिता’, ‘शौर्य’, ‘लक्ष्य’, ‘तू माझा सांगाती’सारख्या मालिका मिळाल्या. या मालिका केल्यानंतर मला एक चित्रपट ऑफर झाला. तो होता ‘पुष्पक विमान’. या चित्रपटात मी मुख्य भूमिका साकारली. यामध्ये अभिनेता सुबोध भावे आणि मोहन जोशी यांच्यासोबत काम करत असतानाचा आनंद माझ्यासाठी खूप मोठा आनंद होता. या चित्रपटातून मला खरी प्रसिद्धी मिळाली. अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी माझ्या माहेरच्यांचा तर मला सपोर्ट होताच, पण सासरकडून मला सर्वाधिक सपोर्ट मिळाला. आपल्या मुलीला पुढे जाण्यासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या सर्व मला माझ्या सासरकडून मिळाल्या. सध्या मी फक्त मराठी वाहिनीवरील ‘सिंधू’ या मालिकेत काम करत आहे. यात मी गोदावरी नावाचे पात्र साकारत आहे. यातील माझी भूमिका आव्हानात्मक होती. तसेच ही मालिका माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरेल, असे मला वाटते.  
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk Gauri Kiran maitrin supplement sakal pune today