भोजपुरी ते हॉलिवूड प्रवास

Neetu-Chandra
Neetu-Chandra

सेलिब्रिटी टॉक - नीतू चंद्रा, अभिनेत्री
मी मूळची पाटण्याची. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ कॉलेजमध्ये झाले. मी बारावी झाल्यानंतर मॉडेलिंग करण्याचे ठरविले. त्यासाठी मुंबईत आले. मुंबईत आल्यावर मॉडेलिंग क्षेत्राकडे वळले.

प्रियदर्शनी सरांना भेटले. त्यांनी मला माझ्या पहिल्या जाहिरातीची ऑफर दिली. ती जाहिरात होती विख्यात कंपनीच्या पेनची. मी ती जाहिरात अमिताभ बच्चन यांच्यासोबत केली. त्यानंतर प्रियदर्शनी सरांनी मला ‘गरम मसाला’ चित्रपटासाठी विचारले. त्या चित्रपटात अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम असल्याने मी तो चित्रपट करण्यास तयार झाले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, मी खूप भाग्यवान आहे, की मला हा चित्रपट मिळाला.

कारण, बिहारमधील फार कमी मुलींना मुंबईसारख्या शहरात येऊन एक अभिनेत्री होण्याची संधी मिळते. ती मला मिळत होती. त्यासाठी मी स्वतःला खूपच नशीबवान समजत होते. या चित्रपटात मी एका हवाईसुंदरीची भूमिका साकारली होती. त्यानंतर २००७ मध्ये ‘ट्रॅफिक सिग्नल’ हा चित्रपट केला. त्यानंतर ‘वन टू थ्री’, ‘ओय लकी, लकी ओय’सारखे हिंदी चित्रपट केले. मी तेलगू, तमीळ या भाषांमधील चित्रपटांतही काम केले. अभिनेत्री म्हणून सगळ्या भाषांमध्ये काम करणे मला गरजेचे वाटते. मी ‘देसवा’ या भोजपुरी चित्रपटाची निर्मितीसुद्धा केली आहे. भोजपुरी ही माझी मातृभाषा असल्याने या चित्रपटाची निर्मिती करण्याचा अनुभव फार वेगळा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन माझा भाऊ नितीन चंद्रा याने केले. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना मला खूपच मजा आली. 

मी ‘द वर्स्ट डे’ या लघुपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मी ‘ब्लॉक १२’ हा ग्रीक चित्रपट केला. त्याबरोबर ‘नरे’ या कोरिअन सिरीजमध्येदेखील काम केले. अभिनेत्री म्हणून काम करीत असताना मी बरेच म्युझिक व्हिडिओ केले. मी राहत फते अली खान यांचा ‘बंजारे’ हा म्युझिक व्हिडिओ केला आहे. त्यानंतर ‘सजना है मुझे’, ‘मेरा बाबू छैल छबीला’सारखे म्युझिक व्हिडिओदेखील केले. आता लवकरच माझा ‘इश्‍का’ हा म्युझिक व्हिडिओ येणार आहे. या गाण्याची कोरिओग्राफी मुदस्सर खानने केली आहे. मुदस्सरसोबत याआधी मी कधीही काम केलेले नाही. पण, त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. तसेच मला खेळाची खूप आवड आहे. मी बास्केटबॉल आणि तायक्वांदो हे खेळ खेळते. मी १९९७ मध्ये नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात मी चार ब्लॅक बेल्ट जिंकले होते. 

(शब्दांकन - स्नेहल सांबरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com