खेळकर स्वभावामुळे सकारात्मक ऊर्जा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

काही कलाकार तर एखाद्या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच भेटतात, आणि त्यांची केमिस्ट्री लोकप्रिय ठरते. त्यांच्यामध्ये घट्ट मैत्रीचे नाते निर्माण होते. असेच काहीसे अभिनेता हर्षद अरोरा आणि अभिनेत्री अनुषा मिश्रा यांच्याबाबतीत घडले.

जोडी पडद्यावरची... हर्षद अरोरा आणि अनुषा मिश्रा 
मालिकांमधील जोड्या आणि त्यांच्यामधील केमिस्ट्री जाणून घेण्यात प्रेक्षकांना विशेष रस असतो. काही कलाकार तर एखाद्या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच भेटतात, आणि त्यांची केमिस्ट्री लोकप्रिय ठरते. त्यांच्यामध्ये घट्ट मैत्रीचे नाते निर्माण होते. असेच काहीसे अभिनेता हर्षद अरोरा आणि अभिनेत्री अनुषा मिश्रा यांच्याबाबतीत घडले. हर्षद-अनुषा सोनी सब वाहिनीवरील ‘तेरा क्‍या होगा आलिया’ या मालिकेसाठी एकत्र आले आहेत. ही या दोघांची पहिलीच एकत्रित मालिका. शिवाय हर्षदने याआधी बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचा बोलका अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला. तर दुसरीकडे अनुषा या मालिकेच्या निमित्ताने अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. हे दोघंही दोन्ही दिशेचे असले तरी अगदी कमी दिवसांतच त्यांच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. अनुषा सांगते, ‘‘या मालिकेच्या वर्कशॉपदरम्यान आम्ही पहिल्यांदा भेटलो. याआधी मी हर्षदला मालिकांमध्ये काम करताना पाहिले होते. माझी आई तर याची मालिका आवर्जून पाहायची. ती हर्षदची खूप मोठी फॅन आहे. एका अनुभवी कलाकाराबरोबर काम करायचे म्हटल्यावर मला थोडे दडपण होते. पण सहकलाकार म्हणून हर्षद मला फार सांभाळून घेतो. सुरवातीला आमच्यामध्ये फार बोलणे झाले नसले तरी काही दिवस झाल्यानंतर आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. आपसूकच आमच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. या मालिकेमध्ये हर्षद-अनुषा हे अलोक आणि आलिया या विवाहित जोडप्याची भूमिका साकारत आहेत. ही भूमिका साकारत असताना दोघांनाही फारसे जमवून घ्यावे लागले नाही. दोघांचाही खेळकर स्वभाव, त्यांच्यामधील सकारात्मक ऊर्जा येथे कामी आली. 

हर्षद म्हणाला, ‘‘अनुषासाठी हे सारे नवीन असले तरी प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. खरेतर ती मेहनती आहे. प्रत्येक काम नीट कसे होईल याकडे तिचा कल असतो. सुरवातीला काम करताना ती थोडीफार डगमगली. पण आता तिच्यामध्ये सुधारणा होत आहे.’’ 

‘तेरा क्‍या होगा आलिया’ची संपूर्ण टीम हर्षद-अनुषाला फार सांभाळून घेतात. याबाबत अनुषा  सांगते, ‘‘माझा पहिलाच सीन मला अजूनही आठवत आहे. हर्षद आणि माझा एक सीन होता. हर्षदने त्याचे दोन सीन दहा मिनिटामध्ये केले, आणि मी एका सीनसाठी तब्बल चार तास लावले होते. पण प्रत्येकाने मला यादरम्यान फारच समजावून घेतले.’’ अनुषाचा स्वभाव, तिचा चेहरा हसरा आहे. त्यामुळे हर्षदलाही तिच्याबरोबर काम करताना फार मजा येते. हर्षद म्हणतो, ‘‘माझे सगळ्यांबरोबरच जमत नाही. पण अनुषाच्याबाबतीत अगदी उलटेच घडले. तिच्याबरोबर माझी फार लवकर मैत्री झाली. आमच्यामधील ही मैत्री काम करताना उपयोगीही येते.’’ 

‘‘हर्षदकडून मला खूप काही शिकायला मिळतं’’ असे अनुषा आवर्जून सांगते. शिवाय दोघेही एकमेकांचे भरभरून कौतुक करतात. शिवाय चित्रीकरणाच्या फावल्या वेळात दोघांमध्ये बऱ्याच गप्पा गोष्टीही रंगतात. चित्रीकरण सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी हर्षद-अनुषाचे उत्तम ट्युनिंग जमले आहे. एकुणच काय दोघांमध्ये असणार मैत्रीच सुंदर नात ऑनस्क्रीनही अगदी उठून दिसत आहे. 

(शब्दांकन ः काजल डांगे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Talk Harshad Arora and Anusha Mishra