नवीन पिढी घडवूयात

madhura velankar
madhura velankar

सेलिब्रिटी व्ह्यू - मधुरा वेलणकर, अभिनेत्री
खूप धावपळीत लेख लिहितीयं, काय लिहावं, असा विचार करायलाही वेळ नाही. तेवढ्यात एक फोन आला, ‘राजकारणावरील काही प्रश्‍नांवर तुमच्याशी बोलायचं आहे, वेळ आहे का?’ मी म्हणाले, ‘दोन तासांनी बोलूयात.’ मी घाबरले की, ज्याविषयाची माहिती नाही त्यावर कसं बोलायचं? पण अगदीच ‘मला काही माहीत नाही त्यातलं’ हे खरं असलं तरी माझं काहीतरी मत मला हक्काने नोंदवायचं होतं. अलिप्त राहावसं वाटत असलं तरी शेवटी रोज एकदातरी आपण आठवण काढतोच आपण दिलेल्या मताची! म्हणून दोन तास मागितले. 

घरात विषय काढून पाहिला. प्रत्येकाचं मत ऐकलं. त्यातलं मला जे पटेल ते-ते एकत्र करून सांगायचं, असं मनाशी ठरवलं; पण काहीजण तोंड वाकडं करून गेले तर काहीजण खूप भरभरून बोलू लागले आणि यांना खूप माहितीय याचा मला त्रास होऊ लागला. कारण एकातून एक विषय भरकटत जाऊ लागला, वेळ वाया जात होता. खरंतर इतकी माहिती गरजेची नव्हती. मग हा विचार रद्द करून लिहायला बसले. लिहिता-लिहिता काही सुचेल या आशेने!

खरंतर मी, राजकारणाच्या बाबतीत सामान्याहून सामान्य माहिती नसलेली. येत नाही असं नाही; पण लहानपणापासून कायम राजकारण म्हटलं की, भीती वाटायची. त्यामुळे त्यात कधी रुची निर्माण झाली नाही. राजकारण म्हणजे त्यात अरेरावीपणा, सत्तेचा माज, काहीही चुकीचं करण्याची ताकद असेच ढोबळ समज होते. पक्षांची नावं, त्यातल्या माणसांची नावं, त्यांची पदं, ते शिष्टाचार... बापरे! घराघरातसुद्धा ‘काहीही कर पण राजकारणात नको’, असंच सांगितलं जायचं.

हळूहळू वयानं, अनुभवानं मोठं व्हायला लागल्यावर लांबून माहीत असलेलं राजकारण आपल्या अवतीभोवतीसुद्धा डोकावायला लागलं, याची जाणीव व्हायला लागली आणि अजूनच बुजायला झालं. राजकारण असा शब्द ऐकला की ‘नको रे बाबा हा विषय’ ही एकमेव प्रतिक्रिया असायची.

पण मग लक्षात यायला लागलं, आपणही आपल्या नकळत राजकारणाचा भाग झालो आहोत. कुठल्याही गोष्टींचं राजकारण केलं जातं. आता त्रयस्थासारखं बाहेरून याकडे न बघता त्यातलं होऊनच त्याकडे पाहायला हवं. छोट्याछोट्या गोष्टींमध्ये राजकारण होतं, क्षेत्र कुठलंही असो. तिसरा माणूस आला की, राजकारण आलचं. 

आता मात्र विषयाचं अज्ञान तसंच असलं तरीही त्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन मात्र बदलला आहे. निवडणुका, प्रचार, उमेदवार, वचनं हे सगळं करायला लागतं. मग निकाल लागल्यावर विजेत्याला वचनांची पूर्ती करायची असते. स्वतःला सिद्ध करायचं असतं, त्या ऊर्जेने सुरवात होते आणि मग त्या दलदलीच्या महासागरात टिकून राहण्यासाठीची धडपड! त्यात कार्यकाळ संपून जातो. लोकांची बोलणी खात काम करत राहणं, फक्त फायदा पाहणाऱ्या अनेक लोकांमध्ये राहून चांगलं काम करणं महाकठीण. मी काही समित्यांवर काम करत असल्याने तिथेही मला हा अनुभव येतो. जुन्या-नव्याची सांगड घालताना सगळ्यांची तथाकथित मनं जपा. मानापमान सांभाळा, प्रसंग कुठलाही असो; पण आधी शिष्टाचार पाळा. यामध्येच अमूल्य वेळ वाया घालवायचा आणि खरं काम करताना भांडत राहायचं.

एखादा फालतू मुद्दा किंवा एक शब्दसुद्धा पुरेसा होतो. ज्यावरून आपण काहीतरी प्रचंड मोठी उलाढाल घडवतोय, असा फक्त आभास निर्माण करायचा. यात ज्याला मनापासून काम करायचं आहे, त्याची चिडचिड होते.

अशावेळी तुमचा म्होरक्या हा हुशार, चलाख, काम समजून त्यात योग्य ते बदल करण्यासाठी मानसिक स्थैर्य, दिशा असलेला, मेहनत करण्याची तयारी असलेला, थेट बोलण्याची धमक, सच्चाई असणारा, विचारांची पक्की वीण असणारा लागतो. अशी माणसं कमी असतात, ती घडवायला हवीत. 

‘जो काही करत नाही तो राजकारणात असतो’, या प्रतीची माणसं असून चालणार नाही, नाहीतर प्रत्येक प्रश्‍न हा गुंडगिरीतून सोडवला जाईल. राजकारण वेगळं आणि डावपेच आखणं वेगळं. हा फरक कळणारी, दूरदृष्टी असणारी, कशावर किती वेळ दवडायचा, याची समज असणारी, ध्येयवादी, भक्कम मुळं असलेली, बुद्धिमत्ता असलेली, आशावादी नवीन पिढी निर्माण करायला हवी. 

मुळात ‘बदल घडण्याची शक्यता’ जिथे अस्तित्वात दिसते, तिथे सकारात्मकता दडलेली असते. त्यामुळे या विषयाकडे तसंच पाहायला हवं. कारण राजकारण हा आवडीचा नसला तरीही जगण्याचा भाग आहे, हे मान्य करायला हवं. चांगले बदल अपेक्षित असतील, तर कष्ट करायला हवे. वेळ लागेल पण धीर धरूया, नवीन रुजवूया. फरक पडेल ही आशा करूया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com