

Chennai Rainwater Harvesting Model
esakal
महेश बर्दापूरकर - saptrang@esakal.com
‘तहान लागल्यावर विहीर खणणे’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, मात्र चेन्नई हे शहर पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरभर रिचार्ज वेल खणत आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पावसाचे पडणारे ८० ते ९० टक्के पाणी जमिनीत मुरवते आहे. या सर्व व्यवस्थेचे प्रणेते आहेत ‘रेन मॅन ऑफ चेन्नई’ डॉ. शेखर राघवन.
‘रेन सेंटर’च्या माध्यमातून ते शहरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचून त्याला पाण्याचे महत्त्व गेली ३० वर्षे समजावून सांगत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून शहर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनते आहे. या प्रयोगातून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतांश भागाला खूप काही शिकण्यासारखे आहे...
देशात यंदाच्या वर्षी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असेल, असे हवामान विभागाने जाहीर केले आणि देशवासीयांच्या हृदयाचा ठोका चुकला. पश्चिम महाराष्ट्रात एल निनोचा प्रभाव खूपच कमी दिसला असला, तरी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. या परिस्थितीत पुन्हा एकदा पाण्याची बचत, जलस्रोतांचे पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे मुद्दे ऐरणीवर आले. देशात पाण्याची बचत व रेन वॉटर हार्वेस्टिंग सर्वांत चांगल्या प्रकारे कोठे केले जाते, या प्रश्नाचे उत्तर विविध स्रोतांच्या माध्यमातून घेण्यास सुरुवात केली. त्यातून चेन्नई या शहराचे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे मॉडेल परिपूर्ण असून, शहर पडणाऱ्या पावसातील ८० ते ९० टक्के पाणी जमिनीत मुरवते, अशी माहिती मिळाली. ही व्यवस्था काय आहे, त्याचे प्रणेते कोण, ती एवढी यशस्वी होण्याची कारणे काय याचा शोध सुरू ठेवला. त्यातून डॉ. शेखर राघवन यांचे नाव समोर आले. त्यांच्याशी प्रथम मेलद्वारे व नंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा व्हायला सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम कसे चालते, हे पाहिल्याशिवाय त्याचा आवाका समजणार नाही, हे लक्षात आल्यावर चेन्नईमधील डॉ. राघवन चालवत असलेल्या ‘रेन सेंटर’ला भेट देण्याचा व शहरभर ते करीत असलेले काम समजून घेण्याचा निर्णय घेतला.