जीव ओतून काम करा

Samruddhi-Pore
Samruddhi-Pore

सेलिब्रिटी टॉक - - ॲड. समृद्धी पोरे
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मागच्या सत्रात आपण परदेशातल्या शूटींगमधल्या शिस्तबद्धतेबद्दल बोलत होतो. एका चित्रपटाच्या शूटींगच्या काळात आजूबाजूची माणसं घडत जातात. परदेशातसुद्धा माझा हाच अनुभव राहिलाय. एक संपूर्ण फिचर फिल्म करण्याआधी आपण एक शॉर्ट फिल्म करावी, म्हणून एक कथा लिहून त्यावर शॉर्ट फिल्म केली. त्याचं नाव ‘पासिंग द पार्सल’. हल्ली ती फेस्टिव्हलमध्ये गाजतेय. 

खरं ही कथा मी महाविद्यालयात असतानाच लिहिली होती. मात्र, त्यावर पुढे काही केलं नव्हतं. फिल्म करताना अनुभव असतो, त्यात आपल्याला माणसंसुद्धा कळत जातात. आपल्या सहकलाकाराची सहनशीलता, विचारांची देवाणघेवाण, एक्‍स्टीम परिस्थितीत निर्णय आणि साथ देण्याची क्षमता अशी तुलनाच करायची तर जरा मजेदार वाटेल. 

सुरवातीला सर्व गोडीगुलाबीत सुरू असतं. नंतर ४०/४५ दिवसांच्या शूटींगमध्ये हळूहळू सगळ्यांचा खरा स्वभाव कळू लागतो. बाहेरगावच्या शूटींगमध्ये हा अनुभव जास्त येतो. काही लोक एकमेकांच्या भावनिकरीत्या जवळ येतात. तर काही तुझा चेहरा मला सकाळी-सकाळी दाखवत जाऊ नकोसपर्यंत येऊन पोचतात. काही बाजूने गेलेल्या दुसऱ्याचा धक्का लागला तरी बोंब मारतात. शूटिंग संपल्यावर मात्र शेवटच्या दिवशी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. कलाकार मनाने हट्टी असला तरी हळवा असतो, म्हणून कितीही वाद झाले तरी टोकाचा राग धरून बसत नाही. दुसऱ्या मिनिटाला विसरून जातो. प्रकाश आमटे फिल्म करत असताना माझे आणि बाबांचेसुद्धा बरेच वाद होत असत. पुढे शूटिंग बंद म्हणजे बंद, बास झालं आतापर्यंत! पण त्यांचा राग जात असे. परत सगळं विसरून दुसरा सीन घेऊन मी त्यांच्याकडे गेले की, तेही जणू काही झालंच नाही या आविर्भावात परत कामाला लागत असतं. आता नानासोबतचा वाद काही सर्वसाधारण नसे. हे काही वेगळं सांगायला नको. फार अंगावर काटा येण्याजोगी परिस्थिती असायची पण सरतेशेवटी त्यातूनही शिकायलाच मिळालं. 

हौशी लोकं जी शूटींगमध्ये जोडली जातात, ती हळूहळू व्यावसायिक होतात. आपला सिनेमा आहे. आपलंच घर आहे, आपलीच गाडी आहे करता-करता मग साधी छत्री वापरली तरी त्याचा कर आकारला जातो. माझा असा अनुभव आहे की, ओळखीमध्ये समजून घेऊ असे म्हणून कधीच चित्रपट व्यवसाय करायचा नसतो. आपापसांत समजून घेण्यामध्ये शेवटी मनं दुखावली जातात आणि ते नातं गढूळ होते. त्यापेक्षा बारीक सारीक गोष्टी व्यावसायिकतेनेच केलेल्या केव्हाही चांगल्या. ज्याला आपण, ‘प्रोफेशनल’ म्हणतो. कितीही व्यावसायिक राहिलात तरी त्याची गणित मागे ठेवून आपला जीव कामावर ओतला तरच एक सुंदर कलाकृती तयार होते.

कुठल्याही सुंदर कलाकृतींच्या मागे एकटा व्यक्ती कधीही नसतो, तो कॅप्टन असला तरी त्याची संपूर्ण टिमचे ते श्रेय असते. टिम चांगली असेल तोच एक सुंदर कलाकृती तयार करू शकतो. तसेच माझ्या सगळ्या कलाकृतीच्या विजयाच्या मागे माझी टीम आहे. मी तर एक निर्माती आहे. ईश्‍वराने मला असे विषय सुचवले त्यात जीव ओतायची बुद्धी दिली आणि असे काम करायला सवंगडी पाठवले. त्यामुळे आपणापुढे ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रिअल हिरो’सारखी सुंदर कलाकृती येऊ शकतील. पुढच्या भागात शूटींगमुळे एक गाव हळूहळू कसे बदलले जाते या मजेदार गोष्टीबद्दल बोलुया. तोपर्यंत मी माझ्या टीमबरोबर आमच्या येणाऱ्या नवीन सिनेमाच्या तयारीला जाते. भेटुया लवकरच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com