पदार्पणातच दिग्गजांबरोबर कामाची संधी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

सेलिब्रिटी टॉक - सेहेर बंबा, अभिनेत्री
मी मूळची सिमल्याची आहे. लहानपणापासून मला अभिनयाची आवड होती. त्यामुळे मी अगदी कमी वयातच अभिनेत्री होण्याचे मनाशी पक्के केले होते. माझे शालेय शिक्षण सिमल्यातच झाले. महाविद्यालयीन शिक्षणाकरिता मी माझ्या पालकांना मुंबईत पाठवण्यासाठी खूप विनंती केली. त्यांच्या परवानगीनंतर मी मुंबईत आले. मुंबई शहर माझ्यासाठी पूर्णतः नवीन होते, पण अभिनयासाठी कुठूनतरी सुरवात करणे गरजेचे होते. माझ्या कुटुंबात किंवा इतर नातेवाइकांपैकी कुणीच अभिनयक्षेत्रात नव्हते. त्यामुळे मुंबईत आल्यावर मला अजिबात माहीत नव्हते, की अभिनयासाठी कोणाला भेटायचे किंवा कशी सुरवात करायची. मुंबईत आल्यावर माझ्या आयुष्यातला खरा संघर्ष सुरू झाला, असे म्हणायला हरकत नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेता-घेता मी ऑडिशन्स देऊ लागले. मी जाहिरातींसाठी होणाऱ्या अनेक ऑडिशन्स दिल्या, पण तिथून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कॉलेजमधून होणाऱ्या ‘फ्रेश फेस्ट’ या विशेष कौशल्य दाखवणाऱ्या स्पर्धेत मी भाग घेतला आणि ती स्पर्धा मी जिंकले. विशेष म्हणजे, त्याच वेळी ‘पल पल दिल के पास’ चित्रपटासाठी ऑडिशन्स सुरू होते. तेव्हा मला या चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरचा कॉल आला, त्यांनी मला ‘पल पल दिल के पास’ चित्रपटाचे ऑडिशन्स सुरू असल्याचे सांगितले. त्या वेळी मी कसलाही विचार न करता ऑडिशन्सला गेले. बरेच राउंड झाल्यानंतर एका महिन्यानंतर मला माझी निवड झाल्याचे समजले. त्या वेळी मला अतिशय आनंद झाला. अभिनयाव्यतिरिक्त मला डान्स करायला आवडतो. शिवाय मला गाणी ऐकायला खूप आवडतात.

माझे संपूर्ण कुटुंब सिमल्याला असते. माझ्या आईने मी मुंबईत आल्यानंतर बऱ्याचदा मुंबई-सिमला असा प्रवास माझ्यासाठी केला आहे. आर्थिकदृष्ट्या माझ्या बाबांनी मला मदत केली. अभिनयाला माझ्या आई-बाबांपैकी कोणीही कधीच विरोध केला नाही. त्यांच्या पाठिंब्यानेच आज मी इथे आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी ‘पल पल दिल के पास’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यात मी करण देवल सोबत काम केले आहे. माझे आई-बाबा दोघेही अभिनेता सनी देवलचे खूप मोठे चाहते आहेत आणि त्यांच्याच मुलासोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणे हे मला एखाद्या स्वप्नासारखेच आहे. माझे चित्रपटसृष्टीतील पदार्पणच दिग्गज लोकांसोबत झाले असल्याने हा चित्रपट नक्कीच माझ्या आयुष्याला कलाटणी देईल, याची मला खात्री आहे. 

सनी सरांनीदेखील मला कायम पोटच्या मुलीसारखे प्रेम दिले. मला आणि करणला त्यांनी समान वागणूक दिली. त्यांच्यासोबत काम करण्याचे हे क्षण कायम आठवणीत राहतील. एक अभिनेत्री म्हणून मला असे वाटते की, अभिनयाला माध्यमांचे बंधन नसल्याने कोणत्याही माध्यमातून अभिनय करण्यास मी कायम तयार असेन.
(शब्दांकन - स्नेहा गांवकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity talk saher bamba maitrin supplement sakal pune today