
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...
सेलिब्रिटी टॉक - ईरा खान, अभिनेत्री
माझे शालेय शिक्षण मुंबईत झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण परदेशात झाले आहे. माझे वडील एक उत्तम अभिनेता असल्याने आमच्या घरात आधीपासूनच अभिनयाचे वारे वाहत होते. लहान वयातच बऱ्यापैकी मी चित्रपटसृष्टीबद्दल ऐकून होते.
माझे वडील अभिनेता आमीर खान यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी चित्रपटसृष्टीत आले. त्यांची ओळख एक उत्तम अभिनेता म्हणून संपूर्ण जगाला आहे आणि मी त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. मात्र, एका अभिनेत्याची मुलगी म्हणून मला चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. अभिनेत्री नाही, तर एक दिग्दर्शिका म्हणून मी लवकरच माझ्या पहिल्या-वहिल्या नाटकातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्टारकिड असल्याने इंडस्ट्रीमध्ये वावरताना बरेच दडपण जाणवते. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याने मला हवे ते मी मिळवू शकते, असे मला वाटते.
माझ्या येणाऱ्या नाटकाचे नाव ‘युरिपाइड्स मेडिया’ आहे. या नाटकातून एक गंभीर परिस्थिती किंवा एक दुःखद घटना लोकांच्या नजरेसमोर आणायचा मी प्रयत्न केला आहे.
डिसेंबर महिन्यात या नाटकाच्या प्रयोगांच्या सादरीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये हे नाटक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे. पहिल्यांदा दिग्दर्शन करण्याची वेळ असल्याने मला खूप मजा आली. बरेच काही नव्याने शिकायला मिळाले. शिवाय कलाकारांसोबत काम करतानाही एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आला. मी माझ्या वडिलांचे काम लहानपणापासून पाहत आले आहे. त्यांची आतापर्यंतची मेहनत, त्यांचे काम, त्यांनी प्रेक्षकांचे जिंकलेले मने या सर्वच गोष्टी मी पाहिल्या आहेत. त्यांनी मला समोर बसवून कधीच काही शिकवले नाही, मात्र मला काही अडत असल्यास त्या वेळी त्यांनी मला सांभाळून घेतले आहे. मी स्वतःहून काही विचारले असता, त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहे. शाळेत असल्यापासूनच मला नाटक बघायला, त्यात काम करायला आवडायचे. त्यामुळे ही माझी आवड जोपासत मी एका नाटकाचे दिग्दर्शन करण्याचे ठरवले. व्यावसायिक नाटक, कॉमेडी या प्रकारचे जॉनर मला आवडतात. मला हॉरर चित्रपट किंवा हॉरर जॉनर बघायला आवडत नाही. माझ्या वडिलांचे सर्व चित्रपट मी पाहिले आहेत. त्यांचे ‘जो जिता वही सिकंदर’, ‘लगान’, ‘पीके’, ‘दंगल’ हे चित्रपट मला आवडतात. चित्रपटाचा विषय आणि कथा मला आवडल्यास मी चित्रपटाचे दिग्दर्शन करायलाही तयार आहे.
(शब्दांकन - स्नेहा गावकर)