क्रेप ट्रक

crepe-truck
crepe-truck

वीकएंड हॉटेल - नेहा मुळे
क्रेप हा पदार्थ बघता क्षणी डोसाच असल्याचं वाटतं.खायला सुरवात केल्यावर वाटतं हा पातळसा पॅनकेक आहे. मात्र, यापेक्षा निराळीच चव आणि ओळख असलेला क्रेप हा पदार्थ आहे मूळ फ्रान्सचा. जगभर मिळणाऱ्या क्रेपचे वेगवेगळे प्रकार आता पुण्यातही मिळू लागले आहेत. यासाठी नाव घ्यायला हवं ते पुण्याच्या सोहम भाटवडेकर यांनी सुरू केलेल्या ‘नीना पिंटा सान्तामारिया’ या फूड ट्रकचं.

क्रेप गोड किंवा खमंग, अशा दोन पद्धतीनं बनविले जातात. क्रेपचा बेस डोशाप्रमाणे तव्यावर पसरून तयार केला जातो. त्याचं पीठ मात्र वेगळ्या पद्धतीनं तयार होतं. त्यासाठी कणीक किंवा मैदा वापरला जातो. दूध, अंडं, साखर, मीठ, बटर असे पॅनकेक बनविताना जे घटक वापरले जातात, तेच या पिठातही असतात. डोशासारखा गोल बेस तयार झाल्यावर त्यावर सारण कोणतं घातलं आहे, यावरून त्या क्रेपचा प्रकार ठरतो. जसं गोड क्रेपमध्ये नुसती साखर घालूनही खाल्लं जातं किंवा नटेला, फ्रेश क्रीम, मेपल सिरप, फळांचे बारीक तुकडे यांपैकी कोणतेही घटक वापरले जातात. मांसाहारी किंवा खमंग क्रेपमध्ये चीज, अंडं, मशरूम, मटण, चिकन, इतर काही मसाले असे घटक असतात.

नीना पिंटा सान्तामारिया
फ्रान्समधील क्रेप पुण्यात येताना त्याला भारतीय रूपात आणलं आहे सोहम भाटवडेकर यांनी. त्यांनी शाकाहारी आणि मांसाहारी क्रेपना भारतीय चवीमध्ये आणत लज्जतदार बनवलं आहेत. यामध्ये ‘मटण की बात’ हा क्रेप लोकांच्या विशेष पसंतीला उतरलेला आहे. या क्रेपमध्ये मटण खिमा हा महत्त्वाचा घटक असतो. चिकन आवडणाऱ्यांसाठी ‘बटर चिकन क्रेप’, ‘चिकन पुणेरी’ हेदेखील खास प्रकार आहेत.

शाकाहारींसाठी क्रेपची टेस्टी नावं सांगायची झाल्यास पावभाजी वेड्‌स क्रेप, मशरूमाय नमः हा मशरूम, पालक, कॉर्न, बेझल टोमॅटो सॉस असं सारण असणारा क्रेप, पनीर आवडणाऱ्यांसाठी पनीर भूर्जी क्रेप हे फ्लेवर्स आहेत. याशिवाय, डेझर्ट क्रेपमध्ये डेथ बाय चॉकलेट, बेरी याँ, बनोफी, ओरिओ रे ही नावे सांगता येतील. आंब्याच्या सीझनमध्ये सिम्पली मॅंगो क्रेप खाऊन पाहावाच. यात हापूस आंब्याचे काप आणि व्हीपड्‌ क्रीम असते. काहीशा खुसखुशीत बेसमध्ये असं विविध प्रकारचं सारण घालून केलेले क्रेप चवदार बनतात.

‘नीना पिंटा’ची सुरवात
पुण्यात ‘नीना पिंटा सान्तामारिया’ हा एकमेव असा फूड ट्रक असावा जिथं फक्त क्रेपचेच विविध प्रकार मिळतात. एकतर फूड ट्रकची नवीन कल्पना, त्यात तोही केवळ एका फ्रान्समधल्या डिशवर आधारलेला... हे व्यवसायाच्या दृष्टीनं तसं धाडसाचंच. मात्र, सोहम यांनी ते धाडस केलं आहे आणि चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीलाही उतरवलं आहे.

सोहम म्हणाले, ‘‘युरोपमध्ये फिरत असताना मला क्रेपचे अनेक आउटलेट्‌स दिसले. भारतात त्या तुलनेत हा पदार्थ कमी ठिकाणी मिळतो, असं जाणवलं. पुण्यात अभावानंच. त्यामुळं मी पुण्यात या पदार्थाचा ट्रक सुरू करण्याचा विचार केला. परदेशी पदार्थ आपल्याकडं स्थिरावताना त्याच्या विक्रीची पद्धतही परदेशी स्टाईलनं ठेवावी, असा विचार केला आणि रेस्टॉरंटऐवजी ट्रकची कल्पना निश्‍चित केली. बाणेरमध्ये ट्रकची सुरवात केली. पुण्यातला तरुणवर्ग एफसी रोडवर अधिक असतो, याचा विचार करून नंतर हा ट्रक एफसी रोडवर, व्हीनसच्या गल्लीत आणला.

सोहम यांना भविष्यात या ट्रकच्या अनेक शाखा सुरू करायच्या आहेत. त्यांनी क्रेपमध्ये भारतीय चव आणताना स्वतःच्या आवडीचा विचार केला आहे. जसं बटर चिकन त्यांना आवडतं, तर क्रेपमध्ये ते मिश्रण वापरून पाहिलं गेलं. अशाच क्रेपच्या काही पद्धती त्यांनी स्वतः विकसित केल्या. भविष्यात गाजर हलवा क्रेपसारखे आणखी काही प्रकार आणता येतील का, यासाठी त्यांचे प्रयोग सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com