लसीकरणाची बदनामी नको!

एप्रिल २०२१ मध्ये ब्रिटिश व्यक्ती जेमी स्कॉट याला कोविडची लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी रक्तात गुठळी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले.
covishield vaccine corona virus
covishield vaccine corona virus Sakal

- डॉ. नानासाहेब थोरात

एप्रिल २०२१ मध्ये ब्रिटिश व्यक्ती जेमी स्कॉट याला कोविडची लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी रक्तात गुठळी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या कुटुंबाने ॲस्ट्राझेनेका कंपनीवर न्यायालयात केस टाकली.

त्या केसच्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात संबंधित कंपनीने न्यायालयाला सांगितले, की आमच्या लशीमुळे असे होऊ शकते; पण हे खूप दुर्मिळ आहे. ‘ॲस्ट्राझेनेका’ची कोविड लस भारतात सिरम इन्स्टिट्यूट कंपनीने ‘कोविशिल्ड’ नावाने बनवली होती. त्यामुळेच भारतात सध्या त्यावरून गदारोळ सुरू झाला असून सोशल मीडिया त्यात अधिकच भर घालत आहे.

जगभरात सध्या २६ वेगवेगळ्या आजारांवर सुमारे ४० लशी दिल्या जात आहेत. त्यात ८० टक्के लशी लहान मुलांना (० ते ५ वयोगट), काही किशोरवयीन मुला-मुलींना (एचपीव्ही लस); तर काही वयोवृद्धांना (फ्लू ताप) लशी दिल्या जातात.

फक्त कोविडचे सुमारे एक हजार कोटींपेक्षा जास्त डोस अंदाजे ५०० कोटी नागरिकांना देण्यात आले आहेत. त्यात कोविशिल्डचे अंदाजे ३०० कोटी डोस आहेत. भारतातील २५ वर्षांवरील ८० टक्के नागरिकांनी या लशीचा किमान एक डोस तरी घेतला आहे.

इंग्लंडमधील या केसच्या सुनावणीदरम्यान जो मुद्दा समोर आला, तो म्हणजे या लशीमुळे थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) होऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचे तर रक्ताच्या गुठळ्या आणि त्यामुळे हार्ट ॲटॅक येऊ शकतो किंवा मेंदूचा झटका.

आता फक्त याच लशीचा दुष्परिणाम नाही. सर्वच लशींच्या दुष्परिणामांमध्ये त्याचा समावेश होतो. लस दिल्यानंतर शरीराकडून लगेचच जो प्रतिसाद दिला जातो त्यामध्ये ताप येणे, डोके आणि अंगदुखी हे साधारण प्रकार आहेत.

रक्ताची गुठळी होणे, एकदम गंभीर प्रकारचा ताप येणे आणि त्यानंतर मेंदूचा झटका हे अत्युच्च पातळीवरचे दुष्परिणाम असतात. साधारण दहा लाख लोकांमध्ये सात ते आठ जणांना असा त्रास होऊ शकतो आणि त्यातील ९० टक्के जण रुग्णालयात उपचार घेऊन बरे होतात.

आता कोविशिल्डच्या बाबतीत हाच दावा सुरुवातीपासून केला गेला होता, की दहा लाख लोकांमागे एकाला हा त्रास होऊ शकतो. ॲस्ट्राझेनेका कंपनीने इंग्लंडच्या न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार कोविशिल्ड लशीचा एक डोस घेतलेल्या दहा लाखांपैकी फक्त सात ते आठ व्यक्तींना हा दुर्मिळ दुष्परिणाम दिसू शकतो आणि दुसरा किंवा तिसरा डोस घेतलेल्यांमध्ये त्याचा धोका कमी होत जातो.

त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की लस घेतल्यानंतर पहिल्या चार आठवड्यांतच अशा प्रकारचा दुर्मिळ ‘टीटीएस’ होऊ शकतो आणि जसे जसे डोस वाढत जातील तसे त्याचा धोका कमी होतो. ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट या व्यक्तीला पहिला डोस घेतल्यानंतर लगेचच हा त्रास जाणवला होता. त्यामुळे त्याने दुसरा डोस घेतला नाही.

मात्र ज्यांनी दोन किंवा तीन डोस घेतले त्यांपैकी एकानेही अजूनपर्यंत अशा प्रकारची तक्रार नोंदवली नाही किंवा कोणत्या रुग्णालयाकडूनही अशा प्रकारची केस नोंद झाल्याची पुष्टी केली नाही.

‘टीटीएस’मध्ये रक्ताच्या गुठळ्या बनतात. त्यापुढे जाऊन हृदयाला आणि मेंदूला त्रासदायक ठरतात; पण इतर कारणांनीसुद्धा साधारण लोकांना थ्रोम्बोसिस होतो आणि त्यांनासुद्धा रक्ताच्या गुठळीमुळे हृदयविकार किंवा मेंदूचा स्ट्रोक येतो. २०२० मध्ये म्हणजे कोविडपूर्वी अशा प्रकारे रक्ताच्या गुठळ्या बनून मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या जगात दरवर्षी एक ते तीन लाख इतकी प्रचंड होती.

कोविडदरम्यान कोणतीही लस न घेता त्यामध्ये १६ टक्क्यांनी वाढ झाली. या नॉर्मल थ्रोम्बोसिस आजार होणाऱ्या लोकांशी कोविडच्या लशीचा काहीही संबंध नव्हता. मार्च २०२१ च्या दरम्यान अजून एक संशोधन युरोपियन कमिशनने प्रसिद्ध केले होते.

लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण वयोवृद्धांमध्ये असू शकते की तरुणांमध्ये, याबाबत ते होते. म्हणूनच युरोपियन देशांनी ॲस्ट्राझेनेकाची लस ६० वर्षांवरील नागरिकांना दिली नव्हती. उलट ती २५ ते ४० वर्षे वयोगटाला सुचवण्यात आली होती.

पुढे जाऊन ॲस्ट्राझेनेका कंपनीनेच लॅन्सेट या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये २०२१ च्या ऑगस्टमध्ये एका अभ्यासात सांगितले होते, की युरोपात जवळजवळ पाच कोटी लोकांना या लशीचे डोस दिले आहेत.

त्यामधून फक्त ३९९ लोकांनी टीटीएस झाल्याची नोंद केली होती. त्यामध्ये ब्रिटनमधील १३ केस होत्या. ही माहिती इंटरनेटवर पब्लिक डोमेनमध्ये आहे. पुढे जाऊन नोव्हेंबर २०२१ मध्येच ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या १३ केस व्हीआयटीटीएसचे मेडिकल निकष पूर्ण करत नाहीत आणि त्यावरून लस घेतल्यामुळेच त्या लोकांना टीटीएस झाला, असे ठामपणे अजिबात म्हणता येणार नाही, असे स्पष्ट केले.

त्याचे अजून एक कारण म्हणजे मुळात ‘कोविड’ आजारातच रक्ताच्या गुठळ्या होणे हे एक लक्षण होते. त्यामुळे लशीमुळे तसे झाले की कोविडमुळे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. त्यासाठी किमान भारतात तरी आता सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत सरकार यांनी पुढाकार घेऊन अधिकचे संशोधन करणे खूपच गरजेचे आहे. वरील सर्व माहिती याआधीच पब्लिक डोमेनमध्ये होती. फक्त मागील आठवड्यात त्यांनी ती कोर्टात सांगितली आणि त्यातूनच हा मोठा गोंधळ सुरू झाला.

कोविड लशीच्या चांगल्या आणि वाईट दुष्परिणामांवर २०२१ मध्ये जगभरात किमान हजारो शास्त्रीय संशोधने प्रसिद्ध झाली आहेत. त्या संशोधनांचा एका ओळीतील अन्वयार्थ सांगायचा झाला, तर कोविड आणि इतर लशीचे तमाम दुष्परिणाम लस घेतल्यानंतर पहिल्या ३० दिवसांच्या आत दिसून आले आहेत.

अगदी ‘टीटीएस’सुद्धा अनेक अभ्यासांत सरासरी पहिल्या दहा दिवसांनी आढळून आला आहे, पण हीच एक बाजू संपूर्णपणे खरी आहे का किंवा योग्य आहे का? तर नाही... रक्ताच्या गुठळ्या होणे आणि त्यामुळे स्ट्रोक-अरेस्ट-अटॅक या आजारांचे रुग्ण वाढलेत का? तर बिलकुल वाढलेत.

भारतात तरुणांमध्ये या आजाराची वाढ झाली आहे, हे लोकांच्या सोशल मीडियावरील चर्चांवरून दिसून येत आहे. पुढे जाऊन अजून वैज्ञानिक आणि चिकित्सक अभ्यास होण्याची गरज आहे. तरुणांमध्ये वर्क फ्रॅाम होम, ॲानलाईन शॉपिंग नियमित झाली...

बैठ्या जीवनशैलीत वाढ झाली, टीव्ही-मोबाईलचा स्क्रीन टाईम वाढला... अशा एक ना अनेक सवयी दैनंदिन आयुष्याचा मोठा भाग झाल्या आहेत. काही जण अचानक जिममध्ये जाऊन अनावश्यक व्यायाम करत आहेत. त्यावर अभ्यास झाला पाहिजे. त्यासाठी मुळात लस तयार करणाऱ्या कंपनीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

हजारो वर्षे अनेक रोगांशी झगडून ही मानवजात आता आता कुठे काही आजार हद्दपार करत आहे. भारतासारख्या अफाट आणि गरीब लोकसंख्येच्या देशात लसीकरणासारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय संकल्पनेबद्दल शंका व्यक्त करून गोंधळ वाढवणे टाळायला हवे आणि त्यात पुढाकार ही लस तयार करणाऱ्या कंपन्या आणि सरकारनेच घ्यायला हवा.

कोविड लशीच्या चांगल्या-वाईट दुष्परिणामांवर जगभरात किमान हजारो शास्त्रीय संशोधने प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचा एका ओळीतील अन्वयार्थ सांगायचा झाला, तर कोविड आणि इतर लशींचे तमाम दुष्परिणाम ती घेतल्यानंतर पहिल्या ३० दिवसांच्या आत दिसून आले आहेत. भारतासारख्या मोठ्या आणि गरीब लोकसंख्येच्या देशात लसीकरणासारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय संकल्पनेबद्दल शंका व्यक्त करून गोंधळ वाढवणे टाळण्याची गरज आहे. त्यासाठी लस तयार करणाऱ्या कंपन्या आणि सरकारनेच पुढाकार घ्यायला हवा.

thoratnd@gmail.com (लेखक लंडनमध्ये विज्ञान संशोधक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com