धुक्‍यात हरवलेल्या काँग्रेसला मिळाला नेता

Rahul Gandhi
Rahul Gandhi

12 महिन्यांपूर्वी नवे अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसला संजीवन देवू शकतील असे भाकीत एखाद्याने केले असते, तर सोनिया गांधी यांनी तरी त्यावर विश्‍वास ठेवला असता का? पण ते घडले. राजकारणात एक आठवडाही उलथापालथ करणारा असतो. इथे तर 365 दिवस मध्ये गेले. भारताच्या मध्य भागातील तीन राज्ये राहुल अध्यक्ष असलेल्या पक्षाने जिंकली. त्या-त्या राज्यातील प्रदेश इकाईंना अधिकार देत, त्यांच्यातील वाद शमवत काँग्रेस एकदिलाने लढली. 

पाच वर्षांपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी भाषक राज्यातील जनतेने भाजपला एकमुखी कौल दिल्यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आम्ही आत्मपरीक्षण करू, असे निवेदन देत पत्रपरिषद संपवत असताना घुटमळत उभे असलेले राहुल ट्रोलिंगचा विषय तर ठरलेच. पण काँग्रेसजनांच्याही मनात आपल्या पक्षाचा नेता आहे तरी कसा असे काहूर माजवून गेले. आज ते चित्र बदलले आहे. नवखेपणा इतिहासजमा झाला आहे असा आशावाद जागवणारी चुणूक त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. काँग्रेसमुक्‍त भारताचे मोदी-शहांचे स्वप्न प्रश्‍नांकीत करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी जय-वीरू न संबोधता गब्बरसिंग का म्हटले हा प्रश्‍न सोडून त्यांची बहुतांश वाक्‍ये उत्तर देतानाचा संयम वाखाणण्याजोगा होता. धुक्‍यात हरवलेल्या काँग्रेसला नेता मिळाला आहे असे म्हणण्यास आता हरकत नाही. राहुल यांच्या नेतृत्वाचे, कर्तृत्वाचे विश्‍लेषण आणि परीक्षण करणारे अनेक प्रसंग भविष्यात येतीलच. 

महत्त्वाचा विषय आहे तो अजेय मानली जाणारी, काँग्रेसमुक्‍त भारताचे स्वप्न पाहणारी नरेंद्र मोदी अमित शहा यांची जोडगोळी अपयशी का ठरली हा. हे दोघेही राष्ट्रीय स्तरावर प्रकाश देण्यास अवतरले नव्हते तेंव्हाही रमणसिंग, वसुंधरा राजे हे आपापल्या राज्यात मुख्यमंत्री होते. शिवराजसिंग चौहान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री तर होतेच, शिवाय गुजरातचे मुख्यमंत्री मोदी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरतात तर शिवराजसिंग यांनी का मागे रहावे असा प्रश्‍न समोर येण्याएवढे त्यांचे भाजपतले स्थान होते. पंधरा-पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगडातील सत्ता ऍनटी इन्कम्बन्सीमुळे धोक्‍यात येणार हे निश्‍चित होते. भारतातले सुमारे 40 टक्‍के मतदार 25 वर्षाखालचे आहेत. अशा मतदारांना 3 टर्म झाल्यानंतर नव्या चेहऱ्याची गरज भासते. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी हे तरूण कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना अचानक नेते होतात, निवडून येतात या मागचे कारण नव्या मतदारांना बदलाची भाषा करणाऱ्या, त्यांच्याशी संवाद साधू शकणाऱ्या आपल्यांची गरज असते. ही पिढी फास्ट फूड जनरेशन आहे, आवडले नाही तर ते हातातला रिमोट वापरून दुसऱ्या मिनिटाला चॅनेल बदलतात. त्यांच्या रोजगाराचे प्रश्‍न मोदी सरकारला सोडवता आलेच नाहीत शिवाय या वर्गाला आपले वाटणारे चेहरे नंबर दोन म्हणून शिवराजसिंग किंवा डॉ. रमणसिंह यांच्या समवेत पूरक म्हणून समोर आणता आले नाहीत. तशी गरज भाजपसारख्या चतुर चाणाक्ष पक्षाला कळली नाही. 

मध्यप्रदेशात कमलनाथ यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला ज्योतिरादित्य शिंदे, त्यांचा मुलगा अशा नव्या चेहऱ्यांची कुमक देता आली. राजस्थानमध्ये तर सचिन पायलट हा तरूण मुख्यमंत्री होवू शकेल अशी चिन्हे आहेत. भाजपला असे नवे चेहरे प्रदेशस्तरावर शोधणे अशक्‍य नव्हते. पण ते राहिलेच. आज भाजपचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेले नेते पराभूत झाले आहेत. त्यांच्या वाटचालीला मोदीपर्वाची साथ नंतर लाभलीही पण हे तिघेही स्वयंप्रकाशी नेते होते. तिन्ही नेते त्यांची राज्ये राखू न शकले नाहीत. पण या तीन चेहऱ्यांऐवजी चिकित्सा होते आहे ती मोदी शहांची. काही महिन्यांतच लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची घटिका आहे. त्यामुळेही हे असे होणे स्वाभाविक आहे. या तीन राज्यात भाजपचे 61 खासदार निवडून आले आहेत. आजच्या निकालांचे कल लक्षात घेतले तर यातील 44 जागा भाजपला गमवाव्या लागतील, जेमतेम 17 जागा भाजप जिंकेल. छत्तीसगड वगळता भाजपने आणि काँग्रेसने मिळवलेल्या मतांच्या टक्‍केवारीत फारसा फरक नाही. तरीही 17 जागाच जिंकता येतील असे सध्या दिसते आहे. राजकारणात आठही दिवस होत्याचे नव्हते करतात पण तरीही तीन महिन्यात फारसे काही घडले नाही तर या राज्यात भाजपची घसरण होण्याची चिन्हे आहेत. ही तिन्ही राज्ये औद्योगिकरणापेक्षाही शेतीप्रधान आहेत. शेतमालाला न मिळणाऱ्या भावांमुळे ग्रामीण भारत अस्वस्थ आहे. त्याने भाजपला मते दिली नाहीत तर ते समजण्यासारखे होते पण प्रत्यक्षात नागरी भागातही भाजपला हार पत्करावी लागली आहे. मतांची टक्‍केवारी चांगली आहे पण या परिसरातल्या 44 लोकसभा जागा वाचवण्यासाठी काहीतरी करणे भाग आहे. त्यासाठी रिझर्व्ह बॅंकेत आपल्या सोयीचे गर्व्हनर नेमण्यासारखे निर्णय घेणे असू शकेल. येणारे ती न महिने मोदी शहांसाठी फार महत्वाचे आहेत. राममंदिराच्या मार्गाचा अवलंब होणार काय, त्याला प्रतिसाद मिळणार काय, शिवसेना काय करणार असे कितीतरी प्रश्‍न या काळात सोडवायचे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com