पाण्याच्या घोटात प्लास्टिकचा धोका

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिण्याचे मोठे धोके आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, प्लास्टिक एक पॉलिमर आहे. प्लास्टिकमध्ये आढळणारे बीपी नावाचे केमिकल शरीरासाठी अत्यंत घातक आहे.
danger of plastic in drinking water juhi chawla environment
danger of plastic in drinking water juhi chawla environmentSakal

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिण्याचे मोठे धोके आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, प्लास्टिक एक पॉलिमर आहे. प्लास्टिकमध्ये आढळणारे बीपी नावाचे केमिकल शरीरासाठी अत्यंत घातक आहे. एक लिटर पॅकेज पाण्याच्या बाटलीत सरासरी दोन लाख ४० हजार छोटे-छोटे प्लास्टिकचे तुकडे असतात. पाण्याच्या प्रत्येक घोटाबरोबर ते आपल्या पोटात जात असतात.

- जुही चावला मेहता

The plastic bottle we''re throwing away every day still stays there - Carto Racu जेव्हा मी ‘प्लास्टिक प्रदूषणा’संदर्भात मोहीम सुरू केली, तेव्हा शहरातील बऱ्याच नामांकित संस्था त्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मला आमंत्रित करू लागल्या. मी जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी जायचे तेव्हा तेव्हा हॉल खच्चून भरलेला असायचा.

त्याचबरोबर प्रत्येक टेबलवर ठेवलेल्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या दिसायच्या. एका कोपऱ्यात त्याच रिकाम्या बाटल्यांचा डोंगर, प्लास्टिकमध्ये रॅप केलेल्या विविध गोष्टी असायच्या. ही गोष्ट मला अस्वस्थ करायची.

प्लास्टिकच्या वापराला आपण इतके अधीन झालो आहोत, की त्याचे काय दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर, पर्यावरणावर होत आहेत याचाही आपल्याला विसर पडला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या आणि त्यातील पाणी हा विषय जास्त अस्वस्थ करू लागला. मग काय, ‘जय गुगलबाबा की’ म्हणत प्लास्टिक बाटल्यांमधील पाण्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याविषयी निरनिराळे लेख, माहिती वाचायला सुरुवात केली.

 सोपे उदाहरण म्हणजे, आता उन्हाळा जवळ येतो आहे. बाहेर जाताना, जीमला जाताना, ऑफिसला जाताना तुम्ही पाण्याची बाटली सोबत घेत असालच किंवा अगदीच घरी विसरलात तर दुकानात सहजपणे पाण्याच्या बाटल्या विकत मिळतातच... नाही का?  पण प्लास्टिक बाटलीतून पाणी पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

एवढंच नाही, तर घराबाहेर असताना विकत घेतलेली पाण्याची बाटली आपण घरी घेऊन जातो. दररोज त्यामध्ये पाणी भरून तिचा वापर करतो. यामुळे आपण प्लास्टिकची एकदाच वापरलेली बाटली टाकून न देता तिचा पुरेपूर वापर केल्याचे थोडेसे समाधान आपल्याला वाटते.  मात्र, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?  

प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तू जशा आपल्या घरात, किचनमध्ये घुसल्या तशाच या प्लास्टिक बाटल्यासुद्धा. कमी किंमत, विविधरंगी, हाय क्वालिटी अशा कितीतरी पॅरामीटरमधून स्वतःला पास करून आपल्या घरात, बॅगेत, कारमध्ये घुसल्या आणि आता आपल्या आरोग्यावर ‘स्लो पॉयजन’ म्हणून काम करत आहेत आणि हे आपल्याला माहितीसुद्धा नाही.

शास्त्रज्ञांच्या मते, प्लास्टिक एक पॉलिमर आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोराईड हे सर्व घटक मिळून प्लास्टिक बनते. त्याशिवाय प्लास्टिकमध्ये बीपी नावाचे एक केमिकल आढळते. ते आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे. डॉक्टरांच्या मते, जर हे रसायन किंवा पॉलिमरमधील तत्त्वे आपल्या शरीरात गेली तर अनेक आजार होऊ शकतात.

 कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि रटगर्स युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून काही धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. त्यात असे आढळून आले की, एक लिटर पॅकेज पाण्याच्या बाटलीत सरासरी दोन लाख ४० हजार छोटे-छोटे प्लास्टिकचे तुकडे असतात.

याआधी मायक्रोप्लास्टिकवर केलेल्या संशोधनाच्या मते हा आकडा १० ते १०० टक्के जास्त असल्यामुळे ही एक चिंताजनक गोष्ट आहे. नवीन संशोधनामध्ये नॅनो प्लास्टिकवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

आता नॅनो प्लास्टिक म्हणजे काय? तर मायक्रोप्लास्टिक तुटल्यानंतर नॅनो प्लास्टिकचे कण तयार होतात. ते आकाराने लहान असतात. नॅनो प्लास्टिक आकाराने लहान असल्यामुळे ते अतिशय धोकादायक असतात.

लहान आकारामुळे ते सहजपणे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात, आपल्या रक्तात त्यांचा शिरकाव सहज होतो. यामुळे अनेक प्रकारच्या समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. सूज येणे, ऑक्सिडेटिव्ह तणाव, पेशींना इजा होणे आणि अवयवांचेही नुकसान होऊ शकते. अजूनही या विषयावर अनेक अभ्यास, संशोधने सुरू आहेत.

मात्र, यापासून स्वतःचे रक्षण कसे करायचे, असा प्रश्न मनात येतो.  अगदी सहजपणे प्लास्टिक बाटलीतून पाणी पिणे हा आपल्या जीवनाचा एक भाग झाला आहे, पण या पाण्यासोबत आपल्या शरीरात अनेक घातक रसायनांचादेखील प्रवेश होतो,

याचा मात्र आपल्याला साफ विसर पडतो आहे. सर्व पाण्याच्या बाटल्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक असल्यामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची चिंता अधिक वाढली आहे, असे एका संशोधनात आढळून आले आहे.  

 सूर्यप्रकाश आणि उष्णतेमध्ये प्लास्टिक अधिक विषारी रसायन पाण्यात सोडते. जानेवारी २०२४ मध्ये प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये एक नवीन अभ्यास प्रकाशित झाला आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिण्यामुळे अंतःस्रावी ग्रंथींवर वाईट परिणाम होतो, असे त्यात म्हटले आहे.

त्यांचा सतत वापर केल्यास प्रजननशक्तीवर परिणाम होऊ शकतो. प्रजनन क्षमता कमी होऊन पुढे वंध्यत्व येऊ शकते. या बाटल्या जास्त वेळ गरम ठिकाणी ठेवल्या तर त्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात, असेही यात म्हटले आहे.

 प्लास्टिक हे बायोडिग्रेडेबल नाही. त्यामुळे वातावरणही बिघडते. प्लास्टिकचे असे सूक्ष्म घटक हे समुद्र, तलाव, पिण्याचे पाणी; तसेच आपण ज्या हवेमध्ये श्वास घेतो त्यामध्येही भरपूर प्रमाणात असू शकतात, असे संशोधनातून समोर आले आहे. डिस्पोजेबल किंवा इतर प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे रासायनिक प्रदूषणामुळे पर्यावरणावर परिणाम होतोच. पण त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी.

 पण यावर पर्याय काय? पर्याय अगदी सोपा आहे. आपल्या दररोजच्या सवयींमध्ये थोडासा बदल इतकाच...   पहिले म्हणजे, प्लास्टिकच्या बाटलीपेक्षा तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे फायदेशीर ठरेल. पूर्वीच्या काळात अनेक लोक तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचा वापर करत असत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तांबे हे शरीरासाठी अतिशय पोषक असते.

दुसरी बाब म्हणजे,  घरातून बाहेर पडताना स्वतःच्या पाण्याची बाटली सोबत घेऊन जा. प्लास्टिकऐवजी स्टील, काच किंवा तांब्याच्या बाटलीचा वापर करा. घरामध्ये पाणी स्वच्छ करून देणारी फिल्टरेशन सिस्टीम बसवून घ्या. त्यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या पाण्यामधील घातक अशुद्ध घटक, तसेच मायक्रोप्लास्टिक गाळून घेतले जाईल. त्यामुळे तुमचे पिण्याचे पाणी घातक घटकापासून काही प्रमाणात मुक्त असेल.

 प्लास्टिकच्या बाटल्यांमधून वारंवार पाणी पिणे हे शरीरासाठी धोकादायक आहे. तसेच या बाटल्यांमुळे प्रदूषणात वाढ होते ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने पर्यावरणाची हानी आपण अंशतः का होईना रोखू शकतो. तसेच आपल्या आरोग्यासाठीदेखील हे फायद्याचे ठरेल. या प्लास्टिकच्या धोक्याला गांभीर्याने घ्या.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा जितका कमी वापर करता येईल तितका कमी करावा. आपल्या सवयीमध्ये जर आपण हे छोटे छोटे बदल केले तर याचा सकारात्मक परिणाम आपल्या भावी पिढीवर नक्कीच होईल. तुम्हीही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केले असतील तर मला आवर्जून कळवा...

juhichawlaoffice@gmail.com (शब्दांकन : नीलिमा बसाळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com