बाजारीकरणाचा राक्षस

Madhurani-Prabhulkar
Madhurani-Prabhulkar

सेलिब्रिटी टॉक - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री 
परवा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक हिंदी चित्रपट पाहण्यात आला. ‘छप्पर फाड के’ विनय पाठक या कमाल अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेली आणि आमचा पुण्याचा मित्र लेखक दिग्दर्शक समीर जोशी याची ही कलाकृती. आधुनिकीकरणाचे वारे आणि नवीन शतकात होत गेलेल्या डिजिटल क्रांतीमुळे मध्यमवर्गीय तत्त्व, मूल्यं यांचा जो ऱ्हास होत चाललाय त्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. विनय पाठक हा प्रामाणिकपणा, सरळमार्गी वर्तन, सत्यवचन अशी तत्त्व उराशी बाळगून त्याच्या स्वाभिमानात जगणारा मराठी मध्यमवर्गीय, मध्यमवयीन शरद गुपचूप. ‘‘झिजलेली चप्पल वारंवार शिवून मी कशी वापरतो, पण ती फेकत नाही’’ असं डोळ्यात पाणी आणून अभिमानाने छाती बाहेर काढून स्वतःच्या मुलांना सांगणारा हा गुपचूप! मात्र त्याच्यामागे त्याची खिल्ली उडवणारी आणि बापाच्या चपलेप्रमाणेच आजच्या काळात झिजून गेलेली आणि फेकून द्यायच्या लायकीची असलेली ही ‘तत्त्व’ झुगारून देणारी त्याची मुलं. या कुटुंबाला एक दिवस अचानक काही कोटींनी भरलेली एक बॅग सापडते. ते ती घरी आणतात आणि सुरू होतो अधःपतनाचा सावळा गोंधळ. ज्यातून अगदी गुपचूपही सुटत नाहीत. अधिकाधिक अडकतच जातात. 

वाममार्गांनी किंवा कष्टाविना आलेला पैसा मनुष्यामध्ये एक गुर्मी निर्माण करतो आणि माणूस म्हणून त्याला अधिकाधिक खालच्या पातळीवर आणत जातो, हे आपल्या आसपास दिसणारं नेहमीचं चित्र पुन्हा एकदा आपल्या समोर हा चित्रपट निर्माण करतो. 

या चित्रपटात कमी अधिक प्रमाणात अनेक विषयांवर प्रकाश टाकला गेलाय. त्यात सूक्ष्मपणे येऊन गेलेला विषय म्हणजे माणसाचं होत चाललेलं ग्राहकीकरण अर्थात ‘कन्झुमरिझम’! म्हणजे आपण माणूस नव्हे तर फक्त ग्राहक आहोत ग्राहक! वेगवेगळ्या कंपन्या आणि विविध ब्रॅण्ड्स सतत आपल्याला काही न काही विकू पाहतायत. कुणी घर, कुणी फर्निचर, कुणी कपडे, कुणी चपला, कुणी कॉस्मेटिक्‍स, कुणी पॉलिसी, कुणी पिझ्झा, कुणी मीठ, कोणी लोणी, कोणी अगदी पाणी...! ‘मी उत्तम, मी भारी... मला घ्या, मला घ्या... त्यासाठी खपा आणि कमवत राहा’ 

टीव्ही म्हणू नका, वृत्तपत्र, मासिक, भिंती, होर्डिंग ही तर जुनीच माध्यमं. (मुंबईसारख्या शहरात लागलेली मोठमोठी होर्डिंग्स बघून तर जीव दडपून जातो. आपण अधिकाधिक लहान वाटायला लागतो.) मागच्या महिन्यात तर मी एक चालती बोलती जाहिरात पाहिली. पुण्याच्या कर्वे रोडवरून एक मनुष्य स्वतःच एका हॉटेलची जाहिरात बनलेला. म्हणजे त्याने स्वतः अंगावर त्या जाहिरातीचा बॅनर लपेटला होता. रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत नुसता फिरत होता. मला हे दृश्‍य बघून अक्षरशः गलबललं. मार्केटिंग कुठल्या थराला गेलंय पाहा. 

सोशल मीडियावर होत राहणाऱ्या जाहिरातींच्या माऱ्याने तर जीव घाबराघुबरा होतो. कुठलंही शॉपिंग ॲप मोबाईलवर डाऊनलोड करून घेतलं की त्याचा ताप झालाय. त्यांचे सतत येणारे मेल, सतत येणारे पॉप-अप्स जीव काढतात. एखादी गोष्ट घ्यायला जावी तर त्यात इतके ब्रॅण्ड्स आणि इतकं वैविध्य. त्यावर बरेवाईट इतके रिव्ह्युज की मन गोंधळून जातं. वेळ वाचवायला ऑनलाइन शॉपिंग करावं तर स्क्रोल करण्यात आणि निर्णय घेण्यात इतका वेळ जातो की प्रत्यक्ष दुकानात जाऊन वस्तू घ्याव्यात, असंच मला कितीदा वाटतं. बरं एखादी गोष्ट आपल्याला हवीयं हे एकदा मोबाईलवर टाकलं की झालंच. सगळी शॉपिंग ॲप जागी होतात आणि हात धुऊन मागे लागतात. एवढंच काय आपल्याकडे नसलेल्या ॲपवर पण ही अमुक गोष्ट उपलब्ध आहे, असे संदेश यायला लागतात. आपल्या सर्व हालचालींवर सतत एक यंत्रणा लक्ष ठेवून आहे, याची जाणीव पदोपदी येत राहते. परवा सहज माझ्या मनात ‘पिझ्झा खावा’ असं आलं. मोबाईल उघडला तर काय? अहो, पिझ्झाची ॲड..! बापरे! म्हणजे आता आपल्या मनात पण सेन्सॉर लावतात की काय! मला एकदम घामच फुटला. तर असा हा राक्षस. बाजारीकरणाचा, मार्केटिंगचा, जाहिरातबाजीचा जो दर क्षणी मोठा होतोय. आपल्या घरात, शरीरात, मनात, रक्तातही शिरत चाललाय. 

१५-२० वर्षांपूर्वीच आपलं घर आठवा आणि आत्ताचं घर निरखून पाहा. ‘आपण खूप वस्तू जमवल्या आहेत का? विना गरजेच्या वस्तूंनी, पदार्थांनी, परदेशी कपड्यांनी आपलं घर भरलंय का? भरलंय नं? मग आपणही बळी झालो आहोत या रोगाचे. ‘हे-हे’ घेऊन आपल्याला सुख मिळेल हे आपल्यावर सतत बिंबवलं जातंय आणि आपण ते घेत सुटलोय. पण सुखी आहोत का, आपणच आपला विचार करूयात!  

बरं आता थांबते. माझंच कपाट आवरायला झालंय. काही गोष्टी कमी करून सुख मिळतंय का पाहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com