esakal | आरोग्यसेवेचे तीन तेरा
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan public health

गेल्या महिन्यापासून मृतांची संख्या वाढतच आहे. यामुळे राजस्थानातील सार्वजनिक आरोग्यसेवेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

आरोग्यसेवेचे तीन तेरा

sakal_logo
By
धनंजय बिजले

शिक्षणाच्या वेगळ्या ‘पॅटर्न’साठी देशात प्रसिद्ध असलेले राजस्थानातील कोटा शहर सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेले आहे. आयआयटी-जेईई परीक्षांच्या कोचिंग क्‍लासेससाठी कोटा शहरात हुशार व श्रीमंत विद्यार्थ्यांची नेहमीच रीघ लागलेली असते. त्यामुळे येथे होस्टेल, मेस, हॉटेलचा व्यवसाय चांगलाच बहरला आहे. एकूणच, हे शहर तसे सधन आहे. सळसळत्या तरणाईने भारलेल्या कोटाची दुसरी अंधारी बाजू सध्या प्रकाशात आली आहे. येथील जे. के. लोन सरकारी रुग्णालयात अवघ्या महिनाभरात १०२ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यापासून मृतांची संख्या वाढतच आहे. यामुळे राजस्थानातील सार्वजनिक आरोग्यसेवेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारी रुग्णालय गरीब रुग्णांसाठी एकमेव आशेचा किरण असते. महागड्या वैद्यकीय सुविधा न परवडणारी लाखो गरीब कुटुंबे सरकारी रुग्णालयांत आपल्या कच्च्या-बच्च्यांवर चांगले उपचार होतील, या आशेपोटी येत असतात. अनेक सरकारी दवाखान्यांत सुविधांचा अभाव, घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी, डॉक्‍टरांची कमतरता अनुभवायला मिळते. कोटा येथेही हेच चित्र आहे. पुरेशा पायाभूत सुविधांअभावी तसेच ऑक्‍सिजनचा कमी पुरवठा आणि निर्जंतुकीकरण न केल्याने कोटा येथे शंभरावर बालके दगावल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. ढिम्म सरकारी यंत्रणा कार्यरत करायची असेल, तर राजकीय नेतृत्वात तशी इच्छाशक्ती असावी लागते. पण, नेतृत्वच जर असंवेदनशील असेल, तर यंत्रणेचे फावते. येथेही हाच अनुभव येत आहे.

कोटा शहरातील या  रुग्णालयाला भेट द्यावी, असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व आरोग्यमंत्री रघु शर्मा यांना गेल्या महिन्यात वाटले नाही. महिनाभर रोज बालकांचे बळी जात असल्याने चोहोबाजूंनी टीकेची राळ उठल्यानंतर अखेर दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात आरोग्यमंत्र्यांनी आपली पायधूळ झटकली. त्या वेळी त्यांच्या स्वागतासाठी रुग्णालयात चक्क हिरवे गालिचे अंथरण्यात आले होते. यावर रुग्णांच्या नातेवाइकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रुग्णांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या गालिचांनी केले. तर, गेल्या पाच सहा वर्षांच्या तुलनेत बालकांच्या मृतांचा आकडा कमी असल्याचे विधान करीत मुख्यमंत्री गेहलोत यांनी यावर कडी केली.

एकदाचं आलं मंत्रिमंडळ (श्रीराम पवार)

कोटा हा लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांचा मतदारसंघ. अशा ठिकाणी ही अवस्था आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात ऑक्‍सिजनचा पुरवठा नसल्याने ६३ बालके दगावली होती. त्या वेळी काँग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठवली होती. 

आता राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे भाजपने गेहलोत सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपने तीन खासदारांच्या समितीला परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पाठविले होते. त्यामुळे कोटामधील घटनेचे राजकीयीकरण झाले असून, राजकीय चिखलफेक कधीचीच सुरू झाली आहे. पण, प्रश्न आहे तो मूलभूत आरोग्य सुविधा सुधारण्याचा. त्याबाबत कोणतेही सरकार, पक्ष गंभीर नाही. त्यामुळे सामान्यांची आरोग्यव्यवस्था आणखी किती काळ ‘व्हेंटिलेटरवर’च राहणार, हा  प्रश्‍न आहे.

‘हम देखेंगे’ : एका ‘निषेधगाना’ची सुरेल गोष्ट (रवि आमले)