दस बहाने कर के...

नमस्कार मित्रांनो! आज आपण ‘सबबी’ या विषयावर बोलू या. एक्सक्यूजेस...एक्सक्यूजेस...एक्सक्यूजेस... आपण किती सबबी शोधत असतो! ‘दस बहाने कर के ले गई दिल’ गाण्यातल्यासारख्या.
Good and Bad
Good and BadSakal
Summary

नमस्कार मित्रांनो! आज आपण ‘सबबी’ या विषयावर बोलू या. एक्सक्यूजेस...एक्सक्यूजेस...एक्सक्यूजेस... आपण किती सबबी शोधत असतो! ‘दस बहाने कर के ले गई दिल’ गाण्यातल्यासारख्या.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो! आज आपण ‘सबबी’ या विषयावर बोलू या. एक्सक्यूजेस...एक्सक्यूजेस...एक्सक्यूजेस... आपण किती सबबी शोधत असतो! ‘दस बहाने कर के ले गई दिल’ गाण्यातल्यासारख्या. आज आपण याचसंदर्भात ‘हीरो ब्रेन’ आणि ‘फट्टू ब्रेन’ ही संकल्पनाही समजून घेऊ या.

आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असतं की, ‘जॉब नॉट डन’ + गुड एक्सक्यूज = जॉब डन. म्हणजेच काम करायचं नाही आणि त्याबद्दल चांगल्यापैकी सबब सांगायची, की झालं...काम झालं! हे काम केल्यासारखं आहे. आपल्याला असं वाटत असतं की, काम करा, नाही तर सबब सांगा. आणि ही सबब जर चांगली असेल, ‘पटणीय’ असेल, ‘जस्टिफाईड’ असेल तर अशी सबब फेकली की काम झालं अशी आपली समजूत असते. म्हणजेच, काम करा अथवा करू नका; पण आपल्याकडे चांगली, म्हणजे लोकांना पटण्याजोगी सबब असली म्हणजे झालं, असं वाटत असेल तर मग काय बोलायचं?

पण हे योग्य नाही.

सबबी शोधण्यामुळं काय होतं? त्या तुम्हाला त्या त्या वेळी समोर असलेल्या प्रश्नांतून सुटका करून घेण्यास मदत करतात. समजा, तुम्हाला गृहपाठ करायची इच्छा नसेल तर तुम्ही काहीतरी सबब पुढं करता. तुमच्या टीचरनाही ती पटते. मग तुम्हाला वाटतं, ‘गृहपाठ करून तरी मला काय लाभ मिळणार होता! सबब सांगून वेळ मारून नेता आली ना? सबब पुढं केल्यामुळं सुटका झाली ना?

पण हे लक्षात घ्या की, सबबीनं तुमची त्या वेळेपुरती सुटका केलेली असते. याचाच अर्थ असा की, सबबींमुळं तुमचं कुठलंही काम पूर्ण होत नाही. त्यामुळे तुमचं काम फक्त पुढं ढकललं जातं...ते तडीला जात नाही, आणि तरीही तुम्ही-आम्ही सबबी शोधत असतो. सबब शोधणं ही काही सोपी गोष्ट नाही. तीसुद्धा एक कला आहे...एक उत्तम कलाप्रकार!

काही लोक अतिशय छान सबबी शोधतात. तुमचे काही मित्र या कलेत पारंगत असतील. ते इतक्या उत्तम सबबी शोधतात की, ते सबब पुढं करत आहेत हे तुम्हाला कळत असूनही, त्यावर काय बोलायचं असा तुम्हाला प्रश्न पडतो.

सबब शोधायलासुद्धा कष्ट पडतात. ही एक कला आहे हे नाकारता येणार नाही; पण ही काही चांगली गोष्ट नाही.

‘सर, लॉकडाउन आहे, सर. माझ्या बिल्डिंगमध्ये चार कोरोना केसेस झाल्या आहेत, म्हणून मी हे काम करू शकलो नाही, सर.’

‘माझी काकू आजारी होती, सर. सध्या काय परिस्थिती आहे ते तुम्हाला माहीतच आहे सर...म्हणून मी हे ‘प्रेझेन्टेशन’ करू शकलो नाही...’

अशा सबबी येत असतात.

त्याच्या पुढची पायरी म्हणजे, तुम्ही स्वतःलाच सबबी सांगू लागता.

‘आज मला जिमला जाणं जमणार नाही...आज मी रनिंगला जाऊ शकणार नाही...आज व्यायाम करणं शक्यच नाही, आज मला प्रचंड काम आहे...आय ॲम व्हेरी स्ट्रेस्‍ड्!’

या झाल्या ‘मीडियम क्वालिटी’च्या सबबी. पण अशा सबबी असतात.

त्यानंतरचा टप्पा म्हणजे बड्या सबबी. या सबबी दीर्घकालीन असतात.

‘माझ्या आयुष्यात काहीही खास घडणार नाहीये. कसं घडणार? मी या इतक्या छोट्या गावात जन्मलोय किंवा माझं इंग्लिश फारसं चांगलं नाही किंवा मी दिसायला फारसा चांगला नाही किंवा माझ्या वडिलांचे कुठं लागेबांधे नाहीयेत... कनेक्शन्स!’

अशाही सबबी असतात. या ‘लाँग टर्म’ सबबी आहेत. या सबबी कुठलं एखादं काम न करण्यापुरत्या किंवा काम टाळण्यासाठी नसतात. ...या सबबी गृहपाठ टाळण्यासाठी नसतात, तर आयुष्यात काहीही मोठं न करण्यासाठीच्या असतात आणि अशा सबबी सगळ्यात खतरनाक असतात... अशा सबबी, ज्या तुम्ही स्वतःलाच सांगत असता.

तुम्ही दुसऱ्या कुणाला सबबी सांगून मूर्ख बनवलंत तर ते वाईटच आहे; पण तुम्ही स्वतःलाच सबबी सांगून मूर्ख बनवता आणि ते इतक्या प्रमाणात बनवता की, ‘मला आयुष्यात काही करायचंच नाहीये. क्यूँ की मेरा कुछ नही हो सकता’ असं मानू लागता आणि त्याचं तुमच्याजवळ सबळ कारणही असतं. ही सर्वांत भयंकर गोष्ट आहे.

‘माझा मूड गेलाय, यार...चल यार, मी केक खातोय. मला ‘डाएट’ सुरू करायचंय; पण मी चार चिप्स खातोच. एरवी मी तोंडावर ताबा ठेवला असता...पण माझा मूड गेलाय ना...!’

‘आता मी काहीही काम करू शकत नाही. आता मला खूप मानसिक ताण आहे...मी तीन आठवड्यांनी काम सुरू करीन...’ असं म्हटलं तर कोण काय बोलणार? हे तुम्ही स्वतःचं स्वतःलाच सांगितलं आहे, पटवून दिलेलं आहे.

‘माझी गर्लफ्रेंड आहे, सर,’ तुम्ही म्हणता...पण हे तुम्ही स्वतःचं स्वतःलाच सांगत असता. ‘कशी आहे बघा...मला ती मार्केटमध्ये दुसऱ्या मुलाबरोबर दिसली. आता माझ्याच्यानं कसा अभ्यास होणार? नाही...नाही...मी तीन-चार दिवस तरी अभ्यास करू शकत नाही.’ ही तुमची सबब असते.

‘मी तर ‘डाएट’ सुरू करूच शकत नाही. मला ना गोड खावंच लागतं. आय मस्ट हॅव शुगर. मस्ट हॅव दॅट. काय सांगू? माझं बाकीच्या लोकांसारखं नाहीये...त्यांचं कसं असतं, ते ‘ॲडजस्ट’ करतात; पण माझं कसं होतं, माझी ब्लड शुगर लो होते. मला कसं तरी होऊ लागतं. त्यामुळं माझ्यासाठी हे ‘मस्ट’ असतं. माझं त्यावाचून चालतच नाही.’

ठीक आहे! एखाद्यानं असं ठरवूनच टाकलं असेल तर आपण काय करणार?

मी तुम्हाला सबबी कशा असतात याची उदाहरणं सांगतोय.

‘मला ना गणित जमत नाही...आधीच सांगून ठेवतो...’ आता हे तुम्ही स्वतःला आधीच सांगून ठेवलेलं असतं.

‘माझं त्यावर चित्त एकाग्रच होत नाही. बाकीचे लोक त्यावर चित्त एकाग्र करतात, अभ्यास करतात; पण माझं त्यावर चित्त एकाग्रच होत नाही...आय ॲम नॉट मेन्ट फॉर दॅट...’

आता या सबबी आहेत की नाही हे तुम्हीच सांगू शकता. या सबबी आहेत की नाही हे तुमच्या मनाला माहीत असतं. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी न करण्यासाठी तुम्ही स्वतःलाच सबबी सांगता आणि त्या पटवूनही घेता हे चांगलं नाही. या सबबी तुम्हाला संपवतात. तुमची स्वप्नं, तुमचा आनंद, तुमची खुशी या सगळ्याला चूर चूर करतात. तुम्हाला आयुष्यात जे जे मिळवायचं आहे, तुमच्या ज्या काही इच्छा-आकांक्षा आहेत, त्या सगळ्याला या सबबी सुरुंग लावतात.

तुमच्या आत बसलेला, सबबी तयार करणारा हा ‘सबब्या’ इतका तयारीचा आणि या ‘कलाप्रकारात’ इतका कुशल झालेला असतो की, तो तुम्हाला सांगतो, ‘हे काम करायची काय गरज आहे? मी तुम्हाला मस्तपैकी सबब सांगतो, ती पुढं करा आणि हे काम सरळ टाळून मोकळे व्हा.’

आता हे सगळं कशामुळे घडतं? आणि मी सुरुवातीला ‘हीरो ब्रेन’ आणि ‘फट्टू ब्रेन’ म्हणालो होतो, त्याचा या सबबींशी काय संबंध असतो? मुळात आपण अशा सबबी का शोधतो? खरं तर आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं असतं. आपल्याला अभ्यास करायचा असतो; पण आपलंच मन सबबी शोधतं, आपली जिमला जाण्याची इच्छा असते; पण आपलंच मन आपल्याला रोखतं...असं का घडतं? हे गोंधळून टाकणारं असतं. आपली ज्या गोष्टी करण्याची इच्छा असते, त्या करण्यापासून आपलंच मन आपल्याला रोखत असतं. असं का घडतं?

आपण असं मानू या की, आपल्याला दोन मेंदू असतात. एक ‘निश्चयी मेंदू’...ज्याला काहीतरी साध्य करायचं असतं. आपण त्याला ‘हीरो ब्रेन’ म्हणू या. हा तुम्हाला ‘मला भरपूर पैसे कमवायचे आहेत...मला या परीक्षेत चांगली कामगिरी करायची आहे...मी उत्तम शरीरसौष्ठव प्राप्त करीन...मी पाच किलो वजन घटवीन...’ अशा प्रेरणा देत असतो. आपल्या सर्वांमध्ये हा ‘हीरो ब्रेन’ असतो; पण त्याचबरोबर आपल्यात आणखी एक मेंदू असतो, ज्याला मी ‘भयभीत मेंदू’ किंवा ‘फट्टू ब्रेन’ असं म्हणतो. हा ‘फट्टू ब्रेन’ घाबरलेला असतो, म्हणून तर आपण त्याला ‘फट्टू’ म्हणतोय; पण हा ‘फट्टू ब्रेन’ मूर्ख नसतो. तो चांगला हुशार असतो. तो ज्या सबबी काढतो-सुचवतो, त्या विलक्षण असतात. हा ‘फट्टू ब्रेन’ जितका चलाख, तितका तो तुम्हाला उत्तम सबबी शोधून देतो.

मी आता सत्तेचाळीस वर्षांचा आहे. माझ्या मनात येतं, ‘आता या वयात मी इतकं अंतर धावूच शकणार नाही. माझ्या शरीराला हे झेपणारच नाही. आणि हे कॅलरी मोजून खाणं, कॅलरी कमी करणं...नाही जमणार हे...मला सतत भुकेची जाणीव राहील. मला कॅलरी कमी पडल्या तर, मी ‘डाएट’ सुरू केलं तर, मला लेखन कसं जमणार? आता तर लॉकडाउन आहे...कोरोना आहे...आता मी यूट्यूब-व्हिडिओ कसे तयार करणार? मला ते करावसंच वाटत नाहीये... आणि आता यूट्यूब? इतक्या वर्षांनी? गेल्या १०-१५ वर्षांत तू काही केलं नाहीस आणि आता २०२०-२१ मध्ये ‘यूट्यूबर’ होतो आहेस? वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी?’’

हे सगळं काय आहे सांगू का? हा माझ्या आतल्या ‘फट्टू ब्रेन’ बोलत असतो.

‘एव्हाना लोकांचे लाखो सबस्क्रायबर्स झाले आहेत. तू तर आता सुरुवात करतो आहेस. हे सगळं करण्यात काय अर्थ आहे...?’

या फक्त सबबी...सबबी...आणि सबबी असतात.

हा माझ्या आतला ‘फट्टू ब्रेन’ अतिशय हुशार आहे. तो मला घाबरवत असतो. ‘तू अमुक गोष्ट करू नकोस’, ‘अमुक गोष्ट नाही झाली तर...तमुक गोष्ट नाही जमली तर...?’ असा त्याचा ‘फट्टू’पणा सुरू असतो. आणि मुख्य म्हणजे सबबी...’ वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी कुणी ‘यूट्यूबर’ होतं का, सांग...’

आणि मी जर या ‘फट्टू’महाशयांचं ऐकत बसलो असतो तर मी एव्हाना भरपूर ‘वजनदार’ झालो असतो. मला रोज आठ किलोमीटर धावता आलं नसतं. मी कुठलाही यूट्यूब-व्हिडिओ तयार करू शकलो नसतो. माझे आता जे ‘सबस्क्रायबर्स’ आहेत तेही मला मिळाले नसते...

पण मी हे सगळं साध्य केलं आहे. माझे हे व्हिडिओ आता आयुष्यभरासाठी आहेत. यूट्यूबचं जग जोपर्यंत असेल, तोपर्यंत हे व्हिडिओ असतील!

हे मी कसं साध्य केलं असेल?

तर त्यासाठी मी माझ्या ‘हीरो ब्रेन’ला ‘फट्टू ब्रेन’वर मात करायला लावली. त्यासाठी मी या दोघांचा संवाद घडवला. त्याआधी मी, असे ‘दोन महाशय’ आहेत, हे लक्षात घेतलं. मग एके दिवशी मी या दोघांना मनातल्या मनात एकत्र बोलवलं. त्यांना म्हटलं : ‘‘या बसा. फट्टूजी बसा...हीरोजी बसा...काय म्हणताय?’’

मग माझा ‘हीरो ब्रेन’ हा ‘फट्टू ब्रेन’ला म्हणाला : ‘‘हे बघ मित्रा, आपण एकत्र राहतो. आपल्याजवळ पर्यायच नाहीये. आपल्याला एकत्रच राहावं लागणार आहे. तू एक गोष्ट लक्षात ठेव. मी ‘हीरो ब्रेन’ आहे. मी मैदान सोडून जाणार नाही. मी हार मानणार नाही. मी धावायचं ठरवलं असेन तर मी धावणारच. आता तू जर म्हणत राहिलास की, सर, तुमचे गुडघे धरलेत, तुमचे पाय दुखतायत, तुम्ही दमला आहात...तुम्ही घामाघूम झाला आहात, इतका उकाडा आहे...असंच काय काय... तर तू खुशाल म्हण. तू तुला काय करायचंय ते कर; पण मी मागे हटणार नाही. मी हा व्हिडिओ तयार करणारच आहे, मग तो चांगला होऊ दे, नाहीतर वाईट, मी तो करणारच. फट्टूजी, आता तू सांग, तू काय करणार आहेस? तू मागं राहून आरडाओरडा करत राहणार आहेस का...‘हे करू नकोस...करू नकोस...’ म्हणून? पण मी काही थांबणार नाहीये. तूच स्वतःला त्रास करून घेशील. मी काही मागं हटणार नाहीये हे तुझ्या लक्षात आलं असेल तर तूसुद्धा ही भीती सोडून दे. ‘ठीक आहे बाबा. कर’, असं म्हण. तू मला थोडासा तरी ‘पॉझिटिव्ह सपोर्ट’ दे रे. तू ‘फट्टू’ आहेस. तू कुठलं ध्येय बाळगू नकोस, कसली मेहनत करू नकोस; पण किमान थोडीशी तरी मदत कर, काहीतरी मदत कर.’’

मग हळूहळू ‘फट्टू ब्रेन’च्या लक्षात आलं की, हा माणूस काही मागं हटणार नाही. त्यानं निश्‍चय केला आहे, आता तो काही ऐकणार नाही.

आता मला ‘फट्टू ब्रेन’ मदत करतो. आता तो ‘आता वातावरण मस्त आहे ना!’ असं म्हणतो. एरवी, हेच तो ‘किती घामाघूम होतंय!’ असं म्हणायचा; पण आता तो म्हणतो, ‘घामाघूम होत असलं तरी किती छान झुळूक येतीय...आता तू रोज धावायला जातोस हे किती चांगलं आहे.. त्यामुळं तुला खूप छान वाटतंय.’

आता हा ‘फट्टू ब्रेन’ माझ्या पक्षात आला आहे. आता तो माझा मित्र झाला आहे. कारण, त्याच्या लक्षात आलंय की, हा काही मागं हटणार नाही, आपण याला पाठिंबा द्यावा, हे बरं! आता तो मला म्हणतो : ‘अरे वा! तू तर किती व्हिडिओ केलेस! इतक्या कमी काळात तुला लोकांचं किती भरभरून प्रेम मिळालंय!’

आता माझी फट्टूशी चांगली मैत्री झाली आहे. आता मी त्याची चेष्टा करत नाही; पण मी त्याला बजावलं आहे, ‘हे बघ, तू माझं ऐकायचंस...तू मेरे नीचे रहेगा. तू माझा मित्र आहेस; पण तू मला घाबरंवायचं नाहीस. मी एखादी गोष्ट करण्याचा निश्‍चय केला की मी ती गोष्ट करणारच.’ असं करत करत मी माझ्या ‘हीरो ब्रेन’ला बळ देत राहिलो आणि सबबींवर मात केली.

हा फट्टू ब्रेन ‘इमोशनल’ असतो. तो एखाद्या इमोशनल झाम्या मित्रासारखा असतो. त्याला तुम्ही जवळ घेतलंत, प्रेमानं समजावलंत की ‘माझा निश्‍चय दृढ आहे’ तर तो तुम्हाला पाठिंबासुद्धा देऊ शकतो. आणि तुम्हाला त्याचा पाठिंबा मिळाला तर तुमचा ‘हीरो ब्रेन’ आणखी चांगल्या प्रकारे काम करेल.

अशा प्रकारे जेव्हा तुमचा ‘हीरो ब्रेन’ व ‘फट्टू ब्रेन’ समक्रमित म्हणजे ‘सिंक’ होतील, तेव्हा तुम्ही सबबी शोधणं बंद कराल. तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीच्या दिशेनं काम कराल. तुम्ही कुठलीही ‘डेडलाइन’ चुकवणार नाही आणि आयुष्यात तुम्ही खूप प्रगती कराल, खूप पुढं जाल.

तुमच्या ‘हीरो ब्रेन’ला तुमच्या ‘फट्टू ब्रेन’वर मात करू द्या. मग पाहा, तुमचं यश कसं बहुगुणित होतं ते!

टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com