अभिनयाला परिश्रमाची जोड

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - रकुल प्रित सिंग, अभिनेत्री 
मी मूळची दिल्लीची. माझे शालेय शिक्षण दिल्लीतच झाले आहे. मला लहापणापासूनच अभिनयाची आवड होती. मी शाळेत असल्यापासून विविध स्पर्धेत आवर्जून भाग घ्यायचे. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी मॉडेलिंग क्षेत्राकडे वळले. मॉडेलिंग करता करता अभिनयाकडे वळले. लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. मी फौजी कुटुंबात वाढल्याने चित्रपट बघायला माझ्या घरून नकार होता. शिवाय वडिलांच्या कामानिमित्त बदल्या होत असल्याने लहान लहान खेड्यात थिएटर्सही नसायचे. त्यामुळे चित्रपट बघणे दूरच. अभिनयात करिअर करण्यास माझ्या घरातून सुरवातीला विरोध होता. मात्र नंतर त्यांनी काम पाहून मला पाठिंबा दिला. माझे अभिनयात पदार्पण झाल्यानंतर मी ‘गीली’ हा दाक्षिणात्य चित्रपट केला. त्यानंतर बरीच वर्षे मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रमत गेले. ‘युवान’, ‘पुथागंम’, ‘केरातम’ यासारखे चित्रपट केले. त्यानंतर ‘यारिया’ या चित्रपटातून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दिल्ली, हैदराबाद, मुंबई अभिनय क्षेत्रातला माझा प्रवास सुखकर होता. या प्रवासात खूप काही नव्याने शिकायला आणि अनुभवायला मिळाले. अभिनय करताना मला लहान वयातच स्टारडम प्राप्त झाले, अर्थात मला त्याचे फार कौतुक आहे, पण त्या स्टारडमच्या प्रवाहात मी कुठेच वाहून गेले नाही. मला प्रत्येक जॉनरचे चित्रपट करायला आवडतील. आता मी ‘मरजावा’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट ॲक्शन आणि रोमँटिकचा भरणा असलेला आहे. आणि या चित्रपटात काम करताना खूप मज्जा आली.

ग्लॅमरसपेक्षा एक वेगळीच भूमिका मला साकारायला मिळाली. बॉलिवूडमध्ये काम करताना टॅलेंट फार आवश्यक आहे, असे मला वाटते. शिवाय कठोर परिश्रम, एकाग्रता आणि नशीब याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. 
माझा ‘मरजावा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत असून, एक वेगळ्याच प्रकारची भूमिका मला या चित्रपटात साकारायला मिळाली. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारी आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून माझी अभिनयाची सुरवात झाली असली, तरी बॉलिवूडमध्ये आल्यावर मला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. ‘मरजावा’ चित्रपटादरम्यान मी अनेक दिग्गज आणि अनुभवी कलाकारांना भेटले. त्यांच्या बरोबर काम करायला मिळाले, शिवाय नव्याने बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या याचा जास्त आनंद होत आहे. 
शब्दांकन - स्नेहा गांवकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk rakul preet singh maitrin supplement sakal pune today