बी पॉझिटिव्ह ! (चंदा कोलटकर)

चंदा कोलटकर
रविवार, 1 एप्रिल 2018

अखेर "ती' वेळ आली. सामसूम झाली. सदानं थरथरत दोर उचलला. साप धरल्यासारखा! क्षणभर त्याची चलबिचल झाली. उसना शांतपणा आणत त्यानं दोर कॉटवर ठेवला. मग तो खुर्ची ओढू लागला...
"कुणी आहे का आत? प्लीज, मदत करा. प्लीज, प्लीज!' कुणीतरी दारावर जोरजोरात थपडा मारत होतं. ""च्च्‌...आता कोण कडमडलंय?'' असं म्हणत सदानं दार उघडलं.

अखेर "ती' वेळ आली. सामसूम झाली. सदानं थरथरत दोर उचलला. साप धरल्यासारखा! क्षणभर त्याची चलबिचल झाली. उसना शांतपणा आणत त्यानं दोर कॉटवर ठेवला. मग तो खुर्ची ओढू लागला...
"कुणी आहे का आत? प्लीज, मदत करा. प्लीज, प्लीज!' कुणीतरी दारावर जोरजोरात थपडा मारत होतं. ""च्च्‌...आता कोण कडमडलंय?'' असं म्हणत सदानं दार उघडलं.

होस्टेलच्या खोलीत काळोख पसरू लागला होता. सदाचं मन निराशेनं भरून गेलं होतं. पेपर फारच अवघड गेले होते. खरं तर इंजिनिअरिंग करण्याची जिद्द त्याचीच होती. मामाचा मुलगा इंजिनिअर झाला, त्याची छान नोकरी, घर, पगार हे पाहून सदाच्याही मनानं उचल खाल्ली होती. बाबा "नको' म्हणत असूनही त्यानं जिवापाड मेहनत घेऊन बरे मार्क मिळवून या छोट्या का होईना कॉलेजात प्रवेश मिळवला होता. पहिल्या वर्षीच त्याच्या खरं तर लक्षात आलं होतं, की हे आपल्याला झेपत नाहीए! पण बाबांनी बजावलं होतं ः "आता कच खाल्लीस तर याद राख. फार कष्टानं पैसे उभे केलेत मी.' खूप संतापले होते ते. आईही नाराजच दिसली.

इथं तर काय, "लायकी नाही तर येता कशाला लेको?' अशा दृष्टीनं तुच्छ कटाक्ष टाकणारे सर आणि टर उडवणारे काही मित्र! आता परत परीक्षा दिली तरी आपण पास होणारच नाही. घरी तोंड तरी कसं दाखवायचं? काल पेपर लिहिताना आपला चेहरा पाहून सुपरवायझर कसे छद्मी हसले होते, ते आठवून सदा आणखीच खिन्न झाला. होस्टेलच्या खोलीतले सोबती जेवायला गेले होते. मात्र, सदाला आज भूकच नव्हती. काहीच करावंसं वाटत नव्हतं. रडावं असं वाटतं होतं; पण रडू येत नव्हतं. अचानक त्याची नजर समोरच्या कॉटखाली गेली. त्या मुलांच्या नाटकाचं काही सामान तिथं पडलेलं होतं आणि त्याच्या नजरेस पडला एक दोर! साप पाहिल्यासाखा तो आधी दचकला; पण नजर परत परत तिथं जाऊ लागली आणि "तो' विचार त्याच्या मनात सळसळू लागला. उद्या परीक्षा संपली म्हणून सगळे सिनेमाला जाणार आहेत. इथं कुणीच नसेल. निवांतपणे सगळं करता येईल. ठरलं! मनात योजना पक्की होऊ लागली. कुठं, कसा बांधायचा, पायाखाली खुर्ची पुरेल का? अशा विचारांमध्ये सदा गढलेला असतानाच त्याचे सोबती जेवून खोलीत आले. परीक्षा संपल्यामुळं सगळे आनंदात हसत-खिदळत, चेष्टा-मस्करी करत सुट्टीचे बेत ठरवत होते.
""ए सदा, इथं काय बसलास रे एकटा?''

""जेवायला का नाही आलास रे?'' अरुणच्या प्रश्‍नाला सदानं गूढ हसून उत्तर दिलं.
रात्रभर गप्पा, हळू आवाजात गाणीबिणी झाली. सगळेच उशिरा उठले. सदाचा मात्र रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सगळ्यांच्यात असूनही तो कुठंच नव्हता.
अखेर "ती' वेळ आली. सामसूम झाली. त्यानं थरथरत दोर उचलला. साप धरल्यासारखा! क्षणभर त्याची चलबिचल झाली. उसना शांतपणा आणत त्यानं दोर कॉटवर ठेवला. मग तो खुर्ची ओढू लागला...

"कुणी आहे का आत? प्लीज, मदत करा. प्लीज, प्लीज!' कुणीतरी दारावर जोरजोरात थपडा मारत होतं. ""च्च्‌...आता कोण कडमडलंय?'' असं म्हणत सदानं दार उघडलं. रमेशनं रडवेल्या आवाजात त्याला जवळ जवळ ओढतच खाली नेलं. त्याच्या मित्राला, सुधीरला अपघात झाला होता. होस्टेलच्या बाहेरच रमेशची स्कूटर चालवून बघत असताना त्याला रिक्षाची धडक बसली होती. कितपत लागलंय याचा अंदाज येत नव्हता. दोघांनी मिळून त्याला रुग्णालयात नेलं. उपचार सुरू झाले. रमेश सदाला तिथं बसवून बाबांना बोलवायला गेला. सदा सुधीरची काळजी घेऊ लागला. त्याला धीर देऊ लागला. "मला माझ्या घरी पोचवाल ना?' तो सारखा विचारत होता.
रमेशचे बाबा आले. डॉक्‍टरांना भेटले.

""चेकप्‌ झालं सगळं की उद्या डिस्चार्ज देतो. फार लागलेलं नाहीये.''
""बरं झालं बाबा. थोडक्‍यात निभावलं. काळजी करू नकोस बेटा. ही मुलं येतील तुला घरी सोडायला. घरी कळवलंस का?''
""हो बाबा, थॅंक्‍स.''
दुसऱ्या दिवशी ते दोघे सुधीरच्या गावाला त्याला घेऊन गेले.
""आई-बाबा... हा रमेश आणि हा सदा-सदाशिव. मी काल फोनवर ज्यांच्याविषयी सांगितलं ते हेच,'' सुधीरनं दोघांची ओळख करून दिली.
"चांगलं केलंत रे पोरांना. देवासारखे मदतीला धावलात आमच्या सुधीरच्या!' सुधीरच्या बाबांनी कौतुक केलं. सुट्टीत तिथंच राहायचा आग्रह सुधीरच्या आईनं रमेशला आणि सदाला केला. पाहुणचार तर विचारायलाच नको.
गरमागरम जेवताना सुधीरनं विचारलं ः ""दादा कधी येणार आई?''
""येईल नंतर. त्याचे सतरा उद्योग...''
तेवढ्यात दादा आणि त्याचे मित्र आलेच.
""काय रे, काय पराक्रम केलास बाबा?'' दादानं विचारलं.
जे घडलं ते सुधीरनं सांगितलं. त्यावर दादा म्हणाला ः ""अरे, मी शिकवतो की तुला स्कूटर.''
""पण तुझ्या मित्रांना मात्र शाबासकी द्यायला हवी. तिथं तर तुला मदत केलीच; पण तुला पोचवायला ते इथपर्यंतही आले.''
""आता आमचा प्रकल्प बघायला या संध्याकाळी.'' रमेशला आणि सदाला दादानं निमंत्रण दिलं
संध्याकाळी सगळे दादाबरोबर गेले..."सौरऊर्जा प्रकल्प!
""अरे वा!'' सदाला उत्सुकता वाटली.
दादानं सगळ्यांना माहिती दिली ः ""आम्ही गावातले सात-आठजण एकत्र आलो आणि गावासाठी काहीतरी चांगलं करायचं ठरवलं. पहिला झाला हा सौरऊर्जा प्रकल्प. थोडं शिकावं लागलं. आता गावात सौरचुली, रस्त्यावरचे दिवे, गिरणी, विहिरीतून पाणी उपसणारी मोटार अशी बरीच उपकरणं आम्ही गावाला दिली आहेत. सरपंचांनी आम्हाला पाठिंबा तर दिलाच; पण सरकारी आर्थिक मदतही मिळवून दिली.''
""हे सगळं कसं चालतं ते दाखवाल?''
""हो, हो...जरूर. उद्या सगळा गावच हिंडू या. तुमचं जेवण कसं शिजतं, रस्त्यावर, शाळेत प्रकाश कसा पडतो, विहिरीतून पाणी कसं काढतात हे सगळं दाखवतोच; पण दुसराही प्रकल्प गावात बघायला मिळेल.''
""दुसरा कोणता?''
""आम्ही ओल्या कचऱ्यापासून खत करतो. ते तर शाळेतल्या मुलांना, बचतगटाच्या महिलांना शिकवलंय, त्यामुळं अनेक घरांमध्ये, परसबागेत फुलं, फळं, भाज्या छानपैकी उगवतात. शाळेतही मस्त बाग फुलली आहे. शिवाय, आता काही शेतकरी मिळून पाण्यासाठी योजना तयार करताहेत. शेततळी, काही बंधारे...पण ते अजून सुरू व्हायचंय.''
सुधीरच्या घरी या सगळ्याचा अनुभव येतच होता. सौरचुलीवरलं चविष्ट जेवण...परसातल्या वांग्याचं चमचमीत भरीत...ते खाताना मात्र सदाला आईची आठवण झाली. आईच्या आठवणींनी त्याच्या घशात आवंढा आला.
काल "ते' सगळं घडलं असतं तर...! आईला काय वाटलं असतं! तो जेवताना थबकला.
""जेव की लेकरा पोटभर. घरची आठवण आली काय?'' सुधीरची आई वाढताना म्हणाली.
""घे रे सदा. भाजी घे नं आणखी'' सुधीरचा आग्रह ऐकून सदा भानावर आला.
इतर ठिकाणी विजेचं भारनियमन असताना इथला उजेड बघून त्याच्या डोक्‍यातही थोडा थोडा प्रकाश पडू लागला... अरे, करण्यासारखं कितीतरी आहे. अभ्यास, नोकरी हीच काही आयुष्यातली एकमेव गोष्ट नव्हे. गावातलं हे सगळं बघून सदानं मनाशी एक निर्णय घेतला.

""मी मित्राच्या गावी सुट्टी घालवत आहे...'' असं त्यानं पत्र पाठवून बाबांना कळवलं. रमेश दुसऱ्या दिवशी परत गेला. सदानं मात्र सुट्टीभर तिथंच राहून दादाबरोबर काम केलं. नवनवी तंत्रं त्यानं शिकून घेतली. दादा आणि इतर मंडळी आपापला व्यवसाय-नोकऱ्या सांभाळून हे सगळं करत होते. त्यांनी सदावरही काही जबाबदाऱ्या टाकल्या. संगणकावरचं काही काम तो करू लागला. आणखी एक गोष्ट सदानं आपणहून केली. वर्तमानपत्रांतल्या सकारात्मक बातम्या तो जमवू लागला. त्या बातम्या संध्याकाळी सगळ्यांना दाखवून त्यावर त्या प्रयोगशील मंडळींबरोबर होणारी चर्चा त्याला आवडू लागली. तिथल्या वाचनालयातली पुस्तकं सदानं वाचली. समाजातल्या वंचितांसाठी, दीन-दुःखितांसाठी समर्पित भावनेनं आपली आयुष्यं वेचणाऱ्या अनेक कुटुंबांची, दांपत्यांची उदाहरणं त्याला प्रेरणादायी ठरू लागली...ती त्याचा आदर्श बनली. सदामध्ये आता एक प्रकारचा वेगळाच आत्मविश्‍वास आला. सुट्टी संपल्यावर तो बाबांना भेटला. कॉलेज सोडण्याचा आपला निर्णय त्यानं बाबांना ठामपणे सांगितला.
""सॉरी बाबा, मी चुकलो. हट्ट केला; पण मला नाही जमणार हा अभ्यास.''

बाबांच्या चेहऱ्यावरची निराशा त्याला स्पष्ट दिसली. "सुधीरच्या घरी हा महिनाभर होता; कसला नाद नाही नं लागला याला?' हे बाबांचे विचार मात्र त्याला वाचता आले नाहीत; पण त्यानं आपणहून दादाच्या आणि त्याच्या मित्रांच्या कामाचं वर्णन केलं. आपण कॉलेज कशासाठी सोडत आहोत, हे सदानं बाबांना प्रभावीपणे पटवलं. गावच्याच कॉलेजमधून साधी पदवी घेऊन दादासारखं नोकरी करता करता गावासाठी काय करायचं ते सांगितलं. आई-बाबांना आणि आपल्या गावच्या सरपंचकाकांना सुधीरचा गाव दाखवायला नेऊन आणलं आणि परत आल्यावर गावातल्या तरुणांना एकत्र आणलं. दादाच्या मार्गदर्शनाखाली सदानं काम सुरू केलं. लवकरच त्याच्या गावाचाही कायापालट झाला.
***
सदाशिवदादांना आता गावातले लोक खूप मानतात. त्यांचा गाव बघायला शाळा-कॉलेजच्या सहली येतात. सदादादा सगळ्यांशी मोकळेपणानं बोलतात...त्यांचं शंकानिरसन करतात.
एखादे गुरुजी सदादादांना विचारतात ः ""काय संदेश द्याल तुम्ही आमच्या मुलांना?'' आणि सदादादा संदेश देतात ः ""ऑलवेज बी पॉझिटिव्ह!''

Web Title: chandra kolatkar write article in saptarang