ड्रायव्हर

एकदा व्याख्यानाच्या निमित्तानं पुण्याला जाताना माझ्या गाडीचा ड्रायव्हर हनुमंत यानं टेपवर गाणं लावलं : ‘ह्या डायवरला जीव थोडा लाव, थोडा लाव...’ या गमतीदार गाण्यातली पहिली ओळ ऐकून माझ्यातला लेखक विचार करू लागला की...
coordination of hand leg eye and other sence driver drop us at our destination
coordination of hand leg eye and other sence driver drop us at our destinationSakal

- प्रा.विशाल गरड

एकदा व्याख्यानाच्या निमित्तानं पुण्याला जाताना माझ्या गाडीचा ड्रायव्हर हनुमंत यानं टेपवर गाणं लावलं : ‘ह्या डायवरला जीव थोडा लाव, थोडा लाव...’ या गमतीदार गाण्यातली पहिली ओळ ऐकून माझ्यातला लेखक विचार करू लागला की,

खरंच हाता-पायांचा आणि डोळ्यांचा योग्य ताळमेळ घालून प्रवासी किंवा वस्तू यांना सुखरूप इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या ड्रायव्हरला आपण जीव लावतो का? जो आपल्या जिवाची काळजी करतो त्याच्या जिवाची आपण कधी काळजी करतो का?

जे आपण खातो तेच त्याला देतो का? ज्या हॉटेलच्या रूममध्ये आपण झोपतो तशीच रूम त्यालाही झोपण्यासाठी मिळेल असं पाहतो का? या प्रश्नांची उत्तरं संमिश्र असतील...पण ड्रायव्हर मंडळींना समाजात सन्मानाची वागणूक मिळायला हवी.

कुटुंबाला चार घास मिळावेत म्हणून हे ड्रायव्हर स्टिअरिंगवर अहोरात्र असतात. सतत गिअर बदलत बदलत एक दिवस आपल्याही आयुष्याचा गिअर बदलेल या आशेनं सेवा पुरवतात. त्यांना ना वेळेवर झोप, ना वेळेवर जेवण, ना वेळेवर आंघोळ...

पण गाडीचा मोसम बघून वेळेवर गिअर मात्र बदलावाच लागतो. वेळप्रसंगी गाडीतच ड्रायव्हर-सीट मागं करून रात्र काढावी लागते. समोरून येणारं प्रत्येक वाहन जणू ‘यमाचा रेडा’च असतो; पण त्यालाही साईड देऊन सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या ईप्सितस्थळी सुखरूप पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतात.

शरीरस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून बोलायचं झाल्यास, एकाच जागेवर तीन तासांहून अधिक वेळ बसून राहू नये; पण ड्रायव्हर मात्र सलग आठ तास, तर कधी कधी सलग बारा बारा तासही ड्रायव्हिंग करतात.

ट्रकड्रायव्हर मंडळींचं तर आख्खं बिऱ्हाडच केबिनमधे असतं, तसंच एसटीच्या अनेक चालकांच्या नशिबात निकृष्ट वाहनं आणि रस्ते येतात. त्यातूनही ते प्रवाशांना सुरक्षित सेवा प्रदान करतात. पोकलेन मशिनचे ड्रायव्हर तर महिनोन् महिने घरापासून दूर असतात. या सगळ्यांचं कार्य खरंच जीव लावण्यासारखंच आहे.

आयुष्य नावाची गाडी चालवणारा आपल्यातलाही प्रत्येकजण एक ड्रायव्हरच आहे! आपल्या रोजच्या जगण्याशी ड्रायव्हिंग जोडलं की त्यातून खूप काही शिकता येतं. आयुष्यात कधी कधी खराब रस्ता येतो तेव्हा जिंदगीच्या गाडीचा गिअर बदलून ती सावकाश चालवावी लागते,

तर जेव्हा कधी चांगला रस्ता मिळतो तेव्हा टॉप गिअर टाकून वेग वाढवावाही लागतो. वाटेत कितीही गतिरोधक येऊ द्या; गाडीतलं सामान पडू द्यायचं नसतं. थोडेफार हेलकावे बसतात; पण पुन्हा लगेच सावरून वेग घ्यायचा असतो.

आयुष्यरूपी गाडीला डाव्या की उजव्या बाजूला वळवायचं हे समोरच्या परिस्थितीनुसार ठरवावं लागतं. वळण्याच्या अगोदर जर इंडिकेटर लावला तर आपल्या मागच्यांचाही प्रवास सुखकर होतो. अडचणी येतातच; पण म्हणून काही आयुष्याला तत्काळ ब्रेक लावायचा नसतो. नाहीतर मग आपल्यामागून वेगात येणाराच आपल्याला धडकतो.

अपघात काही फक्त पुढून धडकून होत नसतात तर ते मागून धडक देऊनही होत असतात. आपल्या जीवनात समोरून येणारा धोका निदान दिसतो तरी; पण मागूनही कुणीतरी आपला पाठलाग करत असतातच हेही ध्यानात घ्यायला हवं.

जग तंत्रज्ञानात खूप पुढं गेलं आहे. परदेशात विनाड्रायव्हरच्या गाड्या असतात. अशा गाड्या जर भविष्यात भारतात आल्या तर बेरोजगारीचा गुणाकार होईल हे नक्की; कारण, ड्रायव्हिंग हे कोट्यवधी लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारं कौशल्य आहे. भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गर्दीच्या देशात यंत्र हे मानवाच्या हातात असलेलंच चांगलं राहील.

आपल्यापैकी कुणाला वाहन चालवता येत असेल किंवा नसेल; पण तरीही प्रत्येकजण काही ना काही वाहून नेतच असतो, म्हणून आजच्या युगात प्रत्येकानंच छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वाहक झालं पाहिजे.

असं झालं की समृद्ध आयुष्य जगता येईल आणि जीवनात आडवे येणारे संकटरूपी गतिरोधक आणि वळणंही सुखरूप पार करता येतील. माणसं, वस्तू आणि विचार वाहून नेणाऱ्या प्रत्येक ड्रायव्हरला माझा सलाम.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि पीकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com