अडकली लेकरं मोबाइलमध्ये

लेकरांचं मोबाइल फोनचं प्रेम सध्या प्रत्येक पालकाच्या मनातली सलणारी धसुडी झालीये. तुम्ही गरीब असा वा श्रीमंत, खेड्यात राहा किंवा शहरात. लेकरांच्या हातातला मोबाइल काढून घेणं कठीण होऊन बसलंय.
childrens Stuck in the mobile
childrens Stuck in the mobilesakal

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

लेकरांचं मोबाइल फोनचं प्रेम सध्या प्रत्येक पालकाच्या मनातली सलणारी धसुडी झालीये. तुम्ही गरीब असा वा श्रीमंत, खेड्यात राहा किंवा शहरात. लेकरांच्या हातातला मोबाइल काढून घेणं कठीण होऊन बसलंय. सकाळ, दुपार, संध्याकाळ ही डिजिटल गोळी दिल्याशिवाय लेकरं शांत बसू शकत नाहीत. जेवण करताना तर डोळ्यासमोर मोबाइल स्क्रीन दिसल्याशिवाय काहींचं तोंडच उघडत नाही.

इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या सर्वच नव्या आयांसमोर मुलाबाळांना खाऊ घालणं म्हणजे दिवसभरातलं सर्वांत अवघड काम होऊन बसलंय. त्यातच चूल आणि मूल ही संकल्पना तोडून चूल आणि मूल सांभाळून नोकरी करणाऱ्या आयांची तर जास्तच कसरत होताना दिसतेय.

मोबाइल फोनच्या आधी टीव्हीनं अर्थात दूरचित्रवाणीनं एक पिढी खाऊन टाकली, आता मोबाइल फोन तो वेळ खाऊन टाकतोय. भविष्यात अजून दुसरं काहीतरी येईलच. तंत्रज्ञान वायुवेगानं पुढं सरकत असताना आपली लेकरं तरी कशी मागं राहतील पण त्यातूनही ती हट्टी, चिडचिडी, रागीट आणि एकलकोंडी होऊ नयेत याची काळजी घेणं क्रमप्राप्त ठरणार आहे.

माझी मोठी मुलगी कादंबरी चार वर्षांची झालीये. तिलाही जेवताना आणि झोपताना मोबाइल फोन हवा असतो. वीराचा धाक असल्यानं ती तिच्यापुढं हट्ट करत नाही पण माझ्या हातात मोबाइल दिसला की पटकन झडप मारते. आता लांब कशाला हाच लेख लिहिताना तिनं चार वेळा माझ्या हातातून मोबाइल हिसकावून घेतलाय. ती मोबाइल बघत बघत जर मला कधी जेवताना दिसली की मीही तिच्या हातातून असाच मोबाइल काढून घेत असतो.

म्हणून मग मीही हातात मोबाइल घेऊन बसलेला दिसलो की तीही तशीच करते. आपलीच लेकरं ती मग अनुकरण करणारंच. मी धसुडीचे सर्व लेख मोबाइलवरच टाईप करतो, पुस्तकांसोबत मोबाइलवरही सतत वाचन करत असतो त्यामुळं आपसूकच माझा स्क्रीनटाइम जास्त आहे. त्याचाच परिणाम लेकरांवर सुद्धा होताना दिसत असल्याचे जाणवल्यानंच आज हा विषय लिहावासा वाटला. जर पालकांकडंच मोबाइल नसता तर लेकरांनी मागायचा विषयच येत नव्हता पण असे पालक आता औषधालाही सापडणार नाहीत.

कादंबरी जेव्हा रिल पाहत बसते तेव्हा त्यात तिला जे दिसतं, जे आवडतं ते पाहून लगेच “बाबा, मला हे पाहिजे,” असे ती म्हणते. कधी तिला मेकअपचा बॉक्स हवा असतो, कधी तिला खेळण्यातली इलेक्ट्रिक गाडी हवी असते तर कधी पिझ्झा आणि बर्गर मागते. अर्थात मीही तात्पुरतं आश्वासन देऊन वेळ मारून नेतो पण आपली लेकरं जे बघतात त्यातूनच त्यांच्या आवडी निवडी बनतात हे लक्षात आलं.

कोणत्या वयात काय मागावं याची संहिता मोबाइलनं बिघडून टाकली आहे. देशाचा नागरिक म्हणून जी काही आपली कर्तव्य असतील, त्यात आता पालक म्हणून आपल्या पाल्याला बाल्यावस्थेत मोबाइल पासून दूर ठेवणं हेही कर्तव्य समजून पार पाडायला हवं.

पालकांच्या हातातला सतत मोबाइल दिसत असल्यानंच तो आता लेकरांच्याही हातात दिसतोय. यात दोघांची चुकी नाही. सगळं जग मोबाइलवर येऊन ठेपल्यानं अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाइल अशा आता माणसांच्या चार प्रमुख गरजा बनल्या आहेत. कित्येक बेरोजगारांची तर फक्त मोबाइलची गरज पूर्ण झाल्यानं त्याच मोबाइलच्या जोरावर अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज त्यांनी पूर्ण केलीये, हेही सकारात्मक उदाहरण म्हणावं लागेल. मोठ्यांसाठी हे ठीकय पण लहान लेकरं मात्र हल्ली ज्या पद्धतीनं मोबाइलच्या आहारी जात आहेत, ते खरंच चिंताजनक वाटतंय.

बहुतांशी घरात पालकांचेच फोन मुलांना दिले जातात. पालक सोशल मीडियावर जो कंटेंट बघतात त्याच संदर्भातल्या पोस्ट अल्गोरिदमच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा दाखवल्या जातात. त्यामुळं आपण काय सर्च करतो, काय पाहतो यावर पालकांनीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

एका विद्यापीठानं केलेल्या सर्वेनुसार सुमारे ९३ टक्के लेकरांना मैदानी खेळाऐवजी मोबाइलवर गेम खेळायला आवडत आहेत. ७८ टक्के लेकरं मोबाइल बघत बघत जेवतात. ७७ टक्के लेकरं शाळेतून घरी आल्यावर पालकांकडे फोन मागतात. ८३ टक्के लेकरं डोळ्यासंबंधित व्याधींनी त्रस्त आहेत. तसेच ६४ टक्के मुलं झोपेत बडबडतात, सुमारे ७७ टक्के मुलांचा झोपण्याचा कालावधी कमी झालाय आणि सुमारे ६७ टक्के लेकरांची समाजात वावरण्याची वर्तणूक असामान्य झाली आहे.

देशाच्या भावी पिढीची जर ही गत असेल, तर त्यांचा भविष्यकाळ कठीण आहे हे उघड सत्य आहे. त्यामुळे आता ‘आपली लेकरं, आपली जबाबदारी’ समजून मोबाइलच्या स्क्रीन मध्ये अडकलेलं देशाचं भविष्य पुन्हा मैदानावर आणणं पालक आणि शिक्षकांची सर्वोच्च प्राथमिकता पाहिजे.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com