अचूक निदानाचे गणित

आजाराचे अचूक आणि वेळेत निदान हे आजार बरा होण्यासाठी गरजेचे आहे. आजाराचे निदान घाईने नाही, तर ते तारतम्याने करावे लागते.
correct diagnosis by talking to patient explaining his symptoms conducting necessary tests in time health doctor
correct diagnosis by talking to patient explaining his symptoms conducting necessary tests in time health doctorsakal
Summary

आजाराचे अचूक आणि वेळेत निदान हे आजार बरा होण्यासाठी गरजेचे आहे. आजाराचे निदान घाईने नाही, तर ते तारतम्याने करावे लागते.

- डॉ. अविनाश सुपे

आजाराचे अचूक आणि वेळेत निदान हे आजार बरा होण्यासाठी गरजेचे आहे. आजाराचे निदान घाईने नाही, तर ते तारतम्याने करावे लागते. रुग्णाशी बोलून, त्याची लक्षणे चांगली समजावून, वेळेत आवश्यक त्याच तपासण्या करून योग्य निदान करता येते. बऱ्याच वेळा डॉक्टर रुग्णाला वेळच देत नाहीत. रुग्णाला बरेच सांगायचे असते; पण डॉक्टरकडे गर्दी असल्यामुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे काही वेळा तपासणीची दिशा भलतीकडेच जाते.

महामार्गावर अपघात झालेला एक मुलगा १९८४ मध्ये आमच्याकडे आला होता. त्याच्या पोटावर छोट्याछोट्या जखमा होत्या. तसा तो चालतच रुग्णालयात आला. त्यावेळी सिटी स्कॅन, अल्ट्रासाऊंड इत्यादी तपासण्या उपलब्ध नव्हत्या.

आम्ही त्याचा एक्स रे काढला. छातीला इजा नव्हती. खूप मार लागला आहे, असे बाह्यांगी वाटत नव्हते; पण अशा अपघातातील जखमींना २४ तास निरीक्षणासाठी दाखल करून ठेवण्याचा शिरस्ता होता. त्याप्रमाणे आम्ही त्याला दाखल करून घेऊन ठेवले होते. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने होत होते.

त्याला पुन:पुन्हा तपासले; पण त्याचे काही कारण सापडले नाही. त्याला दर दोन तासांनी तपासात होतो; पण त्याच्या हृदयाचे ठोके औषधे देऊनसुद्धा कमी होत नव्हते. दरम्यान केईएममध्ये भरपूर काम असल्याने आम्ही रात्रभर ऑपेरेशन थिएटरमध्ये कामात अडकलो.

दुसऱ्या दिवशी माझे शिक्षक डॉक्टर समसी सर राऊंडला आले. त्यांनी त्याला पुन्हा एकदा तपासले. त्याच्या पोटावर फक्त हात ठेवला आणि सांगितले याची प्लिहा फाटली आहे म्हणून त्याला लगेच शस्त्रक्रियेसाठी घ्यायला हवे. ताबडतोब आम्ही त्याला शस्त्रागारात नेले व शस्त्रक्रिया सुरू केली.

त्याची प्लिहा फाटली होती आणि पोटात ३००-४०० एमएल रक्त जमा झाले होते. पुढे तो दोन-तीन दिवसांत बरा झाला आणि व्यवस्थित घरी गेला. नंतर सरांशी चर्चा करताना आम्ही विचारले की, सर तुम्हाला जे लगेच कळले ते आम्हाला का कळले नाही?

ते म्हणाले, ‘‘अविनाश, ज्यावेळी तुम्ही त्याला तपासले तेव्हा त्याला इतर फारशी लक्षणे नव्हती, फक्त त्याचे ठोके जलद होते. निदान करण्यासारखे फारसे काही नव्हते; पण मी जेव्हा त्याला पाहिले तेव्हा काही तास होऊन गेले होते आणि त्याचा आजार लक्षात येण्यासारखा स्पष्ट झाला होता.’’ अर्थात हा सरांचा मोठेपणा होता. त्यांच्या अचूक निदानाचे ते कौशल्य होते.

यामध्ये एक लक्षात घेतले पाहिजे की, कोणताही आजार सुरुवातीला सौम्य असतो तेव्हा निदान करणे थोडेसे अवघड असते. जसजसा आजार वाढत जातो त्याची लक्षणे तीव्र होतात आणि मग निदान करणे थोडे सुलभ होते. पुढे मला स्वतःचे युनिट मिळाले तेव्हा माझ्याही हे लक्षात आले की, कधी कधी माझे निवासी विद्यार्थी निदान करू शकत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोटावर हात ठेवून झटकन निदान करत असू. माझ्या विद्यार्थ्यांना कौतुक

वाटत असे की, सर, तुम्हाला कसे लगेच समजले. मी तेव्हा त्यांना डॉक्टर समसी सर यांचे हे उदाहरण सांगत असे. जसजसा आजार वाढतो, तेव्हा निदान करणे सोपे होते; पण सुरवातीला निदान करण्यात डॉक्टर चुकू शकतो. त्याचे गणितच वेगळे असते. प्रत्येक आजाराचे असेच असते. कॅन्सरबाबतही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

एकदा माझे दुसरे सन्मान्य शिक्षक डॉक्टर कोठारी यांनी एक उदाहरण दिले. रिकामे तळे थेंबाथेंबाने भरायला सुरुवात होते. त्याचा वेग जर रोज दुपटीने वाढवला, तर ज्या दिवशी ते पूर्ण भरते त्याच्या आदल्या दिवशी ते अर्धे भरले असते.

कॅन्सरचे निदान जेव्हा शरीरात चार पेशी असतात, तेव्हा करणे कठीण असते. जेव्हा तो वाढतो किंवा सर्वत्र पसरतो तेव्हा त्याचे निदान सोपे जाते. तो बाह्यांगी अवयवात असेल तर ताबडतोब दिसतो व लवकर लक्षात येतो.

अशा वेळी निदान वेळीच होते व उपचारदेखील करता येतात. रुग्ण बरा होऊन अनेक काळ जगू शकतो; पण तो पोटाच्या आत, स्वादुपिंडात किंवा आतड्यात असेल, तर लवकर लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येतो तेव्हा तो बराच पसरलेला असतो.

पूर्वी रुग्ण यायचे तेव्हा त्यांचा आजार खूप पसरलेला असायचा आणि त्यांचे आयुष्य तीन ते सहा महिनेच असायचे. जपान, कोरिया इत्यादी देशात आतड्याच्या कर्करोगाचे निदान दुर्बिणीने बघून फार लवकर करू शकतात. त्यामुळे त्या देशात ताबडतोब शस्त्रक्रिया व उपचार केले जातात.

रुग्ण अनेक काळ जगतात; पण आपल्या देशात अजून तरी बहुतांशी रुग्णात आजार पुढे गेल्यावर येतात व निदान उशिरा होते. म्हणून निदानाचे गणित अचूक असावेच, त्याबरोबर ते लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. काही काही गोष्टींकडे आपण जागरूक राहून लक्ष दिले पाहिजे. काही लक्षणे ही चिंताजनक असतात व डॉक्टरने त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

केईएममध्ये काम करताना आई-वडिलांकडे आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदाच जाणे व्हायचे. एकदा मी घरी गेलो असताना मी जेवायला बसलो तेव्हा मी आईला विचारले, बाबा का माझ्याबरोबर बसत नाहीत. त्यावेळी ती म्हणाली, ‘‘त्यांना हल्ली जेवायला खूप वेळ लागतो. तू जेऊन घे.’’ या एका वाक्याने माझ्या मनात शंका आली.

मी त्यांना विचारले आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी सकाळी बेरियम/एन्डोस्कोपीचा तपास करून त्यांना अन्ननलिकेचा कर्करोग आहे, हे निदान केले. म्हणूनच रुग्णाशी संवाद साधताना अशा चिंताजनक (alarming) लक्षणांकडे जातीने लक्ष दिले पाहिजे व आवश्यक असल्यास पुढील तपास त्वरित केले पाहिजेत.

दरवर्षी शरीराची तपासणी करून घेणे उत्तम आहे; पण लक्षणांकडे डोळेझाक न करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. जेव्हा हृदयाचा झटका येतो तेव्हा त्याची पूर्वलक्षणे दिसलेली असतात. जिने चढताना धाप लागणे, छातीत धडधड होणे ही लक्षणे दिसताच वेळेवर तपासणी करून योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. जेणेकरून हृदयाचा झटका येण्याची शक्यता कमी होईल व त्यामुळे होणारे नुकसान टळेल.

आजच्या जमान्यात तपासण्या खूप झाल्या आहेत व त्या खर्चिकदेखील आहेत. खूप तपासण्या केल्या म्हणजे निदान अचूक होईल, असे नाही. रुग्णाशी बोलून, त्याची लक्षणे चांगली समजावून, वेळेत आवश्यक त्याच तपासण्या करून योग्य निदान करणे महत्त्वाचे. बऱ्याच वेळा डॉक्टर रुग्णाला वेळच देत नाहीत. रुग्णाला बरेच सांगायचे असते; पण डॉक्टरकडे गर्दी असल्यामुळे ते शक्य होत नाही.

त्यामुळे काही वेळा तपासण्याची दिशा भलतीकडेच जाते व आजार लवकर लक्षात येत नाही. कालांतराने आजार वाढल्यावर तो लक्षात येतो व त्यावेळी फार काही करता येत नाही. म्हणूनच डॉक्टरांनी व रुग्णांनीसुद्धा जागरूक असले पाहिजे. यात उत्तम चिकित्सक महत्त्वाचा तसेच रुग्णाची जागरूकता व जाणीव ही तेवढीच

महत्त्वाची आहे. आजाराचे अचूक आणि वेळेत निदान हे आजार बरा होण्यासाठी गरजेचे आहे. निदान घाईने नाही, तर ते तारतम्याने केलेले असावे. याबाबत डॉक्टरांसोबत रुग्णानेदेखील सजग राहणे आवश्यक आहे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com