बरबादियाँ... मिठी लगे ये आजादियाँ...!

आज मी तुम्हाला तुमचं आयुष्य पूर्णतः बरबाद करण्याचे पाच सोपे मार्ग सांगणार आहे...अगदी वैधरीत्या बरबाद करण्याचे! हे अगदी सहज-सोपे मार्ग आहेत.
बरबादियाँ... मिठी लगे ये आजादियाँ...!
Summary

आज मी तुम्हाला तुमचं आयुष्य पूर्णतः बरबाद करण्याचे पाच सोपे मार्ग सांगणार आहे...अगदी वैधरीत्या बरबाद करण्याचे! हे अगदी सहज-सोपे मार्ग आहेत.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

आज मी तुम्हाला तुमचं आयुष्य पूर्णतः बरबाद करण्याचे पाच सोपे मार्ग सांगणार आहे...अगदी वैधरीत्या बरबाद करण्याचे! हे अगदी सहज-सोपे मार्ग आहेत. मी तुम्हाला ‘कुठला मोठा गुन्हा करा किंवा ड्रग्जबीग्ज् घ्या,’ असं सांगणार नाहीये, म्हणजेच बेकायदेशीर अशी कुठलीही गोष्ट करायला सांगणार नाहीये.

मुळात तुम्हाला आयुष्य बरबाद कशासाठी करायचं आहे याबद्दल आपण नंतर बोलू; पण मला वाटतं बऱ्याच लोकांना आयुष्याचं वाटोळं करून घ्यायचंच आहे, त्यामुळे आयुष्यात यशस्वी कसं व्हावं हे लोकांना सांगण्यापेक्षा, वैध मार्गानं आयुष्य कसं बरबाद करता येऊ शकेल याचे सोपे मार्ग आपण सांगावेत असा मी विचार केला. हे अगदी वैध मार्ग आहेत, सहज-सोपे आहेत. त्यामुळे तुम्ही ते अगदी आरामात करू शकाल. असे आणखीही काही मार्ग असतील; पण माझ्या लक्षात आलेले पाच सोपे मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे.

पहिली गोष्ट : जंकफूड आणि नो एक्झरसाईज.

म्हणजे जंक फूड खा आणि व्यायाम वगैरे अजिबात करू नका. आयुष्य बरबाद करून घेण्यासाठी जंकफूड ही अगदी उपयुक्त गोष्ट आहे...काम की चीज!

तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या किराणादुकानात जा. तिथून तुम्ही पाकीटबंद पदार्थ घेऊन या. इन्स्टंट नूडल्स, चिप्स, कँडी, चॉकलेट्स, चटकमटक पदार्थ आणि भरपूर आइस्क्रीम घेऊन या. यामध्ये तुमची भूमिका अगदी साधी-सरळ असेल. हे पदार्थ घेताना, त्यांत भरपूर कॅलरीज् असल्या पाहिजेत, त्यांची चव एकदम मस्त असली पाहिजे आणि हे पदार्थ महिनोन् महिने पुड्यांत बंद असले पाहिजेत याची दक्षता तुम्ही घ्या. कारण, तुम्ही तुमचं आयुष्य बरबाद करायचं ठरवलेलंच आहे. तुम्ही हे असले सगळे पदार्थ घरी घेऊन या. हे पदार्थ समोर दिसले की ते तुम्हाला सारखे सारखे खावेसे वाटतील आणि याला काहीच हरकत नसते, यावर कुणाचा काही आक्षेप नसतो. त्यामुळे हे पदार्थ घेऊन या, ते खात राहा...मग काय, आयुष्याची वाट लागेलच!

कारण, तुम्ही जेव्हा हे पदार्थ खाल तेव्हा तुम्हाला फारसं छान वगैरे वाटणार नाही. तुमचं वजन वाढू लागेल, तुम्ही बेढब दिसू लागाल, काही काळानं तुम्हाला व्याधी घेरू लागतील.

आणि, जर तुम्हाला हे आणखी चांगल्या पद्धतीनं करायचं असेल तर तुम्ही व्यायाम करणं बंद करा. अशा प्रकारे तुम्ही ‘जंक फूड’ आणि ‘नो एक्झरसाईज’ हे सूत्र अवलंबलंत की तुम्हाला आयुष्याचं वाटोळं करून घेणं आणखी सोपं होईल. हा झाला एक अगदी सोपा मार्ग.

आता दुसरी गोष्ट : ‘स्क्रीन-ॲडिक्शन’...कोणत्याही प्रकारच्या ‘स्क्रीन’चं व्यसन. समजा, तुम्ही टीव्ही पाहत असाल तर तो पाहत राहा...भरपूर पाहा. दिवसभरात सहा तास...आठ तास पाहा. तो तर फुकटच असतो. घरात केबलचं किंवा चॅनेल्सचं सबस्क्रिप्शन घेतलेलंच असतं, त्यामुळे त्यासाठी वेगळा खर्च नसतो. तेव्हा, २४ तास टीव्ही बघा आणि झोपायचं तरी कशाला? त्यापेक्षा टीव्ही बघत बसा. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत...बरेच आहेत, ते सगळे बघा. उगीच त्यातलं आणि काही राहून जायला नको. कारण, तुम्ही पाहिलं नाहीत आणि नेमकं तेच परीक्षेत, आलं असं व्हायचं...परीक्षेत ‘अमक्यातमक्या शोमध्ये काय झालं’ असं विचारायचे!

त्या जोडीला फोन आहेच. तो दिवसातून तीनदा चार्ज करा. इतका वापर केल्यावर तो चार्ज करायलाच पाहिजे. मग तुम्ही सोशल मीडियात डुंबा...चॅटमध्ये बुडून जा. फालतू व्हिडिओ बघा...काही ना काही बघत राहा. त्या जोडीला व्हिडिओ गेम्स आहेतच. अशा कितीतरी गोष्टी आहेत. मग वेळ कुठं उरतो? एकदा तुम्ही याच्या पूर्ण आहारी गेलात, पूर्णपणे ‘स्क्रीन-ॲडिक्ट’ झालात की आयुष्याचं वाटोळं करून घेणं आणखी सोपं होईल, तेसुद्धा चांगल्या प्रकारे! ‘जंक फूड’ आणि ‘नो एक्सरसाईज’ला ‘स्क्रीन-ॲडिक्शन’ची जोड मिळाली की बास...या केवळ दोनच मार्गांनीसुद्धा आयुष्य बरबाद होऊ शकतं.

आता आपण यामध्ये आणखी काही गोष्टींची भर घालू. कारण, तुम्ही तुमच्या आयुष्याचं वाटोळं करण्याचा विडाच उचललेला आहे.

या सगळ्या गोष्टी करत असताना जर तुम्हाला कुणी म्हटलं की, ‘अरे, हे काय चाललंय तुझं?’ तर त्याचं खापर स्वतःच्या डोक्यावर फोडू नका बरं का! अजिबात करू नका तसं. तुम्ही त्याचं खापर इतरांवर फोडा. ती जबाबदारी कधीही स्वतःकडे घेऊ नका. समजा, तुमचं वजन वाढू लागलं असेल तर तुम्ही तुम्हाला त्याची जाणीव करून देणाऱ्या लोकांना सांगा, ‘माझं वजन वाढतंय असं जे तुम्ही म्हणताय ना, ते तुमच्याच मनाला लागायला पाहिजे. तुम्हालाच लाज वाटायला पाहिजे...यू आर द प्रॉब्लेम!’

तुम्ही अशा प्रकारे स्वतःवरचं इतरांवर झटकून टाका आणि तुम्ही म्हणा, ‘अरे, मी तर ‘अमेझिंग’ आहे. मला माझ्या आयुष्याचं वाटोळं करायचंय, त्यामुळे मला या सगळ्याशी काय देणं-घेणं आहे?’

जर तुमच्या करिअरमध्ये काही मनासारखं होत नसेल तर म्हणा, ‘सध्या स्पर्धा किती वाढलीय...आणि सगळं किती ‘अनफेअर’ आहे.’ कदाचित, तुमचं म्हणणं बरोबर असूही शकेल; पण त्यामुळे काही फरक पडत नाही. तुम्ही जेव्हा एखाद्यावर किंवा एखाद्या गोष्टीवर खापर फोडता तेव्हा त्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही; पण जर आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेणं हे तुमचं ध्येयच असेल तर तुम्ही अशा प्रकारे इतर गोष्टींवर खापर फोडत राहा!

चौथी गोष्ट : ‘नो गोल्स...’ आयुष्यात कसलंही ध्येय नसणं. तुम्ही आयुष्यात कसलंही ध्येय ठेवू नका! आयुष्य बरबादच करायचं आहे म्हटल्यावर असं काही ध्येयबीय ठरवण्याचा काय उपयोग आहे? दोन वर्षांनी मी काय करीन, कुठं असेन याचा विचार कशाला करायचा? त्यापेक्षा आरामात लोळा, टीव्ही बघा, चटकमटक पदार्थ खा, डाराडूर झोपा. बस्...यही है लाईफ! आणि तुम्ही अशा प्रकारे जगत राहिलात तर तुमचं आयुष्य छानपैकी बरबाद होईल!

तुम्ही जेव्हा अशा प्रकारे जगाल तेव्हा त्याचा काही जणांना मात्र फायदा होईल.

‘हे मी लोकांसाठी करतो,’ असं तुम्ही म्हणू शकता. ‘जेव्हा मी चटकमटक पदार्थ खातो तेव्हा ते तयार करणाऱ्या कंपन्यांचा फायदा होतो...हे पदार्थ तयार करणाऱ्या कंपनीत इतक्या लोकांना रोजगार मिळतो...इथं माझं यकृत खराब झालं, हृदय बिघडलं, माझं आयुष्य बरबाद झालं म्हणून काय झालं? तुम्ही या कंपनीला किती नफा होतो ते तर बघा! मी केबल घेतली आहे...त्या केबलवाल्याचा किती फायदा होतो बघा! आणि तो माझ्यामुळे होतो, त्यामुळं मी दिवसभर टीव्ही बघतो. मी इतरांवर खापर फोडतो. मी स्वतःला काहीही लावून घेत नाही. माझं काहीही ध्येय नाहीये. मला फक्त या सगळ्यांना फायदा करून द्यायचा आहे...

तुम्हाला जर आयुष्य बरबाद करण्याच्या मोहिमेत पहिला नंबर मिळवायचा असेल तर ही पाचवी गोष्ट अंगी बाणा. ती म्हणजे ‘लेझीनेस’ व ‘नो डिसिप्लिन...’ आळशीपणा व बेशिस्तपणा. तुम्ही आयुष्यात जराही शिस्त पाळू नका. शिस्त...शिस्त म्हणजे काय कुणास ठाऊक, अशा प्रकारे वागा. वेळेवर उठणं, आंघोळ करणं, कामाला लागणं...असं काहीही करू नका. थंडी असेल तर पांघरुणात गुडुप् झोपून राहा. उन्हाळा असेल तर ‘एसी’त लोळत राहा. आपल्याला बस् आराम तर करायचा आहे, तो कसा मिळेल एवढं बघायचं. प्रत्येक गोष्टीत आराम...‘सगळीकडे आराम, बाकी सब हराम’ अशा पद्धतीनं जगा. मग तुमचं आयुष्य अगदी व्यवस्थित बरबाद होईल!

मित्रांनो, मला वाटतं बरेच लोक अशाच प्रकारे जगतात. मी हे सगळं उपहासानं सांगतोय हे तुमच्या लक्षात आलं असेलच; पण मला काय सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं नसेल तर सांगतो, कृपा करून तुम्ही तुमचं आयुष्य असं बरबाद करू नका. बरेच लोक अशाच प्रकारे जगतात...त्यात कसली शिस्तही नसते अन् कुठलं ध्येयही नसतं. असे लोक इतरांना दोष देतात. ते अत्यंत आळशी असतात. ज्या वेळेचा कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करता येऊ शकेल, तो वेळ हे लोक ‘स्क्रीन’समोर घालवतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही करत राहिलात तर आयुष्य बरबाद होण्याची शंभर टक्के खात्री आहे! तुम्ही अमुक अमुक चांगल्या गोष्टी केल्यात तर सगळं आबादीआबाद होईलच याची खात्री देता येत नाही; पण वर सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही करत राहिलात तर तुमचं आयुष्य बरबाद होईल हे मात्र नक्की.

मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असाल तर त्या बंद करा. तुम्ही हे काय करत आहात? तुम्हाला वेडबीड लागलंय का? तुम्ही जगात आला आहात ते काय सोशल मीडिया आणि चटकमटक पदार्थ तयार करणाऱ्यांना नफा मिळवून देण्यासाठी? ते लोक नफा कमावत आहेत; पण तुमचं आयुष्य मात्र बरबाद होतंय. प्लीज मित्रांनो, या वाटेवर चालू नका. आयुष्य बरबाद करणं अगदी सोपं असतं, ते कुणीही करू शकतं, अगदी लहान मुलंसुद्धा ते करू शकतात.

मी नुकताच एक लेख वाचला. त्या लेखातील माहितीनुसार, चेन्नईत ‘इंटरनेट डी-ॲडिक्शन सेंटर’मध्ये जे लोक ‘टेक-ॲडिक्शन’पासून मुक्त होण्यासाठी आले होते, त्यांत पाच ते १० वयोगटांतील बरीच मुलं होती. पाच ते १० वयोगटातल्या मुलांना या उपकरणाचं व्यसन जडलं होतं! यावरून, ही समस्या किती भयंकर आहे हे तुमच्या लक्षात यायला हरकत नसावी. लोक आपलं आयुष्य यापायी बरबाद करत आहेत; पण जर तुम्ही हे बंद केलंत तर तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडू शकेल आणि तुम्हाला फार स्पर्धेलाही तोंड द्यावं लागणार नाही. कारण, ज्या लोकांशी तुमची स्पर्धा असली असती ते तर त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करण्याच्या मागं लागलेले आहेत.

तेव्हा, कृपा करून तुम्ही तुमच्या आयुष्याची वाट लावून घेऊ नका. हे करणं अगदी सहज-सोपं आहे. सावध राहा. कुणी तुमचं आयुष्य बरबाद करू पाहत असेल तर तुम्ही ठाम राहा...तुम्ही ते होऊ देऊ नका.

आणि सर्वांत महत्त्वाचं, कीप इम्प्रूव्हिंग युवरसेल्फ! टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com