‘डिजिटल शहाणपण’ देगा देवा!

अमेरिकेत राहणाऱ्या जैन समाजाने मोबाईल अन् लॅपटॉपच्या स्क्रीनपासून दूर राहण्यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ चळवळ सुरू केली आहे.
digital detox
digital detoxsakal

- मुक्ता चैतन्य

अमेरिकेत राहणाऱ्या जैन समाजाने मोबाईल अन् लॅपटॉपच्या स्क्रीनपासून दूर राहण्यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ चळवळ सुरू केली आहे. एक मात्र खरं, की आज आपण डिजिटल झालो; पण माध्यम शिक्षित व्हायचं राहूनच गेलं आहे.

मोबाईलपासून लांब राहता येऊ शकतं का? बहुतेकांना पडलेला हा प्रश्न... आजच्या काळात याचं उत्तर ‘हो’ असं देता येणं अवघड आहे. कारण मोबाईलमध्ये आपलं जवळपास सगळं आयुष्य व्यापलेलं आहे. आपलं ऑफिस, आपलं बँकिंग, मनोरंजन, आपल्या दोस्तांचा कट्टा... सगळंच मोबाईलमध्ये आहे आज. इंटरनेटमुळे आपण कनेक्टेड आहोत हे विसरून चालणार नाही. ज्याचे अगणित फायदे आपण रोजच्या रोज उपभोगत असतो.

त्यामुळे या सगळ्याच्या तोट्यांकडे आपलं चटकन लक्ष जात नाही. आपलं सगळं आयुष्य इंटरनेटशी जोडलं गेल्यामुळे हातात सतत मोबाईल हवाच. त्यातूनच इंटरनेटचं आणि पाठोपाठ मोबाईलचं व्यसन किंवा त्याच्यावरचं अवलंबित्व प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतंय. बरं, ही समस्या एका वयोगटाची किंवा समाजातल्या एखाद्या घटकाची आहे का?

तर नाही... सर्व लिंगभाव असलेल्या, सर्व आर्थिक-सामाजिक-बौद्धिक-भौगोलिक गटातल्या आणि सर्व वयोगटातल्या माणसांचा हा प्रश्न बनला आहे. कारण, आपण डिजिटल झालो; पण माध्यमशिक्षित व्हायचं राहून गेलं आहे. सतत इंटरनेटचा आधार घेतल्यामुळे, सतत मोबाईल वापरल्यामुळे आपल्या मनात, मेंदूत आणि शरीरात काय बदल होतात हे आपण नीटसं समजून घेत नाही. सध्या तर आपली ‘कळतंय; पण वळत नाहीय’ अशी अवस्था आहे.

सगळ्यांना माहीत आहे, की आपल्या हातातल्या फोनमुळे आपलं आयुष्य व्यापलं गेलंय; पण तो दूर ठेवावासा वाटत नाही. मोबाईल जवळ नसेल तर आपण काम करू शकणार नाही, असंही अनेकदा अनेकांना वाटतंय. या सगळ्याचं कारण डिजिटल स्पेस आपल्या भावनांवर चालते, हे माहीत नसणं. आपल्या भावनांशी होणारा खेळ थांबवायचा कसा, याच्याबद्दल पुरेसा विचार केलेला नसणं किंवा त्याविषयी अत्यावश्यक ती मदत घेतलेली नसणं.

आमच्या कामातला सगळ्यात मोठा अडथळा हा स्वीकार न करणे, हा आहे. आपण मोबाईलवर अवलंबून आहोत हे अनेकांना मान्य होत नाही. आपल्याला इंटरनेटचं व्यसन लागलेलं आहे, हे पटत नाही. कारण बाकी व्यसनांमध्ये जे शारीरिक परिणाम किंवा दृश्य स्वरूप दिसतं ते इथे दिसत नाही.

दारू पिऊन माणसं झिंगून पडतात, सिगारेटमुळे फुप्फुसाचे त्रास सुरू होतात, तंबाखूमुळे तोंडाचा वा अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते... इथे असे कुठलेही गंभीर आजार किंवा शारीरिक दृश्य दुष्परिणाम होताना दिसत नाहीत. पण, म्हणजे आपल्यावर काहीच परिणाम होत नाहीत, असं नाही. पण जे काही मनोसामाजिक परिणाम होतात त्यांना ‘लाईफ स्टाईल त्रास’ असं गोंडस नाव देऊन त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

मोबाईल आणि इंटरनेट अशी डिपेंडन्सी कमी करायची असेल किंवा ज्याला डिजिटल डिटॉक्स म्हटलं जातं ते करायचं असेल तर नेमकं करायचं काय? ही प्रक्रिया दोन टप्प्यांवर चालते. एक म्हणजे मानसिक तयारी आणि दुसरी प्रत्यक्ष कृती.

मानसिक तयारी

१) आपला स्क्रीन टाईम वाढलेला आहे हे मुळात मान्य असणं आवश्यक आहे. आपला स्क्रीनटाईम नक्की किती आहे हे आपल्या फोनमधल्या ‘डिजिटल वेलबिइंग’ फिचरमधून समजू शकतं. एखाद्या मानसिक पातळीवर आपल्याला डिटॉक्स करण्याची गरज आहे, हे पटलं की मगच पुढे जाता येतं.

२) ज्यांना हे पटलेलं नसतं, ते वरकरणी बदल झाले पाहिजेत, याची चर्चा करतात; पण प्रत्यक्ष कृती करण्याकडे त्यांचा कल नसतो.

३) ज्यांना मान्य झालेलं असतं त्यांच्यात काही वेळेला लाज हा मुद्दा आडवा येतो. कळतंय; पण त्यासाठी मदत घेण्याची मानसिक तयारी नसते. आपलं आपलं कमी करू, असं या लोकांना वाटत असतं जे अनेकदा शक्य होतंच असं नाही. त्यामुळे व्यसन लागलेलं आहे हे समजत असून, मान्य असूनही त्यासाठी मदत घेण्याकडे हे लोक जात नाहीत.

प्रत्यक्ष कृती

१) ज्यांनी इंटरनेट, मोबाईल, गेमिंग, पॉर्न किंवा डिजिटल जगातील इतर कुठलंही व्यसन स्वीकारलेलं असतं ते त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतात.

२) अशा वेळी तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली तर डिटॉक्सच्या प्रवासाकडे डोळसपणे बघता येऊ शकतं.

३) सगळ्या गोष्टी आपल्या आपण करू हे एक मिथक आहे. गैरसमज आहे. प्रत्येकाला स्वतःच्या बळावर सगळ्या गोष्टी सोडवता येत नाहीत. अनेकदा आपल्याला मदतीची जरुरी असते; पण आजवरच्या कामात हे अनेकदा बघितलेलं आहे की माणसं स्वतःचे सगळे प्रश्न स्वतः सोडवायला जातात. मदत घेण्यात कमीपणा नसतो हे अनेकदा अनेकांना पटत नाही. अगदी शिकलेली, हुशार माणसंसुद्धा तुझं तू कर माझं मी करेन... मदत घेणार नाही, असं म्हणताना, एकमेकांना सांगताना पाहिलेली आहेत. एकमेकांची मदत घेणं हे खूप मूलभूत मानवी मूल्य आहे, हेच आपण काळाच्या ओघात विसरत चाललो आहोत की काय, असं अनेकदा वाटतं.

डिजिटल डिटॉक्स की डिजिटल भान?

डिजिटल डिटॉक्स की डिजिटल भान, हा मोठा कळीचा प्रश्न आहे. डिजिटल डिटॉक्स ही तात्पुरती मलमपट्टी असते. फर्स्ट एड म्हणू शकतो फार तर. स्क्रीनटाईम खूपच वाढला असेल, तर तात्पुरत्या पातळीवर चटकन त्यातून सावरण्यासाठी डिजिटल डिटॉक्स, डिजिटल उपवास इत्यादी प्रकार उपयोगी पडू शकतात; पण डिजिटल डिटॉक्स झालेला माणूस शहाणपणाने डिजिटल स्पेस वापरलेच असं नाही.

त्यासाठी डिजिटल भान आणि डिजिटल शहाणपण आवश्यक आहे आणि ते फक्त माध्यम शिक्षणातून येऊ शकतं. त्यातही माध्यम शिक्षणाचा विषय प्रमुख शिक्षणाच्या स्रोतात आला तर त्याचा उपयोग आहे. अवांतर शिक्षणाकडे तो गेला तर त्याच्याकडे तितक्याशा गांभीर्याने बघितले जाणार नाही आणि पुन्हा तात्पुरत्या मलमपट्ट्या आपण करत बसू.

काही टिप्स इथे द्यावाशा वाटतात... पहिली म्हणजे, एक दिवस ‘नो स्क्रीन डे’ जरूर करून बघा. मोबाईलशिवाय एक दिवस घालवणं हा निराळा अनुभव आहे. तो घेऊन बघावा प्रत्येकाने. रात्री मोबाईल बंद करण्याची वेळ ठरवून घेणं आवश्यक आहे. कारण स्क्रीन टाईमचा झोपेवर परिणाम होतो. आपल्या भावना आपण सोशल मीडियाशी जोडत नाही आहोत ना, हे प्रत्येकाने बघायला हवं.

डिजिटल जगात मजा आली तरच प्रत्यक्ष जगात मजा येते, असं होता कामा नये. इंटरनेट, मोबाईल आपल्यासाठी सोय म्हणून आहे आपण त्यांच्यासाठी नाही, हे कायम लक्षात असू द्यावं. पालक मुलांना टीव्ही आणि मोबाईलच्या सवयी लावतात आणि नंतर मुलांचा वापर वाढला की त्यावरून एक तर त्यांना ओरडतात किंवा काळजी करत बसतात.

सवयी लावतानाच थोडा विचार केला तर? जेवताना मोबाईल लांब ठेवण्याचा प्रयत्न हा डिजिटल डिटॉक्समधला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. रोज जेवताना मोबाईल दूर ठेवण्यापासून सहज सुरुवात करता येऊ शकते... आणि हो मोबाईल दूर ठेवून टीव्ही लावून त्यासमोर बसून जेवायचं नाही. जेवताना कुठलाही स्क्रीन नको. मला काय आवडतं, माझे छंद काय आहेत, याचा जरूर विचार करावा. त्यासाठी प्रयत्नपूर्वक वेळ काढावा.

त्यानेही स्क्रीन टाईम कमी होतो. वेळ नाही हीदेखील माणसांची पळवाट असते. आपल्याकडे प्रचंड वेळ असतो; पण त्याचे नियोजन आपल्याला जमत नाही. त्यामुळे ‘वेळ नाही’चे कारण देण्यापेक्षा नियोजनाकडे लक्ष द्यायला हवं. मोबाईल बघणे हा अग्रक्रम आहे का, हे ठरवता आलं पाहिजे.

एखादी गोष्ट आपण का आणि कशासाठी करतोय, याचा विचार स्वतःही केला पाहिजे. मुलांनाही तो करायला शिकवलं पाहिजे. हातातलं काम सोडून मोबाईल बघत बसणार असू तर आपण ते का करतोय, हा विचार मनात आलाच पाहिजे. आपण स्वतःला असे प्रश्न विचारायला सुरुवात करू तेव्हा डिटॉक्सच्या आणि डिजिटल भानाच्या दिशेने टाकलेलं ते पहिलं पाऊल असेल.

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका ‘सायबर मैत्र’च्या संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com