हारी बाजी को जीतना हमें आता है।

आयुष्यात कधी कधी आपण आत्मविश्‍वास गमावून बसलेले असतो...अगदी शून्यावर येतो तो! आयुष्य आपल्या इतक्‍या कानफटात लावतं, इतके धक्के देतं की आपण अक्षरशः आडवे होतो...भुईसपाट.
हारी बाजी को जीतना हमें आता है।
Summary

आयुष्यात कधी कधी आपण आत्मविश्‍वास गमावून बसलेले असतो...अगदी शून्यावर येतो तो! आयुष्य आपल्या इतक्‍या कानफटात लावतं, इतके धक्के देतं की आपण अक्षरशः आडवे होतो...भुईसपाट.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

आयुष्यात कधी कधी आपण आत्मविश्‍वास गमावून बसलेले असतो...अगदी शून्यावर येतो तो! आयुष्य आपल्या इतक्‍या कानफटात लावतं, इतके धक्के देतं की आपण अक्षरशः आडवे होतो...भुईसपाट. आयुष्यात काहीच सुरळीत होत नसतं. एकेकाळी माझीही अशीच अवस्था झाली होती. माझं पुस्तक प्रकाशित होत नव्हतं...बॅंकेतल्या नोकरीतही माझं नीट चाललं नव्हतं...आयुष्यात काहीच चांगलं घडत नव्हतं. मला सतत उदासीनं वेढलेलं असायचं. एखादा मुष्टियोद्धा ठोशांवर ठोसे लगावतोय...लगावतोय आणि आपण ‘नॉकआऊट’ होणार अशी कधी कधी अवस्था येते. अशा वेळी काय वाटतं, ते मला चांगलं माहीत आहे. हा अनुभव तुम्हीही घेतला असेल किंवा आयुष्यात कधीतरी तुम्हाला हा अनुभव येऊ शकेल.

आयुष्यात कधी कधी लहानसं अपयश येतं. अशा वेळी तुम्ही पुन्हा उठून, कपडे झटकून कामाला लागता. आज नाही जमलं; ठीक आहे, उद्या जमेल अशा आशेनं वाटचाल सुरू ठेवता; पण काही वेळा आयुष्यात फार जोराचा झटका बसतो...अगदी वाईट झटका. अशा वेळी आपण इतके कोलमडतो की, आता पुढं काय करायचं हेच कळत नाही. अशा अवस्थेत कुणाचे उपदेश-सल्ले, ‘मोटिव्हेशनल’ व्हिडिओ, लेख वगैरे पाहिले-ऐकले की वाटतं, ‘काय सांगताहेत हे लोक? मी कशाकशातून चाललोय हे माहीत आहे का तुम्हाला? आता माझी काय मनोवस्था आहे हे कळतंय का तुम्हाला? आता माझ्याच्यानं एक पाऊलसुद्धा टाकवत नाहीये हे दिसतंय का तुम्हाला?

कधी तुम्हाला नोकरी मिळत नसते, तुमच्या करिअरच्या दृष्टीनं काहीही चांगलं घडत नसतं किंवा तुमचं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम असतं; पण त्या व्यक्तीशी तुमचं फाटतं...अगदी ‘गंदावाला ब्रेकअप’ होतो, अशा वेळी तुमचं डोकं काम करत नाही, हृदय ‘शतशः विदीर्ण’ झालंय असं वाटतं. अशा परिस्थितीत कुणी ‘अरे, तू मेहनत कर, उठ, कामाला लाग,’ अशा वरवरच्या गोष्टी केल्या तर त्या पचवणं मुश्‍किल असतं.

आयुष्यात जर कधी अशी कडेलोटाची अवस्था आली तर, कुठल्याही सामान्य उपायांचा उपयोग होणार नाही अशी स्थिती आली तर काय करायचं? अशा परिस्थितीत पुन्हा उमेदीनं कसं उभं राहायचं?

अशा वेळी मी तुम्हाला मुठी आवळून, ‘कमॉन, गेट अप हीरो,’ असं म्हणणार नाही. ही माझी ‘मोटिव्हेशन’ची ‘स्टाइल’ नाही आणि अशा पडत्या काळात तर या पद्धतीचा मुळीच उपयोग नसतो.

अशी उदासवाणी अवस्था सध्या किती तरी जणांची आहे. गेल्या दोन वर्षांपासूनच्या कोरोनामुळे लोकांचं आधीच पेकाट मोडलंय. काहींच्या घरी मृत्यू झालेत, काहींची नोकरी गेलीय, काहींचे धंदे बंद पडलेत, काहींच्या घरांवर जप्ती आलीय... त्यांना ईएमआय देणं शक्‍य होत नाहीये. कुठलीही समस्या सांगा...तिचा ‘कर्ता-करविता’ कोरोनाच आहे.

तुम्ही एखादा बेत आखला असेल, अमुक एखादा उद्योग सुरू करायचं ठरवलं असेल; पण ते शक्‍य होत नाहीये.

माझ्याबाबतीत सांगायचं, तर मी इतके कार्यक्रम करत होतो, देशभर फिरून ‘मोटिव्हेशनल’ व्याख्यानं देत होतो; पण हे सगळं आता ठप्प झालंय. सिनेमांबद्दल बोलायचं तर सध्या सिनेमाचं ‘प्रोजेक्‍ट’ सुरू करणं तर फारच अवघड झालंय. त्यात खूप मोठी ‘रिस्क’ आहे.

कोरोनाचा तुमच्या आयुष्यावरही असाच परिणाम झाला असेल. आता वाटचाल सोपी नक्कीच नाहीये. अशा अवस्थेत काही न करता बसायचं म्हणजे...मला ते शक्‍य आहे. मी वयानं मोठा आहे तरी मला ते अवघड जातंय.

अशा वेळी मी विचार केला, ‘यू-ट्यूब’ करून पाहू या. मी प्रत्यक्ष कुठ जाऊन ‘मोटिव्हेशनल’ व्याख्यानं देऊ शकत नसलो म्हणून काय झालं? मी ‘यू-ट्यूब’वर तर ती देऊ शकतो की! आता मी ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय.

माझ्या दृष्टीनं हे सांगणं सोपं आहे. कारण, माझं बरंच जगून झालंय. मी सत्तेचाळीस वर्षांचा आहे; पण मी जर वयानं कमी असतो तर आणि असा कुठलाही तडाखा मला बसला असता तर, त्यातून उठणं मलाही अवघडच होतं. त्या वेळी माझ्यापाशी ना कुठला अनुभव होता, ना कुठले साधन-स्रोत होते.

मग अशा तडाख्यातून सावरून पुन्हा कसं उभं राहायचं?

आयुष्यात असा मोठा तडाखा बसतो तेव्हा माणसासमोर दोन मार्ग असतात - नकारात्मक व सकारात्मक. ‘मेट्रिक्‍स’ सिनेमात आहे ना, ‘रेड पिल - ब्लू पिल’ तसं.

नकारात्मक मार्ग म्हणजे काय?

नकारात्मक बोलणं - अमुक झालं, तमुक झालं. माझ्याबाबतीत फार वाईट झालं असं बोलायचं, मग कुणावर तरी खापर फोडायचं. हे असं व्हायला नको होतं, अमुक माणसानं माझी वाट लावली, हे लोक असं वागताहेत...अशा तक्रारी करायच्या आणि मग दारूकडे वळायचं, धूम्रपान करायचं, लोकांपासून फटकून राहायचं, व्हिडिओ गेम्समध्ये रमायचं, ‘पोर्न’च्या नादी लागायचं... चुकीचा मार्ग धरायचा.

तुम्ही या मार्गावर जितके पुढं जाल तितकं मागं फिरणं मुश्‍किल होईल.

दुसरा पर्याय आहे - सकारात्मक मार्ग.

तुमची अवस्था कितीही बिकट असली तरी, तुम्ही विवराच्या अगदी तळाशी गेलेले असलात तरी, तुमच्या आतून एक आवाज येत असतो, ‘काही तरी करायला पाहिजे...काहीतरी करावंच लागेल.’ अशा वेळी तुम्हाला फक्त एवढंच वाटत असतं, बस्स एवढंच! त्यात ‘ऊठ मुसाफिर, कुछ करना है’ वगैरे नसतं.

अशा परिस्थितीत मी तुम्हाला इतकंच सांगेन की, तुम्ही तुम्हाला जे काही शक्‍य असेल ते करा. तुम्ही तुमच्या हातात जे काही असेल ते करा. समजा, तुमचा ब्रेकअप झाला असेल तर, समोरच्या व्यक्तीचं वागणं काही तुमच्या हातात नसतं. समजा, तुमची नोकरी गेली असेल तर, त्याबाबतीत तुम्ही काहीच करू शकत नाही. ती तुमच्या हातातली गोष्टच नसते.

मग तुमच्या हातात काय असतं?

तुम्ही सकाळी उठून पांघरुणाची घडी घाला. बेडशिट नीट अंथरा. ही गोष्ट तुमच्या हातात आहे. तुम्ही घरातला केर काढा, ते तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमच्या खोलीची साफसफाई करा, ते तुमच्या हातात आहे. हे वाचून तुम्ही म्हणाल, ‘हे तुम्ही काय सांगताय? हे करून मी आयुष्यात पुढं कसा जाईन?’

तुम्ही जेव्हा अशा अवस्थेतून जात असता, तेव्हा तुमचा आत्मविश्‍वास शून्यावर आलेला असतो...उणे असतो म्हणू या. अशा वेळी तुम्ही मानसिक स्तरावर काही गोष्टी साध्य करणं गरजेचं असतं. तुम्हाला अगदी कुठली मोठी कर्तबगारी गाजवता आली नाही, तरी छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करण्यानं, काही तरी साध्य करण्यानं हळूहळू तुमचा गमावलेला आत्मविश्‍वास परत येईल.

तुमचा विस्कटलेला बिछाना तुम्ही नीट आवरून छानपैकी अंथरलात तर या कामाबद्दल जग तुमचं कौतुक करणार नाही; पण त्यामुळं तुमचं तुम्हालाच बरं वाटेल. आपण काहीतरी व्यवस्थित पूर्ण केलं, या गोष्टीचं तुम्हाला समाधान वाटेल. अशा वेळी तुम्ही घरातल्यांसाठी काही पदार्थ तयार करा, नाश्‍ता तयार करा, जास्त विचार करत राहू नका. अशा गोष्टी करा, ज्या गोष्टी करणं तुम्हाला शक्‍य आहे, ज्या गोष्टी करणं तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ज्या गोष्टी कराल, त्या उत्तमरीत्या करा. अगदीच सॅंडविच तयार करण्यासारखं काम असलं तरी ते उत्तमरीत्या करा; म्हणजे, तुम्ही सॅंडविचवाला व्हा, असं मला म्हणायचं नाहीये; पण तुम्ही काहीतरी साध्य करा. आपण काहीतरी करू शकतो असं स्वतःच्या मनाला, शरीराला दाखवून द्या...किमान मी फरशी तरी पुसू शकतो... सॅंडविच तरी तयार करू शकतो...बिछाना तरी व्यवस्थित घालू शकतो... अशा गोष्टींपासून तुम्ही ‘वर’ यायला सुरुवात करा. मग त्यानंतर काही दिवसांनी पुढं काय करायचं याचा विचार करा. समजा, तुम्ही नोकरी शोधत असाल तर कुठून सुरुवात करायची याचा विचार करा. समजा, नोकरी मिळण्याची शक्‍यता अगदी कमी - फक्त एक टक्का - आहे, तरी तुम्ही ‘अमक्‍या वेबसाइटवर जाऊन बघू या...तमुक करून बघू या...’ असा विचार करा. तुम्ही दुसऱ्या एखाद्या परीक्षेची तयारी करा. करिअरच्या दुसऱ्या कुठल्या तरी पर्यायांचा विचार करा.

मग एक दिवस तुम्हाला वाटेल की, आता मी सॅंडविच तयार करतोय, घराची साफसफाई करतोय, कपड्यांना इस्त्री करतोय...ठीक आहे; पण आज मी माझ्या ध्येयाच्या दिशेनं एक छोटंसं पाऊल टाकेन...अ बेबी स्टेप. ते छोटंसं पाऊल कोणतं हे तुम्हाला माहीत असेल.

‘हां... हे मी करणारच,’ असं म्हणून मोठ्या आवेशानं सुरुवात करू नका...हा आवेश खोटा असतो. फक्त एक छोटंसं पाऊल ठरवा.

‘मी आता आणखी थोडा प्रयत्न करीन,’ असं म्हणून सुरुवात करा.

‘आता मी जशी घरातली कामं व्यवस्थित करतोय, तसाच मी पुन्हा मुष्टियुद्धाच्या मैदानात उतरेन. मागच्या वेळी मी तिथं जोराचा ठोसा खाऊन ‘नॉकआऊट’ झालो होतो; पण आता मी पुन्हा प्रयत्न करीन. या वेळी मी एखादं नवं तंत्र वापरेन,’ अशा उमेदीनं पुन्हा आरंभ करा.

माझं पहिलं पुस्तक प्रकाशनासाठी स्वीकारलं जात नव्हतं, तेव्हा मी सगळ्या प्रकाशकांशी पुन्हा संपर्क केला आणि, त्यांनी माझं पुस्तक का नाकारलं, हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर दहापैकी नऊ जणांनी उत्तरही दिलं नाही. ‘आम्ही हे करत नाही...नाही म्हणून सांगितलं ना,’ असं म्हणून काही जणांनी माझी बोळवण केली. फक्त एका प्रकाशकाने मला ‘तुमच्या पुस्तकात या या उणिवा आहेत,’ असं सांगितलं. त्यानंतर मी जवळजवळ सगळं पुस्तक पुन्हा लिहिलं, मग त्या प्रकाशकानंच माझं पुस्तक - माझं पहिलं पुस्तक - प्रकाशित केलं...अँड वुई मेड हिस्ट्री!

तुम्हालाही नेमकं हेचं करायचं आहे. तुम्ही ‘नॉकआऊट’ झाला असलात तरी उठा... हळूहळू सुरुवात करा. नकारात्मक मार्गावर अजिबात जाऊ नका. आयुष्यात एकदम काहीतरी मोठी सकारात्मक गोष्ट अकस्मात घडणार नाही हे लक्षात घ्या. मग छोटंसं पाऊल टाका...स्वतःतील चैतन्य जागृत ठेवा...उरात श्‍वास भरून घ्या आणि नव्या दिवसाला सामोरे जा. चिंता करू नका. तुम्ही या मार्गावरून चाललात तर एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com