दलित चळवळीतील महिलांना न्याय

अस्पृश्य व दलित चळवळीतील ढोर-चांभार स्त्रियांचे योगदान कायम दुर्लक्षितच राहिले आहे. लेखिका डॉ. सुनीता सावरकर यांच्या पुस्तकाने अशा महिलांचे भरीव योगदान जगापुढे आणण्याचे काम केले आहे.
contribution of Dhor-Chambhar women in the untouchable and Dalit movement Author Dr Sunita Savarkar book
contribution of Dhor-Chambhar women in the untouchable and Dalit movement Author Dr Sunita Savarkar bookSakal

ढोर-चर्मकार समाजातील स्त्रियांनी जुन्या प्रथा, परंपरा नाकारून स्वातंत्र्य, समता व बंधुतेवरील आधारित परिवर्तनवादी विचार आत्मसात करून सामाजिक क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. मराठी साहित्यात अस्पृश्य स्त्रियांच्या दलित चळवळीतील सहभागाचे, योगदानाचे अनेक संदर्भ सापडतात.

मात्र, ढोर-चांभार समाजातील महिलांच्या योगदानाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. आंबेडकरपूर्व कालखंडात व आंबेडकरांच्या काळात अस्पृश्य, दलित चळवळीत या समाजातील महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

काही अपवाद वगळता त्यांची दखल घेतली गेली नव्हती. त्यामुळे ढोर-चर्मकार समाजात या महिलांबद्दल फारशी माहिती नव्हती. ज्येष्ठ साहित्यिक ऊर्मिला पवार यांनी ‘आम्हीही इतिहास घडविला’ या पुस्तकातून पहिल्यांदा दलित स्त्रियांच्या चळवळीतील योगदानाला उजाळा दिला होता.

त्यातून राहून गेलेले संदर्भ, माहिती जवळपास ३४ दशकांनंतर आलेल्या डॉ. सुनीता सावरकर यांच्या पुस्तकाने भरून काढली आहे. दलित चळवळीच्या एकूण अभ्यासाच्या दृष्टीने हे पुस्तक म्हणजे महत्त्वाचा दस्तावेज आहे.

ढोर-चर्मकार समाजातील महिलांच्या सामाजिक कामाची त्या काळच्या काही वर्तमानपत्रांतून दखल घेतली गेली होती. त्यामध्ये सोमवंशीय मित्र, दिनमित्र, जनता, बहिष्कृत भारत, समता, दलित भारत, दलित बंधू, बॉम्बे क्रॉनिकल इत्यादी वृत्तपत्रांचा समावेश होता.

प्रकाशित मजकूर तसेच वैयक्तिक संग्रहातील कागदपत्रांचा आधार घेत या महिलांचा शोध घेण्यास लेखिकेने सुरुवात केली. जवळपास १० ते १२ वर्षे ही शोधमोहीम सुरू होती. त्यातून ‘ढोर-चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ’ हे पुस्तक आकाराला आले.

पुस्तक संशोधनासाठी लेखिकेला कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, विदर्भ, मुंबई, खानदेश इत्यादी भागांत फिरावे लागले. या महिलांच्या वारसांना गाठून त्यांच्या मुलाखतीतून लेखिकेने बरीचशी माहिती मिळवली.

पुस्तकाच्या सुरुवातीला लेखिकेने अस्पृश्य स्त्रियांच्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे. अस्पृश्य संत स्त्रियांमध्ये संत सोयराबाई, संत कल्याणम्मा, संत संताबाई, संत भागुबाई व संत निर्मळा इत्यादींचा समावेश आहे.

त्यांच्या अभंगांच्या व सामाजिक प्रबोधनाच्या संबंधाची उकल त्यामध्ये करण्यात आली आहे. संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. त्या वेळी विटाळाची संकल्पना त्यांनी अंभगाच्या माध्यमातून समजावून सांगितली होती.

संत सोयराबाई यांनी त्या काळी जाति-व्यवस्थेविरुद्ध टोकदार भूमिका मांडली होती. संत संताबाई यांनी संतपरंपरेमध्ये जातीची बंधने तोडून पंढरपूरमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

बाराव्या शतकात बसवेश्वरांच्या लिंगायत धर्माचे अनुयायी असलेल्या कल्याणम्मा यांनी जात-धर्माच्या भिंती तोडण्यासाठी त्यांच्या मुलाचे लग्न ब्राह्मण जातीच्या मुलीशी लावून दिले होते. त्यासाठी कल्याणम्मा यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली.

पुस्तकात डॉ. आंबेडकरपूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर अशा तीनही काळातील अस्पृश्य महिलांच्या दलित चळवळीतील योगदानाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामध्ये सत्यशोधक चळवळ, निराश्रित सेवासदन, बहिष्कृत चळवळ व‌ उच्चवर्णीय समाजसुधारक यांनी अस्पृश्य स्त्रियांसाठी केलेल्या कामाचा समावेश आहे.

बहिष्कृत चळवळीमध्ये काम करणाऱ्या मंजुळाबाई शाळीग्राम, सावित्रीबाई थोरात, साळूबाई भालेराव, कोंडाबाई साबळे इत्यादी अस्पृश्य महिलांचे संदर्भ नव्याने या पुस्तकात आले आहेत. १९०८ मध्ये शिवुबाई जाधव या मुरळी स्त्रीने लिहिलेले संपूर्ण पत्र अभ्यासकांसाठी उपलब्ध झाले आहे. ‘सोमवंशी मित्र’ या वर्तमानपत्रात हे पत्र पहिल्यांदा प्रकाशित झाले होते. त्यासोबत अस्पृश्य समाजाअंतर्गत जातीपंचाचे स्त्रियांसाठीचे नियम व त्याची चिकित्सा पुस्तकात केली गेली आहे.

१८९३ मध्ये पतीला नोटीस देणारी पहिली स्त्री सखू कोय विठ्ठल विनेरकर ही चांभार स्त्री आहे. क्षुल्लक कारणावरून पतीने तिला सोडून दिले होते. महिलांनी पतीला दिलेल्या घटस्फोटाच्या नोटिसांना संदर्भ म्हणून या पुस्तकात वापरण्यात आले आहे.

या नोटिसा त्या काळी ढोर-चांभार समाजातील पुरुषसत्ता समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. घटस्फोटित महिलांना समाजाला कसे सामोरे जावे लागायचे, याचे वास्तव या निमित्ताने वाचकांना होते.

राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज, फुले दाम्पत्य यांच्या स्त्रीउद्धारक कार्यावरही या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. चर्मकार समाजाचे दत्तोबा पवार यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी दत्तोबा यांच्या आई गंगूबाई पवार यांना पेन्शन दिले होते. कामगाराच्या पत्नीला पेन्शन देणारे शाहू महाराज हे पहिले राज्यकर्ते होते.

मुंबईतील अनेक कार्यक्रमांत रमाबाई आंबेडकर यांच्यासोबत चर्मकार महिला सोबत असायच्या. धारवाडमध्ये ढोरवाड्यात रमाबाई यांच्या प्रमुख उपस्थितीत चहापाण्याचा कार्यक्रम झाला, याचा संदर्भही या पुस्तकातून येतो. फुले दाम्पत्याने एका चर्मकार विद्यार्थिनीला शिकवताना घेतलेल्या मेहनतीचा संदर्भ यात आहे.

शोध समाजसुधारकांचा

बाबासाहेब आंबेडकर यांना ढोर-चर्मकार पुरुष सहकारी जसे चळवळीत लाभले तसेच या समाजातील स्त्रियांनीही कमी-अधिक प्रमाणात आंबेडकरी चळवळीत सक्रीय सहभाग घेतल्याचे हे पुस्तक सप्रमाण सिद्ध करते.

चळवळीसाठी अनेक स्त्रियांनी प्रसंगी स्वजातीयाकडून बहिष्काराला सामोरे जाण्याची जोखीम उचलली आहे. सावित्रीबाई बोराडे या ढोर समाजातील पहिल्या महिला समाजसुधारक होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बोराडे आणि अंबुबाई गायकवाड या दोघींची ‘जनता’ वृत्तपत्राच्या संपादक मंडळावर निवड केली होती.

मुंबईतील आंबेडकरी चळवळीच्या अनेक सभांना त्या उपस्थित असायच्या. महिला संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून गुणाबाई गाडेकर यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोनदा सन्मान केला होता. बाबासाहेबांचे विश्वासू सहकारी सीताराम शिवतरकर गुरुजी हे बहिष्कृत हितकारणी सभेचे सचिव होते.

त्यांच्या पत्नी रेणूबाई शिवतरकर या आंबेडकरी चळवळीत सक्रिय होत्या. चळवळीसाठी त्यांनी स्वतःचे दागिनेसुद्धा गहाण ठेवले होते. शेड्युल कास्ट फेडरेशनचे सचिव पा. ना. राजभोज यांच्या पत्नी रुक्मिणीबाई राजभोज या चळवळीत काम करायच्या.

१९४७ मध्ये लखनौच्या तुरुंगातून राजभोजांची सुटका झाल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात दगडांचा वर्षाव झाला, सगळेच सैरावैरा पळत होते, तेव्हा रुक्मिणीबाई यांनी या संपूर्ण सभेची सूत्रे स्वतःच्या हाती घेत ती सुरळीत पार पाडली होती.

या समाजातील अनुसया शिवतरकर यांनी १९३४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण का साजरी करावी, त्याचे काय महत्त्व आहे, याविषयी ‘जनता’मध्ये लेख लिहिला होता. शांता राजभोज यांनी दलित चळवळीसाठी कारावास भोगला. ‘दलित बंधू’ या वृत्तपत्रात बौद्ध धर्म ही मानवी जीवनाची संजीवनी आहे, असा लेख शांता राजभोज यांनी लिहिला होता.

मराठवाड्यात पँथर चळवळ बळकट करण्यात लातूर, उदगीरच्या मालनबाई वाघमारे यांचे प्रमुख योगदान आहे. त्यांची दोन मुले आणि मुलगी कमल पारखे या नामांतर चळवळीत सक्रीय सहभागी होत्या. या काळात त्या तुरुंगातही गेल्या.

मिलिंद महाविद्यालयातील माजी प्राचार्य ल. बा. रायमाने यांच्या पत्नी ऊर्मिला रायमाने यांनी तत्कालीन कालखंडामध्ये रिपब्लिकन चळवळीत पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामध्ये केशरबाई घुमरे यांचा प्रमुख उल्लेख येतो.

ढोर-चर्मकार समाजाव्यतिरिक्त वाल्मीकी, आदिवासी महिलांचे सामाजिक कर्तृत्व या पुस्तकातून अधोरेखित करण्यात आले आहे. वाल्मीकी समाजातील शालिनीबाई, गवलिनीबाई आणि कमलाबाई जानोरकर यांच्या दलित चळवळीतील योगदानाचा उल्लेख पहिल्यांदा या पुस्तकात आला आहे.

नागपूरमध्ये अस्पृश्यांवर अत्याचार केला जात होता, त्या वेळी वाल्मीकी समाजातील महिलांनी त्यांना संरक्षण देण्याचे काम केले होते. याशिवाय कुंभार, ढोर-चर्मकार समाजातील स्त्रिया पांरपरिक व्यवसायात मदत करतात. मात्र त्यांच्या श्रमाचे मूल्य कधीच गृहीत धरले गेले नाही. महिलांचे श्रम चोरून पुरुषांच्या नावावर केले असल्याचा विचार लेखिकेने मांडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com