निरामय आनंदासाठी चिंतन आणि एकाग्रता हवी

अगदी लहानपणी आपला मेंदू अतिशय प्रभावी असतो. त्यामुळे त्या संस्कारक्षम वयात त्यावर ठसलेल्या स्मृती अतिशय प्रखर असतात.
Children with Internet
Children with InternetSakal

- डॉ. अनिल राजवंशी

Child is the father of the man ही उक्ती म्हणजे मुळात विल्यम वर्डस्वर्थच्या कवितेतील एक ओळ होय. ती आता इंग्लिश भाषेचाच एक भाग होऊन गेली आहे. आपण लहानपणी जे जे काही आत्मसात करतो ते ते आपल्या पुढील आयुष्यावर परिणाम करतं असा या प्रचलित उक्तीचा मथितार्थ आहे.

अगदी लहानपणी आपला मेंदू अतिशय प्रभावी असतो. त्यामुळे त्या संस्कारक्षम वयात त्यावर ठसलेल्या स्मृती अतिशय प्रखर असतात. आयुष्यभर त्या आपली साथ सोडत नाहीत. या प्रखर स्मृती आपल्या मनात काही मानसिक गुंफण तयार करतात. आपल्या विचारप्रक्रियेला आणि परिणामतः आपल्या सर्वच कृतींना ही मानसिक गुंफण आयुष्यभर प्रभावित करते. आपली मुलं प्रत्येक बाबतीत सांगोपांग आणि सखोल चिंतन करता येणारी चांगली माणसं व्हावीत यासाठी योग्य दिशा आणि योग्य मार्ग वेळीच त्यांना दाखवणं म्हणूनच अत्यंत महत्त्वाचं ठरतं. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, स्वत:ची एकाग्रता, एकतानता विकसित करण्याचा मार्ग आपण मुलांना खुला करून द्यायला हवा.

या सखोल चिंतनातून किंवा विशिष्ट विचारावर अथवा कल्पनेवर चित्त एकाग्र करण्यातूनच आपण आध्यात्मिक मार्गाकडे वळतो. यालाच ‘पतंजली योगदर्शना’त ‘संयम’ असं म्हटलेलं आहे. आध्यात्मिकता म्हणजे धर्म नव्हे. आध्यात्मिकतेचा संबंध फक्त आपल्या आत्म्याशी, मूलतत्त्वाशी येतो. कोणत्याही एका कल्पनेसंबंधी अथवा वस्तूसंबंधी आपण दीर्घ काळ सखोल चिंतन करतो तेव्हा लेसर किरणाप्रमाणे त्याच विशिष्ट कल्पनेवर किंवा वस्तूवर पूर्णतः केंद्रित होण्याची आपल्या मेंदूची प्रवृत्ती असते. या प्रक्रियेत मन जिच्यावर एकाग्र केलं आहे ती वस्तू अथवा कल्पना दृष्टिपटलावरून अदृश्य होते. केवळ तिचा गाभा किंवा मूलतत्त्वच काय ते उरतं.

कोणत्याही गोष्टीवरच्या अशा सखोल चिंतनानं आपण आध्यात्मिक होतो आणि आपल्याला असीम शांतता आणि अद्भुत आनंदाचा अनुभव येतो. एकदा का अशी सखोल चिंतनाची क्षमता मुलांच्या अंगी रुजली की त्यांना छळणारी अवधान-अस्थिरता नाहीशी होऊ शकते; निदान मोठ्या प्रमाणात कमी तरी होऊ शकते.

आज आपली बहुतेक सगळी मुलं आपला प्रचंड वेळ आपल्या मोबाईल फोनवर किंवा इंटरनेटवर घालवतात. ही अतिशय उपयुक्त अशी आधुनिक साधनं आहेत, मुलांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी त्यांचा पुरेपूर उपयोग होऊ शकतो; तथापि, दुर्दैवानं मुलं यातील बराचसा वेळ समाजमाध्यमांवर चकाट्या पिटण्यासाठी किंवा रील्स अथवा छोट्या व्हिडिओ क्लिप्स तयार करून त्या तिथं टाकण्यासाठीच घालवत असतात. शिवाय, समाजमाध्यमांवरील त्यांचा वावर मुख्यतः प्रतिक्रियात्मक असतो. ‘आला मेसेज की दे उत्तर,’ असंच सुरू असतं. यातून त्यांची निरीक्षणक्षमता-विचारक्षमता-चिंतनक्षमता क्षमताच कमी होत आहे. या प्रतिक्रियात्मक वर्तनात परीक्षेच्या अव्याहत ताणाची अधिकच भर पडते. या दोन्ही गोष्टींमुळे ते सखोल विचार करण्याऐवजी झटपट प्रतिक्रिया देऊ लागतात. त्यातून चिंता आणि ताण-तणाव निर्माण होतात. ताण हा एकाग्रतेचा शत्रू होय; म्हणून, मुलांना असेच प्रकल्प किंवा उपक्रम द्यावेत, जे करताना त्यांना शांत, प्रसन्न वाटेल.

प्रतिक्रियांनाच महत्त्व दिलं जात असल्यामुळे आपण आपल्या भवतालाविषयी किंवा आपल्या समोरील खऱ्या प्रश्नांविषयी विचारच न करणारी, बारकाईनं त्यांचं निरीक्षण न करणारी एक पिढीच्या पिढी घडवत आहोत. परिणाम? आपल्या देशाच्या वास्तवाशी या पिढीला काही देणं-घेणंच उरलेलं नाही.

प्रतिक्रियात्मक दृष्टिकोनाच्या या प्रखर स्मृती आयुष्यभर मुलांचा पिच्छा पुरवतात. त्यातून ते सदैव चिंताग्रस्त राहतात. आपण निःसंदर्भ ठरू, जगात आपल्याला स्थानच उरणार नाही अशी भीती त्यांना सतत वाटत राहते. अधिकाधिक पैसा मिळवण्याच्या दडपणालाही ते बळी पडतात. मिळवणार असलेल्या पैशाचं करायचं काय याबद्दल कसलाच सारासार विचार न करता ते आणखी आणखी पैसा मिळवण्याच्याच मागं धावत राहतात.

अशा रीतीनं ते भवतालच्या माणसांशी स्पर्धा करत राहतात. मिळवलेला पैसा वापरणार कसा याचा काडीचा विचार न करता, निव्वळ बक्कळ पैसा मिळवण्याच्या शर्यतीतले ते झापडबंद घोडे बनून जातात.

तर मग सखोल चिंतनाची सवय आपल्या मुलांच्या अंगी आपण रुजवायची कशी? प्रत्यक्ष हाताळता येतील अशी पुस्तकं वाचण्याची गोडी त्यांना लावणं हा यासाठीचा एक उत्कृष्ट उपाय होय. बऱ्याचदा ‘इंटरनेटवर वाचतातच ना मुलं!’ असं लोक म्हणतात; पण आपली नेहमीची पारंपरिक पुस्तकं वाचताना मुलं नीट विचारपूर्वक समजून घेत घेत आणि वाचलेलं पचवत पचवत वाचतील. शिवाय, डोळ्यांसाठीही ते अधिक सुखद व हितकारी ठरेल.

पुस्तकं मुलांमधली कल्पनाशक्ती जागृत करतात. इंटरनेट हे करू शकत नाही. कारण, ते केवळ भरमसाट माहिती पुरवत जातं.

शाळाशाळांमध्ये मुलांना पुस्तकं वाचण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. कोणत्याही संदर्भासाठी केवळ इंटरनेटवर अवलंबून न राहता आवश्यक संदर्भ पुस्तकात शोधायची सवय मुलांच्या अंगवळणी पडावी असा प्रयत्न झाला पाहिजे. मुलांच्या अगदी लहानपणापासूनच पुस्तकवाचनाकडं सातत्यानं ध्यान द्यायला हवं. शाळेत मोबाइल आणायला मुलांना परवानगी न देणं आणि इंटरनेट फक्त वाचनालयाच्या आवारातच उपलब्ध ठेवणं हा त्यासाठीचा एक उपाय होय. आणखी एक गोष्ट. वाढदिवसाला प्रेझेंट देताना ते पुस्तकांच्याच रूपात देण्याची खूणगाठ आपण बांधली पाहिजे. मोबाईल किंवा टॅबसारखी प्रेझेंट्स तर आवर्जून टाळली पाहिजेत.

(लेखक फलटण येथील ‘निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’चे संचालक आहेत.)

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com