महत्त्व कान पकडणाऱ्यांचं, सचिन अन् गावसकर यांचा आदर्श टीम इंडियाने घ्यावा

लेखाचा विषय मांडायचं सबळ कारण मनात आलं ते ईशान किशनची गेल्या काही दिवसांतील झालेली दशा बघून.
Cricket
Cricketsakal

क्रिकेटविश्‍वातले दोन प्रसंग सांगतो, जे खूप जुने आहेत. सुनील गावसकर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सतत उजव्या स्टंप बाहेरचा चेंडू खेळताना बाद झाले होते. भारतात परतल्यावर सुनील गावसकर पुण्यात कमल भांडारकरसरांचा सल्ला घ्यायला आले. डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर सरावाची व्यवस्था करून सर तिथं गावसकरांना घेऊन गेले. शाम ओक, संतोष गोखले, मतीन शेख सह अजून काही चांगले गोलंदाज गावसकरांना गोलंदाजी करू लागले आणि कमल भांडारकर सर समोर उभे राहून बघत होते.

खेळ बघून थोड्या वेळाने सरांच्या काहीतरी ध्यानात आले आणि ते गावसकरांच्या डाव्या बाजूला जाऊन उभं राहून बघू लागले. खेळताना नेमकी चूक काय होते आहे हे समजल्यावर सरांनी बाजूला पडलेल्या दोन बारीक सहा इंचाच्या काड्या घेतल्या. खेळायला तयार असल्याच्या पवित्र्यात म्हणजेच स्टान्स घेऊन उभं राहिल्यावर एक काडी सुनील गावसकरांच्या बुटांच्या टाचांच्या मागे ठेवली आणि एक उजव्या बुटाच्या मागं ठेवली.

परत त्यांच्या गोलंदाजांना उजव्या स्टंप बाहेर मारा करायला सांगितले. गावसकरांना ते इतकंच म्हणाले, की शफल होताना तू किंचित आत येण्याऐवजी अगदी थोडा बाहेर सरकत आहेस, ज्यानं खेळताना तुझा डावा पाय उजव्या स्टंपच्या रेषेत येत नसल्यानं नेमकी उजवी स्टंप कुठं आहे याचा तुला अंदाज येत नसल्यानं उगाच बाहेरचे चेंडू तू खेळत आहेस...

आता चेंडू खेळण्याअगोदर सरकून थोडा आत येत राहा... बाहेर सरकलास तर तुझा पाय मागच्या काडीला लागेल आणि चूक तुझी तुलाच समजेल. इतकंच सांगून सर परत मागं सरकले. जेव्हा सुनील गावसकरांचा पाय त्या काडीला लागायचा, तेव्हा भांडारकर सर गावसकरांना ओरडायचे. काही वेळातच गावसकरांची पायाची हालचाल योग्य व्हायला लागली आणि मग ते नेहमीसारखे सुरेख खेळू लागले.

सत्र संपल्यावर गावसकरांनी कमल भांडारकर सरांना वाकून नमस्कार केला आणि नंतर कसोटी सामन्यात परत एकदा धावांचा पाऊस पाडला. दुसरा प्रसंग असा आहे, की आचरेकर सरांनी एकीकडं सचिन तेंडुलकरसाठी सराव सामना आयोजित करून ते त्यांच्याच शिबिरातील वरिष्ठ संघाचा अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर असल्यानं तो बघायला गेले. आपल्या वरिष्ठ खेळाडूंना महत्त्वाच्या सामन्यात प्रोत्साहन देण्यासाठी सचिन सराव सामना खेळायचा सोडून ब्रेबॉर्न स्टेडियमला गेला.

आचरेकर सरांच्या ते बरोबर लक्षात आले. त्यांनी सचिनला बोलावून सामन्यात किती धावा केल्यास... कसा बाद झालास विचारलं. सचिनकडं त्याचं उत्तर नव्हतं. सरांनी सचिनला एक चांगली लगावून दिली. सचिनच्या हातातील डबा वगैरे इकडे तिकडे पडला. मग सरांनी खडसावून बोलताना सुनावलं, की यापुढं सामना चुकवून काही करायचं नाही. टाळ्या वाजवायची नाही तर चांगली कामगिरी करून ऐकायची भूक ठेव. जे करायचं ते सीमारेषेबाहेर बसून नाही तर आत जाऊन घाम गाळून करायचं.

त्या एका प्रसंगातून सचिन बरंच काही शिकून गेला. आचरेकर सरांनी मारलेली एक सणसणीत चपराक चांगले काम कायमचं करून गेली. हे दोन प्रसंग सांगण्याचे कारण असे आहे, की आयुष्यात जर लहानपणी आणि कॉलेज जीवनात चांगला मित्र मिळाला जो चांगल्याला चांगले आणि वाइटाला तोंडावर वाईट म्हणेल. जो चूक केली तर कानउघडणी करेल, तर समजावे योग्य मार्गावर प्रवास चालू आहे.

शिक्षण संपवून काम चालू केल्यावर कोणीतरी सक्षम विचारी मार्गदर्शक म्हणजेच ज्याला इंग्रजीत मेंटॉर म्हणतात तसा लाभला, तर कामाच्या क्षेत्रात योग्य प्रगती करायला सोपं जातं. आणि जर हे दोन टप्पे मनापासून पार केले तर काही वर्षांनी आपापल्या कामात पुढचा मार्ग दाखवणारा गुरू लाभतो. तसं झालं तर आयुष्य उजळून निघतं. चांगला गुरू मिळायला तुम्हाला अगोदर शिष्य बनण्याची क्षमता अंगी आणावी लागते.

लेखाचा विषय मांडायचं सबळ कारण मनात आलं ते ईशान किशनची गेल्या काही दिवसांतील झालेली दशा बघून. संधी मिळाल्यावर एक दिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा आणि नंतर भारतीय संघात जागा पक्की करायचा प्रयत्न करणाऱ्या ईशान किशनला असे वाटत होतं, की क्षमता असून नंतर भारतीय संघात जागा मिळत नाहीये. त्यातून आलेल्या निराशेनं त्यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊन नंतर माघार घेतली.

भारतात परतल्यावर तो परदेशात गेला आणि तिथं केलेल्या पार्टीजचे फोटो टाकले. नंतर अचानक बडोद्याला जाऊन हार्दिक पंड्यासोबत सराव करू लागला. हे सगळं करताना त्याच्या मनाला आपण आपल्या रणजी संघाकडून रणजी सामने खेळावेत असा विचार मनाला शिवला नाही. तसे कोणीही त्याचा कान पकडून गुपचूप रणजी सामना खेळायची त्याची कानउघडणी केली नाही. पर्यायानं भारतीय संघात कोना भरतला आणि नंतर आता ध्रुव जुरेलला संधी मिळाली. ईशान किशनचं नाव अजून मागं पडलं.

दुसरा विकेटकीपर जो अजून क्रिकेट मैदानापासून लांब आहे तो म्हणजे रिषभ पंत. त्याला झालेल्या अपघातातही रिषभ पंत एकटाच इतक्या रात्री प्रवास करून का जात होता. त्याला कोणीही मित्राला सोबत घ्यावंसं का वाटलं नाही. का एकही असा मित्रच त्याला नव्हता जो साथ देईल किंवा असा मूर्खपणा करू नकोस असं तोंडावर सांगेल.

सगळेच प्रश्न भेडसावणारे आहेत. मनात विचार नक्की येतो की तरुण क्रिकेटपटूंना खरा मित्र नसेल, तर मग मेंटॉर किंवा गुरू मिळणार तरी कसा. सचिन तेंडुलकरच्या जमान्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने नसले, की आपापल्या रणजी संघातून खेळायला आनंदानं मैदान गाठायचे. धोनी - कोहलीच्या जमान्यातील खेळाडू इतक्या जास्त प्रमाणात आंतरराष्ट्रीय सामने खेळू लागले की त्यांनी वेळ मिळाल्यावर विश्रांती घेणं पसंत केले. रणजी सामने कोणीही खेळताना दिसले नाहीत. आताच्या जमान्यातील खेळाडूंच्या मनात रणजी सामना खेळायचा ना उत्साह आहे ना इच्छा.

काही ना काही कारण देऊन रणजी सामन्यांपासून लांब राहणेच बहुतेक खेळाडू पसंत करतात. खराब कामगिरीनंतर पुनरागमन करायचे असेल, तरच काही खेळाडू रणजी खेळतात. हार्दिक पंड्या तर भारतीय संघात नसला तरी बडोदा संघाकडून खेळायचा विचारही करत नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता उशिरा का होईना याचा विचार केला आहे. मंडळाचे सचिव जय शहा यांनी खेळाडूंनी रणजी खेळणं अनिवार्य करणार असल्याचं वाच्यता केली आहे.

आयपीएल मुळं आलेल्या आर्थिक स्थैर्यामुळं भारतीय खेळाडू प्रथम श्रेणीच्या सामन्यांना अगदी नगण्य लेखत लागल्याची लक्षणे भयावह आहेत, याची जाणीव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला येऊ लागली आहे. बीसीसीआयनं भारतीय खेळाडूंना परदेशातील टी-२० किंवा टी-१० स्पर्धांमध्ये भाग घ्यायला बंदी केली आहे म्हणून... नाही तर बरेच खेळाडू फक्त तेच सामने खेळून अर्थाजन करण्यात धन्यता मानू लागले असते.

शेवटचा मुद्दा महत्त्वाचा. क्रिकेट कोणाचे लाड करत नाही. ज्याला त्याला आपापल्या जागेवर ठेवते असं मला बऱ्याच वेळा अनुभवायला मिळालं आहे. जे खेळाडू आपल्या राज्यासाठी खेळायला उत्सुक नाहीत पण आयपीएल संघासाठी जीव द्यायला तयार आहेत. जे खेळाडू वर्षभर बाकी कोणते सामने न खेळता एक महिना सराव करून फक्त आयपीएल खेळायचा विचार करत आहेत, त्यांना क्रिकेट काय वागणूक देतं याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. घोडा मैदान लांब नाही कारण लवकरच आयपीएल चालू होणार आहे. नाठाळ आणि क्रिकेटला गृहीत धरणार्‍या खेळाडूंना क्रिकेट काय जागा दाखवतं हे बघायला मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com