कुटुंबातील लोकशाहीचे संवाद संगीत!

समाजात वावरताना आमच्या एक लक्षात आलं की, प्रत्येक महिलेशी संवाद महत्त्वाचा आहेच. संवादाबरोबर समन्वयही गरजेचा आहे.
Dialogue music of democracy in the family
Dialogue music of democracy in the familysakal

समाजात वावरताना आमच्या एक लक्षात आलं की, प्रत्येक महिलेशी संवाद महत्त्वाचा आहेच. संवादाबरोबर समन्वयही गरजेचा आहे. आमच्या संस्थेची माहिती माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून पसरत गेली. त्यातून हळूहळू आमच्या स्त्री आधार केंद्रावरील विश्‍वास वाढत गेला. कौटुंबिक सलोखा आवश्यक असल्याचं सर्वांना कळून चुकलं.

अनेक मोठमोठ्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यासाठीही आम्ही बरेच प्रयत्न केले. आपल्या कामांमध्ये समाजातील ज्या लोकांचा संबंधित विषयाला विरोध आहे, तो कमी करणं आणि त्यासाठी त्यांचं मन परिवर्तन करणं, यासाठी आम्ही बरीच माध्यमं शोधली. त्यामध्ये एक लक्षात आलं की, प्रत्येकाशी संवाद महत्त्वाचा आहेच; परंतु त्यात आपल्याला त्या व्यक्तीच्या वर्तनामुळे कोणता त्रास होतो, हे समजावून घेणेसुद्धा आवश्यक ठरते.

काही वेळेला वेगवेगळ्या प्रकारांनी छळ होतो आणि तो होतोय हेच कुटुंबातल्या बाकीच्या लोकांना पटत नसतं. मग ती व्यक्ती किंवा ती मुलगी आमच्या संस्थेकडे आल्यानंतर त्याच्या तपशिलात गेल्यावर आम्हाला त्याच्या अनेक बाजू लक्षात आल्या. तसे एक उदाहरण मला आजही लक्षात आहे.

एका घटनेमध्ये राजगुरूनगर तालुक्यातील एका मुलीला तिचा भाऊ भेटण्यासाठी म्हणून घेऊन आला. त्याने सांगितलं की, हिचा नवरा सातत्याने तिच्यावर चिडावा, त्याने तिला मारावे, तिला रागवावं म्हणून तिची सासू आणि नणंद मिळून प्रयत्न करत असत. एक दिवस तर तिला रात्रीच्या वेळेला पाणी भरायला म्हणून विहिरीजवळ पाठवलं आणि तिला मागून ढकलून दिलं. तिने ओरडायचा प्रयत्न केला; पण रात्रीचे बारा-एक झाले होते.

फार काही आवाज कुठे पोचलाच नाही. ती मुलगी थंडगार पाण्यात पडली आणि तिला आठवले की, आपण लहानपणी पोहायला शिकलेलो आहोत. त्याबरोबर तिने हातपाय हळूहळू मारायला सुरुवात केली आणि थंडीत कुडकुडत ती पहाटे पाच-साडेपाचपर्यंत उजाडायची वाट बघत बसली होती. सकाळी त्या विहिरीमधून तिने हाका मारल्यावर इतर शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी त्या ऐकल्या.

काही बायका विहिरीतून पाणी काढायला आल्या, त्या वेळेला ही शेजारच्या घरातली सून कुडकुडत विहिरीतून हाका मारते, असं चित्र दिसलं. मग लोकांनी दोर सोडून तिला खेचून बाहेर काढलं. त्यांनी तिचा नवरा आणि तिच्या माहेरच्यांना कळवलं. माहेरगावी स्त्री आधार केंद्राचं नाव कळल्यावर तिचा भाऊ तिला घेऊन आमच्याकडे आला होता. त्यानंतर मग आम्ही तिच्या नवऱ्याला आणि सासूला बोलावलं.

सासू आणि नणंदेने अर्थातच संपूर्णपणे नकार दिला की, ‘आम्ही तिला ढकललेलं नाही. आम्हालाच कळलं नाही ही कुठे निघून गेली.’ मग तिच्या पतीने एका सामाजिक कार्यकर्त्याला सांगितलं की, बायको घरात काम करत नाही किंवा तीच सासूशी वाईट वागते. नणंदेला दुरुत्तर करते, असं त्याला वाटत होतं; परंतु या घटनेमध्ये त्याला प्रश्‍न पडला होता की, जर का बायकोला पोहता येत नसतं तर ती मेलीच असती.

म्हणजे अशी घटना घडल्यावरसुद्धा आपली आई आणि बहीण या खोटं बोलत आहेत, अशी खात्री त्याला पटली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की, मला काही दुसरं लग्न वगैरे करायचं नाही. मी हिच्याचबरोबर संसार करणार आहे. तो बाजारात फळं विकायचा. मग त्याने स्वतःचा फळविक्रीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि नंतर नवरा-बायको दोघंही एकत्र राहायला लागले.

एका अर्थाने अगदी आश्चर्यकारक वाटेल अशी घटना; पण अशी शेकडो प्रकरणं स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेने सोडवलेली आहेत की, ज्याच्यामध्ये संवादामधून सत्य काय ते बाहेर आलेलं दिसून येतं.

नवरा-बायको दोघं जण दर महिन्याला आम्हाला येऊन सांगायचे की, आमचं व्यवस्थित चाललेलं आहे. गावातील कोणत्याही मुलीचा छळ होत असेल तर तो आमचा पत्ता द्यायचा. कित्येक वेळेला आमच्या संघटनेचा मोठा कार्यक्रम होऊ शकत नव्हता; परंतु आमच्या संस्थेची माहिती लोकांनी माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून म्हणजे तोंडी प्रचारातून लोकांपर्यंत पसरत गेली. त्याच्यामधून हळूहळू लोकांचा स्त्री आधार केंद्रावरील विश्‍वास वाढत गेला.

अमुक एवढे पैसे दिले तर समझोता घडवून देतो, असं गुपचूप सांगितलं जातं, अशी माहिती आमच्या कानावर आली. अशा अपप्रवृत्ती आमच्या लक्षात आल्यावर आम्ही नासक्या फळाला बाजूला काढून टाकतो तसं त्यांना संघटनेपासून दूर केलं. त्याचा आम्हाला काही वेळेला त्राससुद्धा झाला. अशा व्यक्तींनी माझ्या किंवा इतरांबद्दल बदनामी करायचा प्रयत्न केला.

काही ठिकाणी तर त्यांनी दुसऱ्या संघटना काढायचा प्रयत्न केला, काही ठिकाणी पैसे घेऊन काम केलं. त्यातून त्यांनी स्वतःची बरकत करायचा प्रयत्न केला; पण आम्ही आमच्या परीने कधीही कुठल्याही पद्धतीने राजकीय दबाव, पैसा किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडलो नाही. जी बाजू सत्य आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे, असा एक आमचा नियम होता.

सत्य समजून घेण्यासाठी दोघांचं म्हणणं ऐकून घेत होतो. वेगवेगळे प्रश्‍न विचारून त्यांची मनं दुखवली जाणार नाहीत, याचीही आम्ही काळजी घेत होतो. त्यांना काय ते मनातलं बोलू द्यायचं, कुटुंबीयांच्या चर्चेतून आपल्याला काय चित्र दिसत आहे? नक्की कोणाच्या बाजूंनी चुकीची उत्तरं येतात? कोणाच्या बाजूने वस्तुस्थितीला सोडून आरोप केले जात आहेत, हे आपल्याला दोन ते तीन बैठकांमध्ये लक्षात येतं.

ते आम्ही सगळं या प्रक्रियांमधून शब्दांकन करायचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी आम्ही दोन पुस्तकंही तयार केली. त्यातल्या एका पुस्तकाचे नाव आहे ‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’, दुसरं ‘पोलिस मार्गदर्शक’. ‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’ या पुस्तकामधून आम्ही विविध प्रकारच्या घटनांमध्ये काय प्रश्‍न असू शकतात, त्यावर तोडगा कसा शोधायचा, खऱ्या वस्तुस्थितीपर्यंत जाताना कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्याचं उत्तर काय आहे.

कायद्याच्या भाषेतील उत्तर, पोलिसांच्या भाषेतील उत्तर काय आहे हे दोन्ही आम्ही समजून घेऊन लिहिलं. ‘पोलिस मार्गदर्शक’ पुस्तकामध्ये कौटुंबिक हिंसाचार किंवा कौटुंबिक तंटा हा चर्चेतून किंवा समाजातून मिटत नाही तर पुढे काय करायचं त्याचीदेखील आम्ही कार्यपद्धती ठरवली. ती आजही पुण्यातील स्त्री आधार केंद्रामध्ये वापरली जाते.

त्यामध्ये दोन-तीन वेळा चर्चा करून संपूर्ण केसची माहिती घेतल्यावर पतीला आणि तिच्या कुटुंबीयांना बोलावलं जातं. पती-पत्नीशी चर्चा झाल्यानंतर आम्ही त्यातून मार्ग काढतो. ज्या वेळेला समझोता होत नाही तेव्हा कोर्टामध्ये जाणे हा एक मार्ग असतो. मग त्याच्यात पोटगीची केस, त्याचबरोबर मुलांचा ताबा, कौटुंबिक हिंसाचारविरोधी दिवाणी कायदा आहे.

दिवाणी कायद्यामधून कशाप्रकारे तिला घराचा ताबा मिळू शकतो, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा आणि विचारविनिमय होतो; परंतु दहापैकी सहा प्रकरणांमध्ये आमच्याकडे समझोता झालेला दिसतो, तर चार प्रकरणे बऱ्याच वेळेला कोर्टामध्ये जातात. ज्या कुटुंबांमध्ये समझोता झालेला आहे ते काही वर्षे संस्थेच्या संपर्कात राहतात. त्यांचा संसार चांगला चालतो. ते मधूनमधून येऊन भेटतात.

जसे वैद्यकीय पेशामध्ये आहे की, बरे झाल्यानंतर रुग्ण जसा डॉक्टरकडे येईनासा होतो, त्याप्रमाणेच आमच्या बाबतीतही तसेच होते. काही वेळेला समझोता फिसकटला तर मात्र त्या मुलीला न्यायालय आणि या सगळ्या मार्गाने जाण्यास मार्ग राहत नाही; परंतु संवादाबरोबर समन्वयानंतर त्यांनी कसं एकमेकांशी वागावं, याबद्दलसुद्धा काही वेळेला करार करण्याची वेळ येते.

तो आम्ही स्टॅम्प पेपरवर करून घेतो. त्या पत्राची प्रतही तिच्या माहेरच्या आणि सासरच्या पोलिस ठाण्याला देतो. माहेरच्या लोकांकडे एक, सासरच्या घरी एक आणि एक संस्थेकडे अशा झेरॉक्स प्रती ठेवलेल्या असतात. समझोत्यामध्ये ज्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा असतात, त्या त्याच्यामध्ये नोंदवलेल्या असतात. त्याचा जर का भंग झाला तर त्यांनी ते संस्थेत येऊन सांगावं, असं सांगितलेलं असतं.

या समझोत्याच्या वेळी दोघांचे किंवा संस्थेचे वकील किंवा प्रशिक्षित कौटुंबिक सल्लागार, क्वचितप्रसंगी पोलिस यांच्यासमोर तो करार केला जातो. समाजाच्या सहभागातून आणि विशेषतः पुरुषवर्गाची भूमिका बदलून समझोता केला जातो. त्यावेळेला तो समझोता बराच काळ टिकतो, असं मला दिसून आलं.

काही वेळेला महिलादेखील खूप कर्कश बोलणं, संशय घेणं किंवा वाकडे बोलणं, माहेरच्यांशीच फक्त प्रेमाने वागणं आणि सासरच्या लोकांशी दुजाभाव करणं, असेसुद्धा प्रश्‍न आढळून येतात. अशा वेळेला थोडक्यात कौटुंबिक सलोखा हा आवश्यक आहे. त्याच्यात प्रेम आणि जिव्हाळ्याशिवाय केवळ वादविवाद करून काही अर्थ नाही हे जेव्हा दोन्ही व्यक्तींच्या लक्षात येतं, त्या वेळेला त्याच्यामध्ये फरक झालेला दिसतो.

खरं तर त्यांचा बेसूर सगळीकडे ऐकू यायला लागतो. त्या वेळेला तो संवाद व नात्यांचा सूर चांगला ठेवणं, त्याच्यातून कर्कश सूर उमटणार नाहीत हे बघण्याचं जे काम समाजाने करायला लागतं ते समाजाचं काम स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटना सातत्याने करते. त्याच्यामुळे व आमच्यासारख्या काम करणाऱ्या ज्या इतर संघटना, व्यक्ती या समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये लोकशाही आणण्याचंच कार्य करत असतात, असं मला वाटतं.

neeilamgorhe@ gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com